गोष्ट साधारण वीस वर्षापूर्वीची असेल.आजोबांच्या निधनाची वार्ता आली. आम्हा चिल्ल्या पिल्ल्याना घेवून आई लगेच आजो्ळी निघाली. मरणाचे गांभिर्य समजण्याएवढे वय देखिल नव्हते आणि मनस्थिती देखिल. आमचे आजोळ कोल्हापूर जिल्ह्यातील एक सधन शहर. आणि गोष्टी मधे असतो तसा मामाचा जुना वाडा.
आम्ही मुले इकडे तिकडे खेळ्त असू. पहिल्या तीन दिवसात घरी पाहुण्यारावळ्यांची बरीच गर्दी झाली होती. आजोबांच्या वयोमानानुसार त्यांचे मित्रमंडळ देखिल त्याच वयोगटातले होते. हे सगळे "आजोबा" लोक साधारण सदरा आणि धोतर यामधेच दिसत. आमच्या आजोबांप्रमाणे त्यांचे बरेच मित्र फ़ेटा घालत असत.
तिसरा दिवस. दुपारची जेवणे झाली. काही लोक दुपारची झोप घेवू लागले तर काही पान तंबाखू सिगारेट च्या मागे लागले. फ़ेटे काढून सदरा खुंटीला लटकवून शरीर मोकळे सोडून आयुष्य, मरण या विषयावर मुक्त चिंतन सुरू झाले. अलिकडेच कोण आणि कसा गेला हे चर्चिताना आपण देखिल रांगेत आहोत याची जाणीव देखिल काही "आजोबां"नी करून दिली. आमचा मुक्त संचार दिवाणखाना ते स्वयंपाकघर असा सगळीकडे होता.
दिवाणखाण्यात मला एका आजोबांनी हटकले
"काय रे ? कुणाचा मुलगा तू?"
बंडी ( म्हणजे बनियान) आणि धोतरातले आजोबा मला थोडे खडूस वाटले.
आजोळी आईच्या नावे ओळख सांगावी लागते हे माहीती होते. मग सांगीतले अमकी-तमकीचा.
"वा.. छान. किती मोठा झालास ? कितवीला आहेस ?"
मी सगळ्या प्रश्नांची "मुद्देसूद" उत्तरे दिली कारण मला तिथून सटकायचे होते. पण त्याआधीच ते आजोबा मुद्द्यावर आले.
हात छाप बंडल म्हणजे हात छाप विडी चा बंडल. मी नाखुषीनेच पैसे खिशात कोंबले आणि धूम ठोकली. बाहेर गेल्यावर बाकीच्या मुलांमधे मिसळलो आणि ते काम केंव्हा विसरलो ते समजलेच नाही. बराच वेळ बागडल्यानंतर आठवण झाली. बाप रे, आजोबांच्या विड्या आणायच्या राहूनच गेल्या. धावत पळत दुकानात गेलो आणि विड्या, माचिस घेतले आणि दिवाणखाण्यात आलो. पहातो तो काय, दिवाणखाण्याचे थोड्या वेळापूर्वी जे चित्र दिसत होते ते पूर्ण बदलले होते. सगळे आपापली कापडे चढवून भिंतीच्या कडेने बसले होते. काही जण मधे बसले होते. काही लोकांची भर देखिल पडली होती. मी सगळ्यावर नजर टाकली आणि "त्या" आजोबांना शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पैसे दिले तेंव्हा ते बंडी आणि धोतरात होते. आणि आता सगळे आजोबा लोक सदरा घालून तर बसले होतेच, आणि वर गोंधळ वाढवण्यासाठी काहींनी गांधी टोपी किंवा फ़ेटा घातला होता. इच्छा नसताना काम स्वीकारल्यामुळे चेहेरा देखिल आठवत नव्हता. आता आली का पंचाईत ? कसे शोधून काढायचे त्या आजोबांना ? बरे, उरलेले पैसे ढापावे आणि विड्या कुणाला तर देवून टाकाव्या म्हटले तर त्या आजोबांनी "कुणाचा रे तू?" म्हणून माझा बायोडाटा विचारून घेतला होता. वरून "विड्या तुझ्याकडे कुठुन आल्या ?" म्हणायला तथाकथित वडीलधारे मोकळे. त्या वयात देखिल मला "टेन्शन" आले. स्कॉलरशिपला बुद्धिमत्ता चाचणी मधे दिलेल्या चार वस्तुंमधे वेगळी वस्तू ओळखा असा प्रश्न असायचा. त्या प्रश्नांहूनही हा कितीतरी गहन प्रश्न वाटू लागला. माझ्या या विचारचक्रामधे काय चाललय हे मी विसरून गेलो.
दिवाणखान्यात तोंड गोड करण्याचा कार्यक्रम होणार होता. त्यासाठी सगळे जमले होते. पाणी, चहा, पान-सुपारी चालूच होते. बरेच लोक जमले होते. काय करावे सुचत नव्हते. खूप विचार केला आणि मग एक युक्ति सुचली. आपण हा विडी बंडल आणि माचिस घेवून सगळ्यांसमोर फ़िरूया, ज्या आजोबांचे असेल ते आजोबा आपल्याकडून घेतील. येस... लगेच सुरू करुया.
सुरवात केली. काही प्रश्नार्थक मुद्रा, काही आश्चर्यकारक मुद्रा, काही निर्विघ्न तर काही - "मुलगा किती कामसू आहे?" इति.
बरेच टप्पे पार केल्यावर एक आजोबा हसून म्हणाले - " बाळ, घे इकडे.."
मी सुटकेचा निश्वास टाकला. विडी बंडल आणि माचिस आजोबांच्या हवाली करून मी उरलेले सुटे पैसे देण्यासाठी माझे खिसे चाचपू लागलो. पैसे काढून आजोबांसमोर धरले. तोपर्यन्त आजोबांनी बंडल फ़ोडून विडी ओढायला सुरवात देखिल केली होती. बराच वेळ धरले तरी आजोबा पैसे काही घेईनात. त्यांच्या चेहेर्यावर काही प्रतिक्रिया देखिल नव्हती. मी विचार केला, कदाचित ते आपल्याला खाऊसाठी देत असतील. म्हणून मागचा पुढचा विचार न करता धूम ठोकण्यासाठी वळलो.
"अरे पळतोस कुठे?" आजोबांनी पकडले - " हे घेवून जा" म्हणून तो फ़ोडलेला बंडल आणि मचिस माझ्या हातावर टेकवले. मी आ वासून त्यांच्याकडे बघतच राहिलो. झाला प्रकार ध्यानी यायला मला वेळ नाही लागला. या आजोबांनी आपला स्वार्थ साधून घेतला होता. आता त्या "ओरिजिनल" आजोबांना काय उत्तर देणार? आली का पंचाईत ?
आता धीराने पुढे जायचे ठरवले. एखादी विडी कमी झाली असेल तर एवढे काय आभाळ कोसळणार आहे?
पुढच्या आजोबांना गाठले... नो रिऍक्शन.
अजून पुढे.... पुढचे आजोबा, फ़ेटेवाले... कदाचित हेच असतील...
आणि पुढे पुढे करता करता विडी बंडल रिकामा झाला..!
आज वीस वर्षानंतरही ते आजोबा मला सापडले नाहीत.
उरलेल्या पैशांचे काय झाले म्हणता? अहो काय होणार? पोटात गेले. चंगळ झाली माझी. मी एकटाच तो प्रसंग आठवून खूप हसत होतो. त्या सुतकी वातावणात देखिल हा प्रसंग माझ्या मनात हास्याची लहर उठवून गेला.
लेखक: मीनानाथ धस्के
२ टिप्पण्या:
सॉलीड मिननाथ. तुम्ही चित्रांसारखाच लेखही धमाल लिहिला आहे.
मस्त धम्माल.
टिप्पणी पोस्ट करा