अजगर

मला प्राणी खूप आवडतात. पण सर्वच नाहीत. जमिनिवर, भिंतींवर किंवा कुठेही सरपटणारे प्राणी मला आजिबात आवडत नाहीत. किळस वाटते तसेच भितीही. विशेषतः सापांची.

तुम्ही म्हणाल ही तर `गद्रे` म्हणजे कोब्रा. तरीही सापांची भिती?
तर उत्तर आहे -- हो .

चायनिज कालगणतीप्रमाणे बारा प्राण्यांची नावे बारा वर्षांना दिली आहेत. ज्या वर्षी एखाद्याचा जन्म होतो त्या वर्षीच्या प्राण्याचे गुणधर्म त्या व्यक्तीत आढळतात असे चीनी लोक मानतात.
उदा: डॉग ईअरमधे जन्मलेली व्यक्ती प्रामाणिक असते किंवा ऑक्स ईअरमधे जन्मलेली व्यक्ती बैलासारखी कष्टाळू असते.
माझा जन्म झाला तेव्हा स्नेक इअर होते. चीनी मतांनुसार मी शांत स्वभावाची, आपापल्या वाटेने जाणारी. पण उगाचच डिवचल्यास मात्र फणा काढून दंश करणारी असायला हवी.
`तशी मी आहेच` असे माझे यजमान म्हणतात. आमच्या दोघांच्या भांडणात तर याचा उल्लेख हमखास होतो.
तर सांगायचा मुद्दा हा की मी कोब्रा असून आणि स्नेक इअरला जन्मलेले असूनही  मी सापांना भिते.

ही झाली पार्श्वभूमी.



आता खरी गोष्ट....
जेव्हा आम्ही अमेरिकेत आमचं स्वतःचं घर घेतलं तेव्हाची. सर्व कागदी व्यवहार पूर्ण झाल्यावर घर ताब्यात मिळालं. त्यानंतर सामान ने आण करायला किंवा इतर साफसफाई करून घेण्यासाठी
ब-याचदा तिथे जा ये चालली होती. एका संध्याकाळी काही कामासाठी या नवीन घरी गेलो होतो. आता पर्यंत इतकेदा तिथे गेलो-आलो.  कुणालाही याचं सोयर-सुतक नव्हतं.  तसं तर आमची आधीची मालकिण बरेच वर्षं राहून घर सोडून गेली तरी शेजा-या पाजा-यां ना काही वाटलं असेल असे आम्हाला जाणवलं तरी नाही.  तर आम्ही नविन आल्यावर कुणाला काय त्याचं?
असो. तर आम्ही एकदा तिथे गेलो असता आमच्या घराच्या उजवीकडच्या घरात राहणारा शेजारी बाहेर जाऊन घरी आला. त्याने गाडी त्याच्या गॅरेज मधे पार्क केली आणि काही तरी घेऊन घरात शिरलेलं मी त्याला पाहिलं, कारण गॅरेजचं दार त्याने अजून बंद केलं नव्हतं. नंतर लगेचच रिकाम्या हाताने बाहेर आला तो आमच्याच घराच्या दिशेने.
आम्हाला आमच्या गाडीतलं सामान घरात नेऊन ठेवायचं होतं. आम्ही घरापासून गाडीपर्यंत असं आत बाहेर करतच होतो. तो हात हलवत “हाय”, “हॅलो” करत आमच्या जवळ आला.
आम्ही बाहेरच थांबलो. आनंद झाला.
“चला! शेजार तरी बरा मिळाला” असं मनातल्या मनात म्हणून जरा सुखावलो.
“टिपिकल अमेरिकन गोरा असला तरी चांगला आहे हो” मी मनातच म्हटलं.
तो पुढे झाला. माझ्या यजमानांशी हस्तांदोलन करून आम्हाला `वेलकम` म्हणाला.
स्वतःची ओळख करून दिली. नाव, जॉब बद्दल थोडक्यात सांगितलं. आमची चौकशी मात्र बरीच केली.
आम्हाला काहीच गैर वाटलं नाही. खरं तर अगदी भारतात गेल्या सारखं वाटलं. तिथे नाही का शेजारच्या काकू, मामा, अण्णा आपणहून चौकशी करायला येतात. अगदी तस्सच.
कसं बरं वाटलं. गोरा असला तरी कसा आपलाच वाटला. देसी!
बाहेरच बराच वेळ गप्पा मारत उभा होता आमच्याशी.
आम्ही त्याला काही आमच्या घरात बोलावले नाही.
अहो, आमच्या घरात बोलावून काय करणार? बसायला खूर्ची तर हवी ना आमच्या त्या नविन घरात.
आमच्या घरात नव्हती, पण त्याच्या घरात तर असायलाच हवी होती.
इथे अमेरिकेत ना? कस्सच काय?
दोघांनीही एकमेकांना घरात बोलावले नाही.
बाहेरच गप्पा चालू राहिल्या.


बोलता बोलता त्याचा लहान मुलगा “डॅड, डॅड”करत काहीतरी सांगत आला.
“धिस इज माय सन.” पुढे काही तरी नावं ही सांगितलं.
आम्ही हसून त्याच्या कडे पहात त्याला “हाय” केलं. तो डॅड्च्या मागे गेला आणि हात डोळ्यासमोर घेऊन चेहरा लपवू लागला.
“ ही इज बिट शाय.” डॅड मुलाच्या पाठीवर थोपटत म्हणाला.
आम्हीही त्याच्या शाळेची चौकशी करायला लागलो. त्यावरूनच त्याच्या वयाचा विषय निघाला.
“टूडे हि बीकेम फाय. ईट्स हिज बर्थडे टूडे.”
आम्ही आनंदून ( निदान चेह-यावर तसे दर्शवून) “ओह, रिअली? हॅपी बर्थ डे” असं म्हणून त्या छोट्या गो-याला शुभेच्छा दिल्या.
छोट्याने चेह-यावर काहीही प्रतिक्रिया दर्शवली नाही. पण मागे फिरला आणि धावत घरात पळाला.
मोठा गोरा उत्तरला “ वुई हॅड गॉन टू गेट अ गिफ्ट फॉर हिम. वुई गॉट अ पेट. अ पायथन”


माझा हसरा चेहरा पार उतरला आणि मी विचारलं “व्हॉट? अ पायथन?”
या प्रश्नाचं उत्तर होतं “याह. सम थिंग अनयुजवल! ही वोंट पू, पी ऑन द कार्पेट. ईट्स अ‍ॅन इझी पेट.”
“बट वोंट इट बी डेंजरस फॉर युवर लिटिल किड्स?” माझ्या यजमानानांनी चकित होऊन काळजीच्या स्वरांत विचारलं.
“ ईट्स बेबी यट. जस्ट दॅट लाँग” दोन हाताच्या दोन्ही तर्जन्या एक फूट रूंदावत म्हणाला.
“सम टाईम्स आय मे ब्रिंग हीम आऊट, रॅप्ड अराउंड माय रिस्ट” गोरा म्हणाला.

माझी वाचाच बंद पडली हे ऐकून.
“ही इ़ज इन केज. डोंट वरी” गो-याला माझी भिती घाब-या घुब-या चेह-यावरून दिसली असावी.
फारसं पुढे न बोलता "बाय बाय" करून आम्ही संभाषण बंद केलं आणि आमच्या घरात शिरलो.

झालं! त्या अजगर नावाच्या पेटचं गिफ्ट आणलं शेजा-याने. पण हे ऐकून धाबं दणाणलं माझं.
अजब तर वाटलंच, कारण अजगर हा जंगली प्राणी. अजून पर्यंत प्राणीसंग्रहालयात पाळतात हे ऐकून आणि पाहून होते.
“इथे अमेरिकेत काय वाट्टेल ते चालतं हेच खरं!” यजमानांनी अमेरिकेवर कॉमेंट करायची संधी सोडली नाही.
“पण म्हणून जंगली विशालकाय प्राणी का कुणी पाळीव करतं? आणि आला म्हणजे सरपटत घराबाहेर?” माझे प्रश्न.
“ शेजारीच आपलं घर आहे. `या. बसा,`असं म्हण, आलाच तर.”  यजमानांनी एक कूल उत्तर फेकले.
माझी बोबडीच वळली. आतापर्यंत माझ्याच घरात एक अजगर शिरेल हा विचार मनात डोकावला ही नव्हता. मला काहीच सुचेना.

या नव्या घरी ये जा करताना त्या गो-याची गोरी बाहेर सिगरेट फूंकत मोबाईलवर बोलत असताना दिसायची. त्यांच्या घरच्या फ्रंट यार्ड मधे लहान सायकल, बास्केट बॉल, हेल्मेट लोळताना मी अनेकदा पाहिले होते. एकदा पावसातही भिजत पडलेले खेळ दिसले. रात्री-बेरात्री ते तसेच लोळत असतात हे ही माहित होते. ती गोरी फारशी कामसू आणि जबाबदार दिसली नाही.
कधी अजगराशी खेळता खेळता मुलांनी केजचं दार उघडं टाकलं तर ह्या बयेला कळणार ही नाही? तो सरपटत बाहेर पडेलच आणि थेट आमच्याच घरात येईल अशी आता माझी खात्री झाली.

“अजगर या त्याच्या नावात उकार, रफार किंवा साधी वेलांटी असलेलीही वळणं नाहीत. मग वाकड्या वळणाने तो इथेच कशावरून येईल? तो कदाचित सुतासारखा ही जाईल की सरळ तिथे पलिकडे.” माझ्या यजमानांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला.
पण माझ मन काही शांत राहिना. त्या रात्री स्वप्नात विविध रंगांचे, आकारमानाचे साप मला आजूबाजूला वळवळताना दिसले. अनेकदा मला जाग आली असं म्हणण्यापेक्षा क्वचित झोप लागली असं म्हणणं अधिक वास्तव ठरेल.
मला त्या अजगराच्या विषयाशिवाय दुसरं काही सुचेना.
मी ठाम ठरवलं की त्या शेजा-यांना पेट अजगराच्या पिंज-यासाठी एक कुलूप भेट द्यायचं आणि त्याची एकुलती एक किल्ली आपल्याकडेच ठेऊन घ्यायची.

दुस-या दिवशी घरात मी पुन्हा तो विषय काढला. माझ्या मुलाला आणि यजमानांना मी ही कुलूपाची आयडिया सांगितली तर त्यांनी मला फुल वेड्यात काढलं.
“मग काय कारायचं आता? पोलीस कंप्लेंट करूया का ?” माझं डोकं सुपर चाललं.
“त्यांनी लायसन्स घेतलं असेलच. कंप्लेंट करून काय होणार?  उगाचच शेजा-याशी वैर.”  ईति यजमान.

मी मात्र आता रडकुंडीस यायची बाकी होते. ते पाहून माझ्या घरातल्या दोन्ही मर्दांना चेव चढला.
“तू एका मोठ्या काठीला जाड चाकू बांधून ठेव. तो पायथन घरी आलाच तर खचाखच कापून पिसेस कर त्याचे.” मुलाची भन्नाट आयडिया.
“नको नको. सापाचं पालीसारखंच असतं. जितके तुकडे करशील ते सर्व वळवळत राहतात. पण तू कशाला घाबरतेस? अजगराला खायला दिलं की तो आळश्यासारखा दिवस दिवस झोपून राहतो.” यजमानांनी प्राणीशास्त्रातील अगाध माहिती मला पुरवली.
“ आपल्याकडे अजगराला खाऊ घालायला काय मिळणार? घास पत्ती? अजगर तर मांसाहारी प्राणी. आपल्या फ्रिजमधे कोंबडी तर सोडाच पण तिचं साधं एक अंड मिळण ही मुश्किल.”  माझी असहायता मी व्यक्त केली.
घरात मोठ्ठा हशा पिकला.
“ए मम्मा, पायथन काही फास्टेट रनिंग अ‍ॅनिमल नाही. तो सरपटत येईपर्यंत तू पळून जाऊ शकतेस की नाही?”  मुलाने जरा उपाय सुचवायचा प्रयत्न केला.
तो मला पटला नाही हे सांगायला हवं का?
तो अजगर सरपटत सरपटत समोर उभा ठाकला, नाही म्हणजे आडवा ठाकला तर मी थिजल्यासारखी होईन,  माझ्याच्याने एक पायही पुढे टाकवणार नाही आणि आम्ही दोघे ही एकमेकांकडे आ वासून पाहत राहू हे माझं मलाच ठाऊक होतं.
“घाबरून गाळण उडालेली मी, राहेन तिथल्या तिथे आणि तो मात्र झडप घालेल माझ्यावर.” माझी भिती मी व्यक्त केली.
“भारतात गेले की नक्की, गारूड्याकडे असते तसली एक टोपली आणि पुंगी विकत घेऊया.” असं म्हणून मी भारतातून आणायच्या वस्तूंच्या यादीत अजून एक भर टाकली.
“तू पुंगी वाजवलीस तर दूर जायच्या ऐवजी तो पायथन आणि शिवाय आजूबाजूचे अजून साप जमा होतील तूझ्या पुंगीच्या नादावर डोलायला.”  यजमानानांनी हाताचा फणा केला आणि तोंडाने फुत्कार काढून काढून मला फणा मारू लागले.
मी पुंगी आणायचा माझा विचार हद्दपार करून टाकला.
पण टोपली आणून ठेवावी असं मनातल्या मनात घोटून ठेवलं.

“अगं किती ते चर्वितचरण? तो एवढासा एक फूट भर. तू किती? साडे पाच फूटी. तो तूला करून करून काय करू शकेल?” आता मात्र यजमानांचा पारा चढलेला दिसला.
मी मनातल्या मनातच पुटपुटले, “तो आता आहे फूट भर. पण काही दिवसातच खाऊन पिऊन होईल की अंगापिंडाने मजबूत. चांगला दहा बारा फूटी माझ्या दुप्पट.”
लगेचच टोपलीचा विचार ही काढून टाकावा लागला. त्याला तर भलं मोठ्ठं पिंपं लागेल ठेवायला. तेच बघायला हवं कुठेतरी. असा विचार पक्का केला.

माझ्या मुलाने मला समजवण्याचा प्रयत्न सोडला नाही. “पप्पा तूला टिझ करतोय. पायथनला फणा नाही काढता येत. किंवा तो फुस्स फुस्स असं ही करत नाही नागासारखा.”
यजमानांनी हळूच वरती अजून मसाला ओतला. “हो. हो. तो बारिकसा दंश नाही करत. तो डायरेक्ट झडप घालतो. चांगला विळख्यात घेतो आणि... बस्स, मग गट्ट्म!”

शाळेत अभ्यासलेल्या सर्पज्ञानाची आठवण मला पुन्हा करून देण्यात आली.
“अजगर काही विषारी नसतो. पण त्याचा घट्ट पाSSश.. म्हणजे मृत्यू अटऽऽळ.” अजगराच्या माहितीची उजळणी केली जात होती.
“नाहीतर तू असं का नाही करत? तू एक बारिक धारदार  चाकू सतत जवळ बाळग. अजगराने तूला गिळलं तर तू त्याचं पोट फाड आणि जिवंत बाहेर ये.  मग `माझी शौर्यकथा` नावाचा लेख लिही. अगं, हे नाव पाहून कुणी एक जण तरी वाचेल तूझा लेख.”  कुचकट चेष्टेला गंभीर उपदेशाचे वेष्टण होते. अजगर हा विषय जास्तीत जास्त चटपटा होत आहे हे माझ्या ध्यानात यायला जरा वेळच लागला.

घरातून काही सहकार्य मिळणार नाही याची आता मला खात्री पटली. आपल्या भितीची इथे कुणालाही ना पर्वा ना गांभीर्य, हेही मला चांगलं कळून चुकलं.
“उगाचच आपल्या फिरक्या घेण्यासाठी विषय कशाला द्या?” असं म्हणून अजगराविरोधी कारवाया करण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा विचार विनिमय करण्यासाठी माझ्या घरातल्या सभासदांबरोबर मीच भरवलेल्या त्या सभेचा मी त्याग केला.

इंटरनेटवर जाउन अजगराविषयी अधिक माहिती गोळा केली.
जवळपासच्या दोन तीन स्नेक कॅचर्सचे फोन नंबर शोधून काढून तोंड पाठ करून ठेवले.
अजगरांना तोंड देऊन यशस्वी ठरलेल्या वीरांच्या अनेक साहस कथा वाचून काढल्या. त्यांनी अवलंबलेल्या सर्व ट्रिक्स पुरत्या समजून घेतल्या. तश्या प्रसंगाला तोंड द्यायचं बळ माझ्या मनात एकवटून ठेवलं.
चुकून पाय पडल्यावर जखमी होऊन वळवळणारे गांडूळ पूर्णपणे मारून टाकण्याच्या प्रयत्नात मी सध्या आहे. लवकरच ते मी शिकेन अशी आशा माझ्या घरच्या मंडळींना वाटते.

यदा कदचित अजगर आमच्या घरी बिन बुलाया आलाच तर त्याची चांगली मेहमान-नवाजी
करण्यासाठी मी हळूहळू तयार होते आहे.



लेखिका: मीनल गद्रे

५ टिप्पण्या:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

मस्त आहे कथा. अजगर (सॉरी त्याचं पिल्लू) बिट शाय असलं तरी आपल्याला त्याची भिती वाटणारच हो! शिवाय तो सरपटत आला तर पळून जाण्याची कल्पनाही मस्त आहे. फक्त ते त्यावेळेस आठवायला हवं ;-)

सुधीर कांदळकर म्हणाले...

“तू पुंगी वाजवलीस तर दूर जायच्या ऐवजी तो पायथन आणि शिवाय आजूबाजूचे अजून साप जमा होतील तूझ्या पुंगीच्या नादावर डोलायला.”

झकास. मी पुंगीचा खर्च देईन.

मस्त लेख. आमच्या चि. चा एक मित्र साप अजगर वगैरे पकडतो. त्याचा तोछंद आहे आणि प्रशिक्षणहि घेतलें आहे. सध्या तो जर्मनीत आहे. हवा तर दूरध्वनि देतो त्याचा. फक्त तो पोहोचेपर्यंत अजगराला धरून ठेवायचें काम तुमचें.

मदनबाण म्हणाले...

हे अमेरिकन लोक काय काय पाळतील याच काही नेम नाही,,,तुम्ही मात्र भलताच धसका घेतलेला दिसतोय... ;)

नरेंद्र गोळे म्हणाले...

लेख छानच रंगवला आहे. आवडला.

संकेत आपटे म्हणाले...

अजगराला भिऊन तुम्ही गांडूळ मारण्याची प्रॅक्टिस करताय?? भारी...