असाहि चेंडूफळी सामना

साल १९७०च्या आसपास. स्थळ रूपारेल कॉलेज. दरवर्षी एक खास सोहळा होत असे. क्रिकेटचा सामना. प्राध्यापक विरुद्ध विद्यार्थी. पण मुख्य आकर्षण असे भाऊ तोरसेकरचे लाऊडस्पीकरवरून मालवणीतून केलेले धांवतें समालोचन. पिअर्सन सुरीता, विजय मर्चंट, डिकी रत्नागर, आनंद सेटलवाड, जॉन आर्लोट, व्ही एम चक्रपाणी, देवराज पूरी, ब्रायन जॉस्टन, रिची बेनॉ, ऍलन मॅकगिलवरी, क्रिस्तोफर मार्टिन जेनकिन्स, सऽऽगळे समालोचक त्याचे गुलाम शोभतील अशी ओघवती रसाळ रसवंती. भाषेचा अडसर अजिबात नाहीं. मधूनच जसदेव सिंगसारखी हिंदी, कधीं विजय मर्चंटचे शुद्ध तुपातलें इंग्रजी तर कधीं जॉन आर्लोटचें नाहींतर हेन्री ब्लोफिल्डचें बोबडें अनुनासिक ब्रिटिश इंग्रजी, कधीं मुंबईची शहरी मराठी, कधीं कोल्हापुरी बोलीचा ठसका, मधूनच गुजराती डोकावे तर कधीं पी. आनंद रावचें दाक्षिणात्य उच्चारातली इंग्रजी. सतत अशी विविध भाषांतली खमंग चुरचुरीत मिसळ कानीं पडे. समालोचक खेळाडूंना सल्ला देण्यापासून कांहीहि वटवट करे. समालोचनाचा विषय क्रिकेटच असे असें नाहीं. थोडा नमुना आपल्यासाठीं सादर करीत आहे.



आज सोनियाचो दीस आसा. आजचो सूर्य कायतरी येगळोच रंग घेऊन इलेलो आसा. होळ्येचो दीस जवळ इलो म्हटल्याऽर रंग घेऊन येऊक नुको?  आज आसा चेंडूफळीचो सामनो. पोर्फेस्वर विरुद्ध इद्यार्थी. आणि सामनो बघूक इले असत समस्त रूपारेलच्या चेडवा आणि झिलगे. चेडवांनी कापडां अशी घातलली असत की काय पण इचारूक नुको. रंभा आणि मेनका पण झक मारतीत त्यांच्याफुडे. ती समोरच्या कट्ट्यावर बसली असा बघा थंयसर. ती तर आपली कॉलेज क्वीन मिस रुपा. आर्टसच्या तिसर्‍या वर्षाक आसा. ती केवा ना केवा सिनेस्टार होतली. मी सांगतय तुमका. माझो शब्द म्हंजे धनंजयाचो बान. धनंजय म्हंजे आपलो अर्जुन. म्हाभारतातलो. तिच्या बाजूक बसल्या असत त्या असत चांडाळचौघी. झिलग्यांनी तेंका नावा ठेवलली असत. ल्हान माजी भावली, मोठी तिची सावली, नकटे नाक उडवीते आणि घारे डोळे फिरवीते. या पण आर्टसच्या तिसर्‍या वर्षातल्या. तिच्यामाघारी उभी आसा माऽऽ, ती निळो झगो घातलली, ती बुटकी नाय, तू नको गे रंभे हात वर करूस, ती इंपाला विदाऊट हेडलाईट! ही आसा मिस चंदा. हात वर कर गे भवाने. मोडलो काय गे हात तुझो? की कानाची बुराका झाली? हां! तूच गेऽऽ तूच! अस्सो हात करूक होयो! लाजतंस कित्याक? काजार नाय काडुक तुझां. त्यांच्या बाजूक जे झिलगे उभे दिसतत, ते मांयझये अजून चेडवांकाकच बघतत. शिरा पडो मेल्यांच्या तोंडाऽऽर! रेऽऽ मांयझयांनुं, म्याच बघूक इलांस का चेडवांका बघूक? वर्षभर बघूक नाय की काऽऽय त्यांका? म्याच बघा रांडिच्यांनूं. तो लाल शर्टवालो दिसतां, तो आसां जी. एस.  तो निळी जर्सी घातललो दिसतां मा, तो आसा एसेफयू चो मुंबईचो अध्यक्ष. (अचानक आवाज बदलून एकाची नक्कल करीत) ऍंड यू बॉईज, व्हाय आर यू पुलिंग सिग्रेट्स ऍंड थ्रोईंग स्मोक इन व्हरांडा? डोंट ब्रेक डिसिप्लीन ऑफ अवर कॉलेज. (पुन्हां आपल्या आवाजांत) तां आसांदे. मी हयसर कॅन्टीनच्या दारात बसून कामेट्री करतय. आता पीच कसां आसात तां आपणाका विजय मर्चंट सांगतीत.



(विजय मर्चंटच्या आवाजात) थॅंक यू भाऊ. इट इज अ हार्ड रेड स्ट्रिप विथ व्हेऽऽरी लिट्ल ग्रास ऍंड होल्ड्स ऑलमोस्ट नो मॉइस्चर. द विकेट विल हेल्प मीडिअम पेस बोलर्स हार्डली ड्यूरिंग द फर्स्ट अवर, ऍंड देन इट विल स्लो डाऊन ऍज द गेम प्रोग्रेसेस, ऍंड विल बिकम प्लॅसिड आफ्टर लंच. हाऊएऽऽव्हर द लेग स्पिनर्स विल गेट सम हेल्प फ्रॉम द बोलर्स फूट्मार्क्स आफ्टर टी. 
द कॅप्टन हू विन्स द टॉऽऽस, विल चूऽऽझ टु बॅट फर्स्ट.
ओव्हर टू यू जॉन आर्लोट फॉर द रनिंग कॉमेंटरी.



(जॉन आर्लोटच्या आवाजांत) थॅंक यू विजय. व्हेरी फाईन ब्राईट सनी मॉर्निंग. स्टेडिअम पॅक्ड विथ एन्थ्यूझिऍस्टिक क्राऊड इन कलरफुल अटायर्स. टू कॅप्टन्स, डॉ. नाना भिडे ऍंड अवि कर्णिक, अप्रोचिंग द विकेट विथ अम्पायर फॉर द टॉस.  हीअर द अंपायर टॉसेस द कॉईन ऍंड डॉ. नाना भिडे कॉल्स.
 द टॉस इज वन बाय हिम ऍंड ऍज विजय प्रीडिक्टेड, डॉ. नाना भिडे इलेक्ट्स टू बॅट फर्स्ट.
ओव्हर टु यू भाऊ.



अवि कर्णिक फिल्डिंग लावताहा. विकेट कीपर दूर मागे उभो आसा, तीन स्लीप, एक गली, कव्हर पॉईंट अशे सऽऽवा झिलगे ऑफ साईडाक आणि मिड ऑन, स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग अशे तिघे ऑन साईडाक. मिड ऑनसून स्क्वेअर लेगपात्तुर एकपण झिलगो नाय कारण थयसर एकपण चेडवा नसा. चेडवा नसा तर बॉल कोण मारतलो थयसर! फास्ट बोलर पयलो बॉल टाकूक तय्यार. पयलो बॅटसमन आसा गोलमटोल फाटक सर. उंची पाच फूट आणि जाडी पण पाचच फूट.
बॅटसमन आसा का फुटबाल तांच कळूक नाय.  अंपायर आसा आपल्या हपिसातलो श्रीयुत इंग्लीशचो पापड.  अंपायर केदो मोट्टो पांढरो डगलो घालून इलो आसा.   पांढरो डगलो, काळी इजार, पांढरे जुते आणि बोडक्याऽऽर हीऽऽ एदी मोटी पांढरी ह्याट.   मेंदूचा काम ह्याटच करतली असां वाटतां.
बोलरा रेऽऽ, अगोदरच तुका सांगान ठेवतंय, वाईच बेतान टाक हां बॉऽऽल, फाटक सरांका लागलो तर फाटानच जाईल की त्यांची!  म्हंजे  इजार, बुडातसूनच फाटान जाईत.  मग तुका फेलच करतीत हां ते! सांगान ठेवतंय!


पयलो बॉल टाकलो आसा, ऑफ स्टंपाच्या भायेर, फाटक सरांनी बॅट फिरवल्यानी पण बॅटीक बॉल लागूक नाय. विकेट कीपर बांदिवडेकरान आपला काम चोख केल्यान आणि बॉल पकडून परत बोलरकडे दिलो.  दुसरो बॉल.  स्टंप खंय, बॉल खंय!  बोलरा रे, मांयझया संबूर स्टंप दिसतत की चेडवा दिसतत?  पुन्ना बॅट फिरवल्यानी.  बॅटीच्या कडेक लागून बॉल गेलो स्लीपमदे.  स्लीपमदलो झिलगो बघतांहा पोरींका आणि बॉल गेलो चौका पार करून.  कपताना रेऽऽ, स्लीपमधलो झिलगो बदल आणि दुसरो ठेव थयसर.  ह्याचा काय खरां नाय.  सरांचो स्कोर झालो चार.  बिनाविकेट.  तिसरो बॉल.  हो सोडान दिलो आणि बांदिवडेकरान पकडलो.  चौथो बॉल.  सरांनी तो ढकललो मिडॉफाच्या बाजून आणि धावले.  समोरचे शिंदे सर काय धावूक नाय.  रन आऊट होतीत म्हणान.  फाटक सर परत फिरले.  एक चान्नस होता तेंका रन आऊट करूचो.  पण करूक नाय.  परीक्षेत नापास केल्यान तर?  पाचवो बॉल पुन्ना सोडान दिलो.  सऽऽवा बॉल.  ढकललो मिडॉनाक. या बोलाक रन काढूचा चान्नस होतो पण काढूक नाय कारण शिंदे सरांका फुडल्या ओव्हराक बॅटिंग करूची आसा.



(जसदेवसिंगच्या आवाजांत) और ये ठुमकती लचकती बल खाती चाल से आ रही है सायन्स कॉलेज की रूपसुंदरी मिस चंदिरामानी. आईये, पधारिये, आपकाही इंतजार था. देर आई दुरुस्त आई. आवो मणिबेन, तमे पण आवो! ऐंयां तमारो स्वागत छे! ढोकळो बकळो बनावीने लाव्यो के? नथी लाव्यो तो पण चालसे. अमारा आटला बधा ना दिल मां तमारी माटे जग्या छे! (पुन्हां स्वतःच्या आवाजांत) आणि आतां दुसरी ओव्हर टाकूक दुसरो बोलर तय्यार. ......



असें रसाळ समालोचन संध्याकाळीं साडेचार पावणेपांच वाजेपर्यंत सामना संपेपर्यंत चालू असे. सरावांत असलेले कसबी विद्यार्थी खेळाडू सामना संध्याकाळपर्यंत संपणार नाहीं याची मात्र दक्षता घेत. प्राध्यापक खेळाडूंच्या लकबी, वैशिष्ट्ये, प्रेक्षकांतल्या रूपारेलच्या स्टार विद्यार्थिनी कॉलेजकन्यका, त्यांच्या वेषभूषा, त्यांच्या लकबी, त्यामुळें समालोचन आणि बरोबरच सामना रंगतदार होत जाई. विद्यार्थ्यांच्या चमूतून यष्टिरक्षक सुभाष बांदिवडेकर, फलंदाज अवि कर्णिक, ऑफ स्पिनर मुळे, लेग स्पिनर करंदीकर आणि लेग स्पिन व गुगलीचा जादूगार मुल्हेरकर यांची ठळक नांवें लक्षांत आहेत. हा चमू मुंबईतल्या आंतर कॉलेज क्रिकेट स्पर्धेंत दादा संघ होता. बहुधा सिद्धार्थ विरुद्ध रुपारेल असाच अंतिम सामना ब्रेबर्न स्टेडियमवर होत असे. वानखेडे स्टेडियम १९७४ सालीं झालें. असो. हा सामना रंगवण्याचें काम खेळाडू तर करीतच पण समालोचनामुळें सामना रंगण्याचें हें क्रिकेट जगातलें एकमेव उदाहरण असेल.



अशी ही रनिंग कॉमेंटरी चाले आणि मॅच रंगतदार होई.


लेखक: सुधीर कांदळकर

६ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

सुधीर मस्त लिहिलं आहे.
आमच्याकडे पण एक वल्ली आहे अशीच कामेट्री करणारी. खूप मजा मजा करतो तो.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

स्टंप खंय, बॉल खंय! बोलरा रे, मांयझया संबूर स्टंप दिसतत की चेडवा दिसतत?
- सही आहे!
जबरी मालवणी आहे.

सुधीर कांदळकर म्हणाले...

दोघांनाहि धन्यवाद

मदनबाण म्हणाले...

मला स्वतःला मालवणी भाषा फार फार आवडते,त्यामुळे वाचायला जाम मजा आली... :)

संकेत आपटे म्हणाले...

धमाल कॉमेंटरी आहे. मजा आली वाचताना. मस्तच. मालवणी ही माझीही आवडती भाषा आहे. ऐकायला मजा येते.

vyankatesh म्हणाले...

कसली कॉमेंट्री आसा हसान हसान पोट दुखता