होळी आली .. तसा अद्याप वेळ आहे, पण होळी आपल्या दारावर टिचक्या मारीत आहे. होळीबरोबर इतर अनेक गोष्टी आपल्या दारावर फक्त टिचक्याच नव्हें, तर हातोडा मारीत आहेत असं म्हणायला हरकत नाहीं.. उदाहरणार्थ, लवकरच सुरू होणारं शाळेचं नवीन वर्ष; मुलांची झोप उडवणार्या वार्षिक परीक्षेचा आईबापांवर होणारा (नको तेवढा) विपरीत परिणाम; या निमित्ताने आईबापांचा आपल्या मुलांमुलींवर वाढत जाणारा दबाव; (ओघाओघाने येणार्या आत्महत्येच्या सत्रांचा उल्लेख मी मुद्दामच करीत नाहींय !); के. जी. च्या वर्गात ऍडमिशन मिळवण्यासाठी शिकवण्यांचे वर्ग; त्यापाठोपाठ शाळाशाळांतून के. जी. प्रवेशाच्या मुलाखती ... एक ना दोन ! तर चला, या गंभीर वातावरणाला थोडं हलकं करायचा एक हुडदंगी नाट्यमय प्रयत्न करूंया. पहिल्या प्रवेशाचं नांव आहे "के. जी. मुलाखती".
के. जी. मुलाखती
सूत्रधार : नमस्कार मित्रहो, शिक्षण क्षेत्रात एक क्रांति घडून येत आहे. विद्वान लोकांनी आपलं मत व्यक्त केलं आहे की आईबापांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिणाम मुलांच्या वाढीवर होत असतो. म्हणूनच मुलांना के. जी.च्या वर्गात प्रवेश देण्यासाठी, मुलांबरोबर, त्यांच्या आईबापांच्या मुलाखती घेण्याची प्रथा शाळाशाळांत सुरू केलेली आहे. एक नमूना पेश आहे.
( एका नेहमीच्याच शाळेतील एक नेहमीचंच ऑफीस. मुलाखत घेणारी बाई हातात एक पिशवी घेऊन प्रवेश करते. येतांच समोरच्या टेबलावर पिशवीतील काही लहानमोठे लाकडी ठोकळे पसरते; आपल्या जीनच्या खिशातून एक पिस्तूल काढून हवेत चालवते, व घोषणा करते. )
बाई : के. जी. ऍडमिशनच्या मुलाखती सुरू होऊं देत. पहिला बळी आत पाठवा. (एक घाबरलेला गृहस्थ आपली नखं चावीत प्रवेश करतो.) मिस्टर, घाबरण्याचं काहीहि कारण नाहीं. (तिच्या लक्षात येतं की तो आपल्या हातातील पिस्तुलाला घाबरला आहे, व ती आपलं पिस्तूल खिशात लपवते.) तुमचं नांव?
माणूस १ : पटेल.
बाई : (जरबीने) संपूर्ण नांव सांगा.
माणूस १ : श्रीयुत रामजीभाई देवजीभाई पटेल.
बाई : शिक्षण?
माणूस १ : गुजरात युनिव्हर्सिटीतून एम. कॉम.
बाई : (रुक्षपणे) आता हे ठोकळे त्यांच्या रंगांप्रमाणे या टेबलावर मांडा. (काहीवेळ तो ठोकळे लावायचा निष्फळ प्रयत्न करतो.) नापास. पुढल्या महिन्यात परत या. (तो घाबरून बाहेर पळतो.) पुढील पालक कोण आहे? (बाहेरून सूट घातलेला एक माणूस येतो.) हं, नांव?
माणूस २ : (आत्मविश्वासाने) डॉक्टर अनंतस्वामी रंगस्वामी मुदलियार हे माझं संपूर्ण नाव. मूळ वास्तव्य चेन्नई. गेली बरीच वर्षं मुंबईत स्थाईक.
बाई : सेनेची सैनिक नाहींय मी. इतिहास-भूगोल विचारला नाहीं. शिक्षण कुठपर्यंत झालंय?
माणूस २ : बॉस्टन युनिव्हर्सिटीतून M.B.B.S, F.R.C.S.
बाई : कळलं. सबंध बाराखडी नकोय. मला सांगा, इंग्रज़ी एस. आणि यू.च्या मधे कुठलं अक्षर येतं?
माणूस २ : सोपं आहे. (हातावरच्या घड्याळाकडे पहात) टी.
बाई : उत्तम. बाहेर वाट पहा. तुमच्या मुलाचा इण्टरव्यू झाला की तुम्हाला उत्तर मिळेल. बाहेर उभे रहा.
माणूस २ : माझ्या ’टी’ची म्हणजे चहाची वेळ झाली. थॅंक यू. (बाहेर जातो.)
बाई : पुढल्या पालकाला आत पाठवा. (माणूस ३ आत येतो.) नांव?
माणूस ३ : श्रीयुत मनसुख रणधीर तनखारामानी. उल्हासनगर युनिव्हर्सिटीतून प्रथम श्रेणीतून एम. कॉम. पास. बॅंकेत ...महिन्याची कमाई सांगू?
बाई : (रुक्षपणे) जास्त बोलायचं काम नाहीं. हा कागद-पेन्सील घ्या व एक कोंबड्याचं चित्र काढून दाखवा. (माणूस कागदावर कसलंतरी चित्र काढतो व कागद बाईला देतो.) तुमचा कोंबडा कोंबड्यासारखा नाहीं, अंड्यासारखा दिसतो.
माणूस ३ : कारण मी अंडाहारी आहे, कोंबडी खात नाहीं. काही दिवसांनी त्यातून कोंबडा बाहेर येईल, तेव्हां बघा. (तिच्या उत्तराची वाट न पहाता निघून जातो.)
बाई : बापरे, कसले कसले लोक येतात के. जी.च्या मुलाखतींसाठी ! (मोठ्याने) हं, पुढचा कोण आहे, आत या.
( बाहेरून एक मुलगा प्रवेश करतो. )
मुलगा १ : मॅडम, लवकर इंटरव्यू सुरू करा. मला घाई आहे. माझा क्रिकेटचा गेम अर्धा सोडून आलोय.
बाई : (तोंडावरचा घाम पुसून) नाव सांग.
मुलगा १ : "प्लीज़" म्हणा. चांगल्या संस्कारांचं लक्षण असतं. असूं दे. माझं नांव मनोज अनंतस्वामी रंगास्वामी मुदलियार. माझे बाबा डॉक्टर आहेत. आणि प्लीज़, हा डॉक्टरकीचा विषय सोडून दुसरे कुठलेही प्रश्न विचारा. मला डॉक्टर व्हायचं नाहीं.
बाई : औद्योगिक क्रांतीविषयी तुला काय माहिती आहे? .... प्लीज़ ... सांग.
( मुलगा १ न थांबता धडाधड उत्तर देतो. )
मुलगा १ : अजून काही माहिती हवीय? ( बाई घाबरून घाम पुसायला लागते. ) प्लीज़, टेंशन घेऊ नका. रिलॅक्स.
( मुलगा मागे न बघता बाहेर निघून जातो. बाईला भलताच घाम सुटला आहे. )
बाई : (नर्व्हस) नेक्स्ट....
( बाहेरून मुलगा २ आत येतो. )
मुलगा २ : बाई, तुम्हीं बसा ना. माझा मित्र मनोज म्हणाला, तुम्हीं भयंकर नर्व्हस आहात म्हणून. घाबरू नका, जास्त वेळ घेणार नाहीं तुमचा. माझं नाव अमिताभ रामजीभाई पटेल. माझे बाबा जास्त शिकलेले नाहीत म्हणून माझ्या के. जी.च्या ऍडमिशनसाठी उगीचच टेंशन घेतात.
बाई : भारतातील सुवर्णयुगाबद्दल तुला काय माहिती आहे?
मुलगा २ : माझे बाबा, आजोबा, पणजोबा आणि आमच्या घराण्यातले सगळे जोबा सोन्याचांदीचे मोठे व्यापारी होते. त्यांच्या मनांत आहे की मीसुद्धा त्यांच्यासारखाच सोन्याचांदीचा व्यापार करावा. पण मला शिकून मोठा डॉक्टर व्हायचं आहे. तेव्हां त्याविषयी तुम्हांला कांही विचारायचं असेल तर ठीक, नाहींतर तुमचा, आणि महत्वाचं म्हणजे माझा अमूल्य वेळ दवडूं नका. आणि मी बाहेर गेल्यावर आधी आपला घाम पुसा. नाहीतर माझ्यामागून येणार्या मुलावर वाईट इंप्रेशन पडेल.
( तिच्या उत्तराची वाट न पहाता तडातडा निघून जातो. बाई घाम पुसत असते तेवढ्यात मुलगा ३ प्रवेश करतो. )
मुलगा ३ : हाय. माझं नाव ह्रितीक शाहमीर पचपन.
बाई : हे नांव थोडं फिल्मी नाहीं वाटत?
मुलगा ३ : असेल. पण मला आवडतं. मी तसा थोडा... नाहीं, जरा जास्तच फ़िल्मी आहे. माझ्या बाबांना सुद्धां आवडतं हे नांव. माझ्या बाबांचं नांव तनखारामानी आहे, पण त्यांना तनखा, म्हणजे पगार, वगैरे काहीं मिळत नाहीं. त्याची गरजच पडत नाहीं त्यांना. कारण मी सिनेमांतून व टीव्हीवर ऍड्स मधून कामं करतो. महिन्याला सत्तर-ऐंशी हज़ार सहज मिळतात, म्हणून डॅडने आपली बॅंकेतली जॉब सोडली. सध्या सगळं घर माझ्या कमाईवर चालतं. तेव्हां खरं तर मला शाळा-कॉलेजात ऍडमिशन घ्यायची सुद्धां गरज नाही. पण मग मलाच कधी तरी या सगळ्याचा कंटाळा येतो, म्हणून शाळेत येऊन मस्ती करावसं वाटतं. अजून काही जाणून घ्यायचंय? प्लीज़, मी जाऊं शकतो? सॉरी, आपला खूप वेळ खाल्ला. थॅंक्स. (नाच करीत बाहेर निघून जातो.)
( बाई काय बोलावं हे न सुचून पटकन समोरच्या खुर्चीवर बसते. )
सूत्रधार : (प्रवेश करून) तर मंडळी, तुमच्यापुढे पेश केलेले हे नमूने तुम्हांला कसे आवडले हे ज़रूर कळवा. धन्यवाद. (बाहेर निघून जातो.)
* * * * *
लेखक: लक्ष्मीनारायण हटंगडी
२ टिप्पण्या:
काका, लेख चांगला आहे. तुमच्या लेखात बाई पालकाला पुढच्या महिन्यात यायला सांगतात. प्रत्यक्षात पुढच्या वर्षी या असंच म्हणतील.
सबंध बाराखडी नकोय. मला सांगा, इंग्रज़ी एस. आणि यू.च्या मधे कुठलं अक्षर येतं?
आणि
कारण मी अंडाहारी आहे, कोंबडी खात नाहीं. काही दिवसांनी त्यातून कोंबडा बाहेर येईल, तेव्हां बघा.
हे तसेंच ते सोन्याचांदीचें आवडलें.
टिप्पणी पोस्ट करा