त्या जाहिराती...

दूरदर्शनचे मी नेहमी दुरूनच दर्शन घेते. त्यापेक्षा माझा जास्त ओढा संगणक आणि पुस्तके यांच्याकडे आहे. शाळेतून आल्यावर मुलाची कार्टुन्स, ऑफिसातून आल्यावर नवर्‍याचे खेलकूद आणि समाचार आणि उरलेला दिवसभर सासूच्या कुटाळक्या करणार्‍या मालिका चालू असताना माझी काय बिशाद आहे दूरदर्शनचे दर्शन घ्यायची ! त्यामुळे होते काय, की साधारण संध्याकाळी ७.३० ते ९.३० या वेळात, अर्ध्या तासाला एक या हिशोबाने दाखवल्या जाणार्‍या मालिकांपैकी कोणती तरी जेवताना बघायला मिळायची. त्यात आपसूकच काही जाहिराती बघायला मिळायच्या. त्यातल्या मला २ जाहिराती लागल्या की मला जाम हसायला यायचं. एक म्हणजे " हार्पिक " ची आणि दुसरी म्हणजे " लक्स.....उटण्याचा " ही. आता यात हसण्यासारखं काय आहे ? हे तुम्ही विचारालंच. म्हणून पुढे वाचा तर खरं...




“ हार्पिक’ "च्या जाहिरातीत एक विक्रेता एका गृहिणीला आव्हान देतो; की त्यांचे हार्पिक हे उत्पादन वापरल्यामुळे त्या गृहिणीच्या  घरातील शौचालयातले पिवळे डाग सहज निघून जाऊ शकतील. गृहिणीचा अर्थात्‌च त्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. कसा बसावा ! अहो मला विचारा, हे काम सोपे नव्हेच. पण तरिही ती या प्रयोगाला मान्यता देते आणि अर्थात्‌च जाहिरातीकरता तयार केलेले डाग जाहिरातीतल्या हार्पिकने चक्क निघून जातात. इथपर्यंत ठिक आहे. पण खरी गंमत तर पुढेच आहे. हे घडल्यावर ती गृहिणी अचंबित होऊन " मजा आली " असं जे म्हणते ना त्याला मी आणि माझा मुलगा खूप हसतो.



हि जाहिरात मूळ हिंदीत आहे आणि मराठीतून दाखवताना ती डब केलेली आहे. त्यामुळे यातलं ’ " मजा आली " हे वाक्य एखादा अमराठी भाषिक जसा मराठीतून बोलेल त्याप्रमाणे वाटतं आणि त्या उच्चारामुळे माझ्या मुलाला हसू येतं. आता मला हसू का येत असेल याबद्दल कोण सांगू शकेल ?



अहो, रविवारच्या सकाळी आव्हान घेऊन का होईना पण आमचं शौचालय आयतं स्वच्छ करून मिळालं तर ही मजा कोणाला नकोय ! तो सद्‌गृहस्थ आपलं हार्पिक उत्पादन घेऊन आमच्या परिसरात यायची मी कधीपासून आतुरतेने वाट पहातेय, त्याला आव्हान द्यायला :-)




आता दुसरी जाहिरात. त्यतली षोडशा आपल्या मादक अदा दाखवत " आंघोळीला चाललेय.....उटण्याच्या " असं जाहिर करायचा अवकाश, तिच्या आजूबाजूला लगेच मंगलवाद्य वाजायला लागतात; एक वृद्धा अगदी तिला औक्षण करण्याकरता म्हणून ताम्हण, निरांजन वगैरे घेतलेली दाखवली आहे. दोघं-तिघं तिच्या भोवती नाचताहेत.



आता मला सांगा " आंघोळ " ही काय जाहिरपणे करायची गोष्ट आहे का ? इथे मुंबईत तर ती एकदा सकाळची धुणी-भांडी आपटून ( आटपून ) नळाची अंगठ्याएवढी धार करंगळीएवढी व्हायच्या आत उरकून टाकायची गोष्ट आहे. पण मग हे असं काय ?



बहुदा तिथे आपल्यापेक्षाही पाण्याचे हाल असणार, त्यामुळे जुम्मे के जुम्मे आंघोळ करणार्‍या त्या षोडशेला एकदाचा आंघोळीचा मुहूर्त मिळाला म्हणून हे पंचोपचार. नाहितर उटणं काय आम्ही सुद्धा लावतो चार दिवस दिवाळीचे; पण आमची नाही कोणी अशी बडदास्त ठेवंत. उलट कधीमधी दिवसातून दोन वेळा आंघोळ केलीच तर....जास्त वापरल्याने साबण, गॅस गिझर वापरल्याने गॅसचा जास्त वापर आणि वॉशिंग मशीन वापरल्याने वाभाडेच निघतात आमचे.



तेव्हा मी सुद्धा अशीच जुम्मे के जुम्मे आंघोळ करून घरातल्यांना चांगलाच इंगा दाखवायचा विचारात आहे.



सध्या तरी मला हसवून माझा दिवसभराचा शीण घालवणार्‍या या दोनच जाहिराती. बाकी सगळ्या " पहलेसे और बेहेतर " असं म्हणून मूर्ख बनवण्याच्या लायकीच्या. म्हणजे " आधीचा आमचा कम बेहेतर माल वापरून संपवल्याबद्दल धन्यवाद, आता हाही नवीन बेहेतर माल वापरून संपवा म्हणजे आम्ही याच्यापेक्षाही बेहेतर माल तयार करून तुमचा खिसाही खाली करायला मोकळे " या धाटणीच्या.



लेखिका: माझी दुनिया

४ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

ही ही ही

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

हा, हा, हा! जुम्मे के जुम्मे! ती आंघोळीची जाहिरात लागली की माझी आईसुद्धा असंच म्हणत असे, "ही काय वर्ष-सहा महिन्यांतून एकदाच आंघोळ करते की काय?"

अय्या, त्या पॉटमधे हार्पिकची नक्षी काय छान दिसतेय! असं नाही बाई त्या जाहिरातीत दिसत कधी. मला तर हे कळत नाही की जरी एखादा फिल्मस्टार वा टीव्हीस्टार अशी शौचालय धुण्याच्या उत्पादनांची जाहिरात करायला लागला, तरी आपलं पिवळं पडलेलं शौचाल्य कुणाला स्वत:हून दाखवावंस वाटेल का? आणि डाग निघून गेल्यावर ’मजा आली’ काय? ’छान दिसतंय’ किंवा ’वा! अगदी लखलखीत’ असं म्हटलं तर जास्त चांगलं नाही का दिसणार? पण असो. आपण अशा जाहिराती पहायच्या आणि मनोरंजन करून घ्यायचं.

सुधीर कांदळकर म्हणाले...

मजा आली ला आम्हीं पण हसतों.

आंघोळ केलेलीला ओवाळणारी बहुधा सुनेचे कौतुक सासू असावी असें मला उगीचच वाटतें.

पण दोन्ही गोष्टी तेवढ्या गंभीरपणें घ्यायची गरज नाहीं. हंसायचें आणि सोडून द्यायचें. तुमचें लक्ष वेधून घेणें आणि लक्षांत राहाणें हाच त्या जाहिरातींचा उद्देश आहे आणि तो सफल झाला आहे.

मदनबाण म्हणाले...

काही जाहिराती पार डोक बाजुला ठेवुन पहायच्या असतात...मीठ खाल्ले की कलेक्टर...चुकीचा साबण वापरला तर आत्मविश्वासात कमी...इं
अशा जाहिराती बनवणारे लोक खरच क्रिऐटीव्ह असतात का असाच प्रश्न पडतो खरा... ;)