हत्ती आणि मुंगीचा बदललेला विनोद

हत्ती आणि मुंगीचा बदललेला विनोद
हा किस्सा घडला माझ्या एका डबींगच्या वेळेस! आम्ही बरेच डबींग कलाकार त्या दिवशी एकत्र भेटलो. माझी रुपाली नावाची एक मैत्रीण आपल्या आठ वर्षांच्या मुलीलाही सोबत घेऊन आली होती. अबोली तिचं नाव! नाव अबोली पण अखंड बडबड करायची. रूपालीची ही बडबडी लेक थोड्याच वेळात आम्हा सर्वांची लाडकी झाली. आमच्यासोबत बडबड करता करता चित्रकलेचं सामान, गोष्टींची पुस्तकं असा बराच पसारा अबोलीने स्टुडीओच्या एका कोप-यात मांडून ठेवला. पण तिलाही बहुधा आमच्याशी गप्पा मारायला आवडत होत्या.एक लहान मुल मोठ्यांच्यात असलं तर मोठेही लहान होतात. अगदी तसंच झालं. अबोलीने आमच्या पैकी कुणालातरी पकडून एक कोडं घातलं. मग दुसरं कुणीतरी तिच्या तावडीत सापडलं. तिची कोडी आणि त्यांची भन्नाट उत्तरं आम्हाला एवढी आवडली की हळू हळू करत सगळेच एकमेकांना कोडी घालू लागले. नंतर कुणीतरी पी.जे. सुरू केले.पी.जे. वरून प्रवास करत करत आमची गाडी हत्ती आणि मुंगीच्या विनोदांपर्यंत येऊन पोहोचली. डबींगचं नव्वद टक्के काम पूर्ण झालं होतं. जेवणाच्या सुटीनंतर फारसं काही काम नव्हतंच मोठी माणसंच जर लहान मुलांसारखी वागू लागली, तर अबोली तरी कशाला मागे रहाते? तिने मला एक हत्ती आणि मुंगीचं कोडं घातलं.."सांग बरं मावशी, हत्तीच्या समोर पिवळ्याधम्मक केळ्यांचा घडच्या घड पडून असतो, तरी हत्ती का बरं खात नाही?""अं.... हत्तीला भूक नसते.""नाय..""त्याला केळी आवडत नसतात.""... असं कधी होतं का? हत्तीला तर केळी आवडतातच."अबोलीने तेवढ्यात माझ्या सामान्यज्ञानात भर टाकली.

"अं.... मग हत्तीचा उपास असेल."
"नाहीच मुळी. बघ, हरलीस....?"सहजासहजी हार मानायला मन तयार नसलं तरी मोठ्या माणसाला हरवल्यानंतर लहान मुलांच्या चेहे-यावर दिसणारा आनंद पहाण्यासाठी कोणताही मोठा माणूस रोज हरायला तयार होईल."बरं, हरले.""हरलीस...?" अबोलीने पुन्हा तोच प्रश्न आनंदाने चित्कारून विचारला."हो." मी पुन्हा उत्तर दिलं."लॉक किय़ा जाय?"मी तिच्याकडे कौतुकाने पहात म्हटलं, "हॉं लॉक किया जाय.""अगं मावशी, हत्तीला खूप भूक लागूनसुद्धा हत्ती तो केळ्यांचा घड खात नाही, कारण केळी प्लास्टीकची असतात."माझ्या चारही बाजूंनी हास्याचे धबधबे कोसळल्यावर मला लक्षात आलं की सगळेजण त्यांचे हत्ती आणि मुंगीचे विनोद बाजूला ठेवून अबोली काय कोडं घालते इकडे लक्ष देत होते. मला चांगलंच मूर्ख बनवलं होतं त्या पोरीने. तिच्या खुदूखुदू हसण्यामुळे मलाही केव्हा हसू फुटलं मला कळलंच नाही. त्यानंतर हत्ती आणि मुंगीवरचे निरनिराळे विनोद शोधून काढायला नुसता ऊत आला होता.हत्तीला पायात पाय घालण्यासाठी मुंगी झाडामागे काय लपते, हत्ती एकटा भेटल्यावर ती ’जाने दो, अकेला है’ म्हणत आपल्या मैत्रीणींबरोबर काय निघून जाते.. कहर, कहर केला आम्ही सगळ्यांनी. अगदी विनोद मिळाला नाही, तर आम्ही स्वत:च विनोद तयार करून करून स्वत:च त्यावर हसत होतो. अबोलीला या सगळ्याची अगदी मज्जाच वाटत होती. पण पुन्हा त्या पोरीने बॉम्ब फोडला आणि याही वेळी तिचं टार्गेट मीच होते."मावशी, मला सांग. मुंगी हत्तीच्या कानात असं काय सांगते की ज्यामुळे हत्ती चक्कर येऊन पडतो?"आता आली का पंचाईत? ह्या प्रश्नाचं उत्तर माहित नाही सांगावं तर अबोली उत्तर देणार. माहित आहे असं सांगावं, तर उत्तरच असं की सगळ्यांसमोर आपली अवस्था अवघडल्यासारखी होणार. एव्हाना सगळ्यांपर्यंत अबोलीचा प्रश्न पोचला होता.प्रत्येकजण आपापल्या जागेवरून माझ्याकडे गालातल्या गालात हसत पहात होता. रूपालीची अवस्था आणखीनच वाईट."ए, चिनू, राहू देत तुझे ते जोक्स आता.""हा लास्ट... हा लास्ट..." असं म्हणत अबोलीने पुढे घोडं दामटलंच."सांग ना मावशी, मुंगी हत्तीच्या कानात असं काय सांगते की ज्यामुळे हत्ती चक्कर येऊन पडतो?"अशी परिस्थिती माझ्यावर आली म्हणून मी वैतागलेही होते आणि अबोलीचा प्रश्न मला हसायलाही लावत होता. शेवटी मीच तिला म्हटलं."तूच सांग, मी हरले.""अगं, मुंगी म्हणते की आज माझ्यासोबत डेटवर येशील का?"मीच काय सगळेच अबोलीकडे चकीत होऊन पहात होते. हे उत्तर कुणालाच अपेक्षित नव्हतं. कुणीतरी अगदी व्यवस्थितपणे त्या विनोदामधे बदल करूनही विनोदात चैतन्य कायम ठेवलं होतं. मी मनोमन त्या अनाम व्यक्तीचे आभार मानले. आम्हाला सर्वांनाच तो बदललेला विनोद आवडला होता आणि ज्या व्यक्तीने तो विनोद बदलला होता, त्या अनाम व्यक्तीबद्दल कौतुकही वाटलं.लेखिका: कांचन कराई

***********
काही वाचकांच्या खास मागणीवरून हाच लेख इथे ध्वनीमुद्रित स्वरूपात देत आहोत.
वाचन स्वत: कांचन कराई हिनेच केलंय.     Get this widget |     Track details  |         eSnips Social DNA   

८ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

हॅहॅहॅ. सही आहे हो ती लहान मुलगी.तुमचा जाम पोपटच केला की.
कांचनताई, तुम्ही डबिंग करता ना मग तुमच्या आवाजात ऐकायला आवडला असता हा प्रसंग.


:सायली

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

सायली. सुरूवातीला या कथेला ध्वनीस्वरूपात प्रकाशित करायचं असंच ठरलं होतं परंतु काही कारणास्तव मला हा प्रसंग लिहून द्यावा लागला. मात्र ती ध्वनीफीत ऐकण्यासाठी उपल्बध आहे. या दुव्यावर गेल्यास आपण हाच लेख माझ्या आवाजात ऐकू शकाल. हा प्रसंग आठवला की मला अजूनही माझ्या सहका-यांचे चेहेरे आठवतात.

सुधीर कांदळकर म्हणाले...

मस्त निरागस खेळीमेळीचा प्रसंग आणि प्रसन्न शैली. वा!

सुधीर कांदळकर

मदनबाण म्हणाले...

विनोद बदलणार्‍याचे खरचं आभार मानायला हवे !!! ;)

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

कांदळकर साहेब,
ती मुलगी इतकी निरागसपणे कोडी घालत होती की काही कोड्यांची उत्तरं माहित असूनही मुद्दाम दिली नाहीत. प्रत्येक वेळेस उत्तर मिळालं नाही की ती, "बघ, हरलीस ना!" असं म्हणायची. ते खूप गोड वाटायचं ऐकताना.

अमेय,
अरे जेव्हा तिने प्रश्न विचारला तेव्हा सगळे एकदम चिडीचूप झाले. सगळ्यांची विकेट पडली होती. तिने उत्तर दिल्यावर जे काही सर्वजण फुटले होते... काही विचारू नकोस.

Meenal Gadre. म्हणाले...

ध्वनीमुद्रित केलेले ऐकायला मजा आली. तू समोर बसून सांगते आहेस असं वाटलं.
मस्त.
मीनल

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

धन्यवाद मिनल आणि कांदळकर साहेब.

saisakshi म्हणाले...

Majja ali vachtana an aiktana pan..:-)