संपादकीय!

नमस्कार मंडळी. हिवाळी अंक ’शब्दगाऽऽरवा’ नंतर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत..
होळी विशेषांक ’हास्यगाऽऽरवा .’ :D
रोजच्या धकाधकीच्या जीवनात चार क्षण निखळ आनंदाचे असावेत म्हणून हा उपक्रम.
ह्या अंकाचा विषय आम्ही निखळ विनोद असा ठेवलेला आहे. ह्यामध्ये उपहास, फिरकी, फजिती वगैरे वगैरे विनोदाचे विविध रंग आपल्याला वाचायला मिळणार आहेत. तसेच मुखपृष्ठावर आमचे एक तरूण व्यंगचित्रकार मित्र श्री. मीनानाथ धस्के ह्यांच्या कुंचल्यातून उतरलेले एक मार्मिक चित्र आम्ही देत आहोत. इथूनच आपली हास्ययात्रा सुरु होणार आहे.

करूण कहाणी ऐकवून रडवण्यापेक्षा, विनोद करून लोकांना हसवणे किती कठीण असते हे ह्या निमित्ताने समोर आलेले एक ढळढळीत वास्तव आहे.
त्यामुळेच आम्ही केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देतांना बहुतेक सिद्धहस्त लेखकांनी असे काही लिखाण जमत नसल्याची प्रत्यक्ष कबूली दिली आणि ह्या अंकाला मिळालेल्या मर्यादित प्रतिसादाने त्यावर शिक्कामोर्तब झाले असे म्हणता येईल. तरीही आम्ही आपल्याला हसवण्याचा विडा उचललेला आहे; त्यात आम्ही कितपत यशस्वी झालोय हे आपणच सांगा.

आमच्या अंकातील लेख, कथा वाचून आपल्या  चेहर्‍यावर एक जरी स्मितरेषा उमटली तरी आम्ही आमच्या कामगिरीत यशस्वी झालो असे समजू.  :)
आणि समजा,समजा बरं का... आमचा हा प्रयत्न आपल्याला अगदीच ’हास्यास्पद’ वाटला तरीही आम्ही यशस्वी झालो असे समजू.  ;) 
कारण, कसेही करून आपल्या चेहर्‍यावर हसू फुलवणे हे आमचे ब्रीद आहे आणि ते आम्ही फुलवणारच.  :)

तेव्हा आता वाचा आणि हसा....हाऽऽऽ हाऽऽऽ हाऽऽऽ

होळीच्या सर्व रसिक वाचकांना रंगीबेरंगी शुभेच्छा.


विशेष निवेदन: ह्या अंकातल्या लेखांमधील सर्व चित्रे महाजालावरून साभार.

वसतीगृहातील गंमतीदार आठवणी

एखाद्याला शिकण्यासाठी जेव्हा वसतीगृहात रहावयास जावे लागते तेव्हा घरच्या लोकांपासून दूर राहिल्याचे अर्थात वाईट वाटतेच. पण वेगळ्या एका जगात राहिल्याचा अनुभवही मिळतो. मग त्यात एकत्र राहून आणि मोठे कोणी रागवायला नसल्याने गंमती करण्यालाही मोठा वाव मिळतो. माझ्या अशाच काही गंमतीदार आठवणी इथे सांगत आहे.




अभियांत्रिकी महाविद्यालयात असताना, पहिल्या वर्षाचे वसतीगृह हे महाविद्यालयाच्याच आवारात होते. आमच्या खोलीच्या खिडकीतून महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता दिसायचा. रस्ता दिसायचा म्हणजे महाविद्यालय लांब नव्हते, समोरच होते.  त्या रस्त्यानेच समोर उजवीकडे महाविद्यालय, डावीकडे उपहारगृह (कँटीन हो).  परीक्षेच्या आधीचे अभ्यासाच्या सुट्यांचे दिवस. नगर जिल्ह्यातील उन्हाळा म्हणजे तसा कडकच. (थंडी ही तशीच कडक.)  दुपारचे जेवण झाले होते.  नंतर थोड्याफार गप्पा मारून अभ्यास करत होतो.  तेव्हा आमच्यातील एकाला गंमत करायची हुक्की आली.  बाहेर एक मुलगा महाविद्यालयाच्या दिशेने चालला होता.  'शुक शुक' आमच्या खोलीतून आवाज गेला.  बाहेरच्या त्या मुलाने मागे वळून पाहिले. कोण दिसणार आहे?  निघून गेला तो.  पुन्हा दुसर्‍या मुलावर ही तीच क्रिया. त्याचीही तशीच प्रतिक्रिया. आमचे हे काम सुरू.  काही मुले न वळताच निघून जायची.  काही वळून बघायची.  एकाची तर गंमत झाली.  तो मागे वळून बघतोय.  कोणी दिसले नाही.  ऊन येत असल्याने डोळ्यांच्यावर कपाळावर हात ठेवून पहायचा प्रयत्न करत होता.  "ए, कोण आहे रे?" शेवटी तो कंटाळून निघून गेला. मी मित्राला म्हटले, 'बस झाले'.  पण मग त्याने पुन्हा 'शुक शुक' केले.  पाहतो तर आमच्या वसतीगृहाचे सर मागे वळून पाहत होते. काही झाले नाही.  पण पुन्हा शुक शुक नाही केले कोणी.



अशीच गंमत दुसर्‍या एका मुलाने त्याच्या खोलीतून केली. मी त्याच्या खोलीत बसलो होतो. काहीतरी विषयावर बोलणे चालले होते. एवढ्यात ह्याने हाक मारली." ए ____", इथे ___ म्हणजे एका मुलाचे आडनाव. 
मी विचारले;  'काय झाले?'
हा म्हणतो, "काही नाही, गंमत."
 बाहेरून आवाज आला, " कोण आहे रे?"
आम्ही काही उत्तर दिले नाही. ह्याने पुन्हा हाक मारली.  बाहेरून पुन्हा तोच प्रश्न. जवळपास अर्धा तास हीच गंमत. आम्ही शांत झालो असतो, पण तो काही विचारणे सोडत नव्हता.  कोणी ही येत असेल त्याला 'ए, तू हाक मारलीस का?' विचारत होता. शेवटपर्यंत त्याला कळले नाही कोण हाका मारत आहे ते.  :)



पहिल्या सत्राच्या परीक्षेच्या आधीच्या सुट्ट्यांचे दिवस. एका संध्याकाळी मी दुसर्‍या विंग मधून स्वत:च्या खोलीकडे येत होतो. आमच्या विंग मधून जोरजोरात आवाज येत होता मुलांच्या ओरडण्याचा. 'ए ए..ए ए' करत.  वाटले कोणावर तरी कोणी ओरडत असेल काही केले म्हणून.  पण खोलीपर्यंत येईपर्यंत आवाज वाढत गेला. एक एक करत सर्व खोल्यांमधून मुले बाहेर येऊन ओरडायला लागली. आता खरं तर प्रत्येक विंग मध्ये प्रत्येक मजल्यावर कोणी ना कोणी सर 'रेक्टर' म्हणून राहत असतात. पण त्यांची परत येण्याची वेळ साधारणतः जेवणाच्या नंतरचीच म्हणजे ७-८ च्या नंतरचीच धरायची.  इथे मुलांचे ओरडणे ही जेवणानंतरच सुरू झाले होते.  पण वसतीगृहात बहुधा एकही रेक्टर नव्हते.  त्यामुळे हा आवाज वाढतच गेला, आणि दोन्ही विंग मधून.  आवाज का कोणी सुरू केला काहीच माहित नाही.  काही मुलं अभ्यासाला वाचनखोलीत गेलेली होती त्यांनी रात्री आल्यानंतर सांगितले की, कॉलेजच्या आवाराच्या मुख्य द्वारापर्यंत तो आवाज येत होता.  शेवटी काही सर व सुरक्षारक्षक आले त्यानंतर तो आवाज थांबला होता.



ह्यानंतर, एका रात्री मी अभ्यास करून झोपण्याच्या तयारीत होतो. रात्रीचे २:३०-३:०० वाजले असतील. पलंगावर आडवा पडणार तोच 'ढूम्म्म्म्म्म' असा मोठ्ठ्याने आवाज झाला.  सुतळी बॉम्व फुटला होता. संडासात कोणीतरी बॉम्बला उदबत्ती लावून टाईमबॉम्ब बनवला होता. (पण अर्थातच कोणी लावला ते कळणार नव्हतेच.)  सर्व पोरं बाहेर धावत आली.  माझा खोलीतील मित्र झोपेतून उठून धावत सुटला होता.  त्याला नंतर विचारले, 'असे का', तर तो म्हणाला, स्वप्नात होता आणि अचानक आवाज आला. त्याला वाटले की वसतीगृहाची पाण्याची टाकीच फुटली की काय?  :)



खानावळीतील जेवण म्हणजे एक प्रकारचे दिव्यच. पहिल्या २/३ आठवड्यातच माझा खोलीमित्र म्हणाला होता की, 'हे लोक असे अर्धे कच्चे जेवण देतात. ह्याची सवय झाली तर घरी गेल्यावर चांगले, पूर्ण शिजलेले जेवण खाऊन पोटात दुखायला लागेल.'  पोळ्या तर पाहूनच वाटायचे की कणकेचा गोळा थोडासा भाजून दिलाय.  तसे पोळी गरम असली की खाल्ली जायची.  पण थंड झाली की.... त्यामुळे स्वयंपाकघरातून पोळी घेऊन कोणी वाटणारा आला की सर्व तुटून पडायचे.  मग एखाद्याला दुसरे काही घ्यायचे असेल आणि ताटात चांगली पोळी असेल तर तो मग भाजीचा रस्सा त्यावर ओतून/लावून जायचा, त्यामुळे कोणी ती पोळी उचलणार नाही.  :)



जेवणावरून आठवले.  रविवारी आम्हाला खास जेवण असायचे.  म्हणजे मांसाहारी किंवा मग शाकाहारी मध्ये ही खास पनीरची भाजी, श्रीखंड, पुरी वगैरे. आणि रात्री जेवण नसायचे.  त्यामुळे मुलांना गावात जेवायला जायला लागायचे, जे २ किमी दूर होते.  म्हणून आमच्या कॉलेजच्या कँटीन मालकाने मुलांना तिथेच रात्रीचे जेवण द्यायचा विचार केला. १५ रू त अमर्यादित.  मुलांनी त्याचा फायदा घेण्यास सूरूवात केली.  पण एकदा एका मुलाने त्या अमर्यादित थाळी मध्ये एवढे खाल्ले की पुढच्या वेळेपासून त्यांनी ते देणेच बंद केले. असेही ऐकले आहे की ह्याच मुलाने एकदा खानावळीत जेवण झाल्यानंतर, फक्त पैज लावली म्हणून एक पूर्ण घमेलाभर भात खाऊन संपवला होता.



होळीच्या वेळी आम्हाला महाविद्यालयाने सुट्टी नव्हती दिली म्हणून सर्व मुलांनी ठरवले की आपणच जायचे नाही.  त्यांनी वसतीगृहाचे मुख्य द्वारच बंद करून ठेवले जेणेकरून कोणी बाहेर जाऊ शकणार नाही.  मला आणि काही जणांना हे काही माहित नव्हते.  आम्ही ही वर्गात जाऊन बसलो होतो.  बरं, सर्व मुले त्याच वसतीगृहातच राहत होती असे नाही.  पण बाहेरून येणार्‍या मुलांनाही अंदाज आलाच होता की मुलांनी न यायचे ठरवले आहे ते.  पण कळले की कोणी येत नाही, म्हणून कोणी शिकवायला यायच्या आधीच पळून आलो. आणि खोलीवर आल्यावर मित्रांच्या शिव्या खाल्ल्या. पण त्यादिवशी कोणी वर्गात गेले नाही.



मुलांनाच त्रास देणे गंमती करणे हे तर नेहमीचेच. पण सरांनाही सोडले नाही. एक सर खूप शिस्त पाळायला सांगायचे.  मुलांना ते आवडायचे नाही.  मग एक दिवस त्या सरांच्या खोलीला सकाळी ते बाहेर यायच्या आधी बाहेरून २ कुलुपे लावून टाकली आणि त्याहूनही गंमत म्हणजे सर्व मुले त्या दिवशी वसतीगृहातून बाहेर पडली.  म्हणजे जी मुले दांड्या मारायची ती सुद्धा. (आता ती वर्गात गेली की बाहेर ते माहित नाही.)  शेवटी खानावळीतल्या मुलांना कळल्यावर त्यांनी ती कुलुपे तोडून दरवाजा उघडला.



अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तर गंमत चालतच होती.  पण शेवटी, म्हणजे पहिल्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी कहर केला. परीक्षा संपली. वसतीगृहातील खोली रिकामी करून द्यायची होती.  त्यामुळे सर्वजण आपआपली कपाटे साफ करत होते.  जेवढे सामान घरी घेऊन जायचे ते बॅगेत, सूटकेस मध्ये ठेवले.  जेवढे सामान पुढील वर्षाकरीता वापरायचे ते दुसर्‍या पुट्ठ्यांच्या डब्यांमध्ये वगैरे बांधून ठेवले. उरलेले म्हणजे भरलेल्या वह्या, कागदे, वर्तमान पत्रे समोरील व्हरांड्यातून खाली टाकले.  दोन्ही विंग चौकोनी आकाराच्या आहेत. त्यात मध्ये सर्व कागदे जमा झाली.  बहुतेक मुले संध्याकाळी घरी निघून गेली, उरलेले आम्ही रात्री सिनेमा पाहून नंतर गप्पा मारण्याच्या हिशोबाने दुसर्‍या दिवशी जाणार होतो.  सिनेमा पाहून आल्यानंतर गप्पा झाल्या.  सर्व जण झोपले होते.  रात्री दरवाज्यावर ठकठक झाली.  ठकठक कसली, जोरजोरात दरवाजा ठोठावणे चालले होते.  दरवाजा उघडला.  रात्रीचे ३:४५/४:०० वाजले असतील.  खानावळीतील मुलगा म्हणत होता की सर्वांना खानावळीसमोर बोलावले आहे.  बाहेर पाहिले तर धूर दिसत होता.  अंदाज आला काय झाले ते.  कोणी तरी रात्री त्या समोर फेकलेल्या कागदांवर काडी टाकली होती.  आम्ही पोहोचलो बोलावले तिकडे.    सर्व (उरलेली) मुले जमली होती. सर्वांना तातडीने बोलावले होते.  बहुतेक मुले बनियान, हाफ पँटमधेच येऊन बसले होते.  थंडीही वाजत होती.  सरांनी विचारले, 'कोणी केले हे'? माहित तर नव्हतेच आणि माहित असले तरी कोण सांगणार. मग काय, राग देऊन मग आम्हाला सांगितले, तुमचे परीक्षेचे प्रवेशपत्र जमा करून सकाळी ७ च्या आधी वसतीगृह रिकामे करा.  काय करणार? सकाळी ७/७:१५ ला सर्व वसतीगृह रिकामे झाले.  ह्यात त्या कागदं जाळण्याने वसतीगृहाचे नुकसान झाले नाही त्यामुळे हायसे वाटले.



ह्या असल्या गंमती थोड्याफार फरकाने सर्वांनी अनुभवल्या असतीलच. पण जरी बहुतेक लोक असे काही करत असतील, ऐकून माहिती असतील तरी स्वत: अनुभवलेल्या म्हणून ह्या आठवणी नेहमीच सोबत राहतील.



लेखक: देवदत्त गाणार

शैलेश आणि त्याची कॉलर ट्यून

शैलेश नावाचा माझा एक मित्र आहे. कॉम्प्युटरमधला किडाच म्हणा ना! कॉम्प्युटरवर काम करताना एखादी अडचण आली आणि त्याला फोन केला, तर चुटकीसरशी अडचण सोडवायचा तो.

पण त्याला फोन करायचा म्हणजे एक वेगळाच त्रास असायचा. त्याच्या मोबाईलच्या कॉलर ट्यून्स!  शैलेशचा मूड आणि शैलेशच्या मोबाईलच्या कॉलर ट्यून्स सतत बदलत असायच्या. गाण्यांची आवड आणि त्याचा बदलता मूड याचा अचूक मेळ मला त्याच्या मोबाईलच्या कॉलर ट्यून्समधे ऐकायला मिळे. कॉलर ट्यून म्हणून शोले मधील गब्बरसिंगचे डायलॉग ऐकायला आले, तर समजायचं. कार्ट्याने अजून क्रेडीट कार्डची उधारी चुकती केलेली नाही. पैशांसाठी क्रेडीट कार्ड कंपनी वारंवार फोन करत असणार.
त्यानंतर काही दिवस आमच्यासारख्या मित्रांच्या कानाला दिलासा म्हणून की काय, त्याने काही दिवस नुसतीच कुठलीतरी धून, कॉलर ट्यून म्हणून लावून घेतली होती. पण आमचं ते सुख काही दिवसच टिकलं.
‘रविवारी एकत्र जमू या’, हे सांगण्यासाठी त्याला फोन केला आणि....

"अब तेरे बिन, जी लेंगे हम...." कुमार सानू उसासे देत होता. मी लगेच ताडलं, ह्याचं ब्रेक अप झालं. पुढे काही बोलायची सोय नव्हती. आता ही कॉलर ट्यून पुढचे किमान पंधरा दिवस तरी त्याच्या मोबाईलवर वाजणार याची खात्री आम्हा मित्रमंडळींना होती. त्याचं ब्रेक अप आम्ही गंभीरपणे घेतलंही असतं पण हे त्याचं दुसरं... नाही, बहुधा तिसरं ब्रेक अप होतं. त्यानंतर आम्ही जवळजवळ वीस दिवस शैलेशला फोन करणं टाळलंच. एकदा असंच कामासाठी म्हणून त्याला फोन केला तर कॉलर ट्यूनवर "मै जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुँवे में उडाऽऽऽ" सुरू होतं.

आता ह्या पोराने काय लोचा केला? माझं काम बाजूला ठेवून आधी त्याला त्याच्या बद्दल विचारलं.

"नोकरीचा राजीनामा दिला!" त्याने हसत सांगितलं.
मला माझ्या नोकरीचा राजीनामा दिल्यावरही जितकं दु:ख झालं नसतं, तितकं त्याच्या राजीनाम्याची बातमी ऐकून झालं. त्याने त्याच्या तिस-या नोकरीचा राजीनामा दिला होता.
"अरे इथे लोकांना एक नोकरी मिळताना मारामार होते.  मिळाल्यावर ती टिकवायची कशी, असा प्रश्न पडतो आणि तू पावसाच्या साचलेल्या पाण्यावर कागदाची होडी सोडावी, तेवढ्या सहज नोकरी कशी रे सोडतोस?"

"मन नाही रमलं, दिला सोडून जॉब." त्याने कारण सांगितलं.
पहिली नोकरी सोडताना तो जितका बेफिकीर होता, तितकाच बेफिकीर तो ही नोकरी सोडतानाही होता. अशाच लोकांना फटाफट नोक-या कशा मिळतात, देव जाणे! नोकरी सोडल्यावरही कॉलर ट्यूनसाठी महिना ३० रूपये खर्च करणं त्याला परवडेल की नाही हा विचारही माझ्या मनात आला नाही कारण पठ्ठ्या एक वेळ दोन वेळेचा चहा पिणार नाही पण कॉलर ट्यूनसोबत तडजोड नाही करायचा.

दुस-याच दिवशी पेपरमधली एक नोकरीची जाहिरात पाहून मी त्याला फोन केला, तर रिंगटोन बदललेला. "आसमॉं के निचे, हम आज अपने पिछे..."

ऑं? काल नोकरी सोडली, आज छोकरी गटवली? त्याला समजणं माझ्या आकलनशक्तीपलिकडचं होतं.

"अगं आत्ताच इंटरव्ह्यू देऊन आलो. प्लेसमेंट एजन्सीमधे काम करणारी मुलगी शाळेत असताना माझ्या वर्गातच होती. आज बोलता बोलता तिने सांगितलं की शाळेत असताना ती माझ्यावर सॉलीड फिदा होती पण सांगण्याचा कधी धीर झाला नाही."

"मग आता तू तिला धीर देणार वाटतं?"

"अगं, मला पण आवडायची ती तेव्हा. पण तिच्यासारखंच धीर नाही म्हणून मी बोललो नाही कधी. शिवाय.... ती एंगेज्ड नाही कुठे."
"छान! प्रेमात पडताना नोकरी आहे का नाही हे पहायचं नसतं, हे विसरलेच होते मी."


माझं काम सांगून मी फोन ठेवला. आता पुढ्च्या वेळी ह्याला फोन केला, तर बहुधा "दो सितारों का जमीं पर है मिलन आज की रात...." सुद्धा ऐकायला मिळू शकेल, असं वाटत होतं पण नाही.... कुठेतरी माशी शिंकली. सहज नेहमी करतात तसाच फोन केला होता मी आणि...

"जाऊँ कहॉं बता ऐ दिल, दुनिया बडी है संगदिल, चॉंदनी आयी घर जलाने, सुझे ना कोई मंझिल..." मुकेशचा दर्दभरा आवाज कानावर आला.

आता काय झालं ह्याला?

"तिच्या आईवडीलांचा नी माझ्याही आईवडीलांचा विरोध आहे प्रेमाला." तो उदास स्वरात म्हणाला.
"मग पळून जा आणि लग्न कर." मी.

"नोकरी नको?" त्याने फटकन प्रश्नवजा उत्तर फोनमधून माझ्या तोंडावर मारलं. जणूकाही त्याच्याकडे नोकरी नव्हती हा माझाच गुन्हा होता.

"अरे, नोकरी काय मिळेल आज ना उद्या.  तुला तर नक्की मिळेल."  मी तेवढ्यात सावरण्याचा प्रयत्न केला.

"मिळेल गं. पण आत्ता तर नाहीये ना! ती तर म्हणते की या महिन्यात लग्न नाही केलं, तर तिचे आईवडील तिचं लग्न दुसरीकडे कुठेतरी लावून देतील. आता पळून जाऊन हिच्याशी लग्न करायचं तर मला नोकरी नको का? बॅंक बॅलन्सचा खडखडाट आहे.”

"तिची नोकरी तर असेल ना पण?"

"नाही ना! गेल्याच आठवड्यात तिनेही नोकरी सोडली."

"अरे देवा!"

“....”


त्यानंतर बरेच दिवस शैलेशला फोन केला की "सॅक् रीफा‌ऽऽऽइस, होऊ ओऊ...." असं गाऊन, एल्टन जॉन  शैलेशच्या अफेअरचा शेवट कसा झाला असेल, याची कल्पना द्यायचा. पण एल्टन जॉनलाही फार काळ मु्क्काम नाही ठोकता आला. त्याच्या मोबाईलवर काही दिवसांतच “दिल चाहता है, हम ना कभी रहे यारों के बिन...” कॉलर ट्यून रूजू झाली आणि आम्ही मित्रमंडळींनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

शैलेश तसा खूप बडबड्या. महीना-दीड महिन्याने माझ्या घरी त्याची एक तरी चक्कर ठरलेली. तो आला की आईसुद्धा खूश असायची. तिला दिवसभर कुणासोबत बोलायला मिळायचं नाही. शैलेश आला की आई आणि तो, दोघं निरनिराळ्या विषयांवर गप्पा मारत बसायचे. माझ्या बहिणीच्या साखरपुड्याची बातमी ऐकून शैलेशला इतका आनंद झाला की त्या आनंदाप्रित्यर्थ त्याने स्वत:च्या मोबाईलची कॉलर ट्यून बदलली... “मेरी प्यारी बहनिया, बनेगी दुल्हनिया....”

माहित आहे, माहित आहे... हे थोडं जास्तच होतंय पण शैलेश असाच होता. अगदी मनस्वी! त्याच्या प्रत्येक कॉलर ट्यूनमधून त्याच्या मुडचा पत्ता लागायचा. ताईच्या लग्नाच्या पत्रिका वाटताना माझ्या मित्रांना सर्वात शेवटी पत्रिका द्यायच्या असं मीच ठरवलं होतं. अपेक्षेप्रमाणे पत्रिका कमी पडल्याच! मित्रांना फोनवरून आमंत्रण दिलं, तरी चालतं. तेवढीच कागदाचीसुध्दा बचत, असा विचार करून मी सर्वांना फोनवरूनच आमंत्रण दिलं. आमंत्रणाच्या यादीत शैलेशचा नंबर लागला, तेव्हा ’आता कोणतं गाणं ऐकायला मिळेल’, हाच विचार सर्वात आधी मनात आला.

“इक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है...”

आईशपथ! एकदम दचकायलाच झालं. फटाफट नोकरी आणि छोकरी मिळवणं याला कसं काय जमतं बुवा? इतर काही चौकशा न करता मी थेट मुद्यालाच हात घातला.

“आता कोण?”

“माधवी शिलेदार.” त्याने उत्तर दिलं.

“हे तरी फायनल आहे का तुझं?”

“असायलाच हवं. कारण हे आईबाबांनी ठरवलं आहे.” त्याने पुन्हा हसतच सांगितलं.
“अरे...!”
“माधवी आईच्या बालमैत्रीणीची मुलगी आहे. आम्ही दोघांनी एकमेकांना पाहिलं, पसंत पडलो. घरच्यांनी लग्न ठरवून टाकलं.”

“अभिनंदन मित्रा पण तुझ्या नोकरीचं काय?”
“शिलेदारांचा स्वत:चा व्यवसाय आहे. माधवी त्यांची एकुलती एक मुलगी आहे.”

“अरे, तुला जॅकपॉटच लागला की!”

“नाही, तसं नाही. खरं तर मी त्यांच्याकडे नोकरीसाठी गेलो होतो, तिथेच ओळखींचे संदर्भ लागले मग पुढच्या गाठीभेठी घडल्या.” शैलेशने खुलासा केला.

मी ताईच्या लग्नाचं आमंत्रण देऊन फोन ठेवला पण ताईच्या लग्नाइतकाच शैलेशच्या लग्नाचाही आनंद मला झाला होता. आता लग्न झाल्यावर तरी तो ह्या बदलत्या कॉलर ट्यूनच्या फंदात पडणार नाही असं वाटलं होतं. पण कसलं काय? त्याच्या लग्नाच्या वेळी हॉलवर पोहोचायला उशीर झाला, म्हणून कळवण्यासाठी फोन केला तर...

“मेहंदी लगा के रखना, डोली सज़ा के रखना....”
अपेक्षित नव्हतं असं नाही पण अशी सूचक आणि अचूक गाणी त्याला कशी काय आठवतात, हे मला कधीच समजलं नाही. शैलेशला अगदी सुस्वरूप मुलगी पत्नी म्हणून मिळाली होती. लग्नानंतरही शैलेशने आम्हा मित्रमंडळींना सोडलं नव्हतं. उलट आमच्या ग्रुपमधे आणखी एक मैत्रीण सामील झाली. हो, माधवीला आमचा ग्रुप एवढा आवडला की काही दिवसात ती आमच्यातीलच एक होऊन गेली. एक दिवस सहज म्हणून मी शैलेशला फोन केला आणि त्याची कॉलर ट्यून ऐकून मला पुढे काय बोलायचं हेच सुचलं नाही. शैल्याने मोठाच आनंदाचा धक्का दिला.

“जीवन की बगीया महकेगी, चहकेगी...”

शैल्या बाप बनणार होता! त्याच्याशी फोनवर बोलून झाल्यावर त्याला म्हटलं, “शैल्या, आता पुन्हा तुला फोन केला ना, तर उचलू नकोस हां. मला हे गाणं ऐकून दे. तुझ्या फोनवर ऐकलेली सर्वात सुंदर कॉलर ट्यून आहे ही.”

पुढच्या काही महिन्यांनंतर शैल्याने नर्सरी –हाईम्स जरी कॉलर ट्यून म्हणून लावल्या असत्या तरी मला नवल वाटलं नसतं.



लेखिका: कांचन कराई

हत्ती आणि मुंगीचा बदललेला विनोद

हत्ती आणि मुंगीचा बदललेला विनोद




हा किस्सा घडला माझ्या एका डबींगच्या वेळेस! आम्ही बरेच डबींग कलाकार त्या दिवशी एकत्र भेटलो. माझी रुपाली नावाची एक मैत्रीण आपल्या आठ वर्षांच्या मुलीलाही सोबत घेऊन आली होती. अबोली तिचं नाव! नाव अबोली पण अखंड बडबड करायची. रूपालीची ही बडबडी लेक थोड्याच वेळात आम्हा सर्वांची लाडकी झाली. आमच्यासोबत बडबड करता करता चित्रकलेचं सामान, गोष्टींची पुस्तकं असा बराच पसारा अबोलीने स्टुडीओच्या एका कोप-यात मांडून ठेवला. पण तिलाही बहुधा आमच्याशी गप्पा मारायला आवडत होत्या.



एक लहान मुल मोठ्यांच्यात असलं तर मोठेही लहान होतात. अगदी तसंच झालं. अबोलीने आमच्या पैकी कुणालातरी पकडून एक कोडं घातलं. मग दुसरं कुणीतरी तिच्या तावडीत सापडलं. तिची कोडी आणि त्यांची भन्नाट उत्तरं आम्हाला एवढी आवडली की हळू हळू करत सगळेच एकमेकांना कोडी घालू लागले. नंतर कुणीतरी पी.जे. सुरू केले.



पी.जे. वरून प्रवास करत करत आमची गाडी हत्ती आणि मुंगीच्या विनोदांपर्यंत येऊन पोहोचली. डबींगचं नव्वद टक्के काम पूर्ण झालं होतं. जेवणाच्या सुटीनंतर फारसं काही काम नव्हतंच मोठी माणसंच जर लहान मुलांसारखी वागू लागली, तर अबोली तरी कशाला मागे रहाते? तिने मला एक हत्ती आणि मुंगीचं कोडं घातलं..



"सांग बरं मावशी, हत्तीच्या समोर पिवळ्याधम्मक केळ्यांचा घडच्या घड पडून असतो, तरी हत्ती का बरं खात नाही?"



"अं.... हत्तीला भूक नसते."



"नाय.."



"त्याला केळी आवडत नसतात."



"... असं कधी होतं का? हत्तीला तर केळी आवडतातच."



अबोलीने तेवढ्यात माझ्या सामान्यज्ञानात भर टाकली.

"अं.... मग हत्तीचा उपास असेल."




"नाहीच मुळी. बघ, हरलीस....?"



सहजासहजी हार मानायला मन तयार नसलं तरी मोठ्या माणसाला हरवल्यानंतर लहान मुलांच्या चेहे-यावर दिसणारा आनंद पहाण्यासाठी कोणताही मोठा माणूस रोज हरायला तयार होईल.



"बरं, हरले."



"हरलीस...?" अबोलीने पुन्हा तोच प्रश्न आनंदाने चित्कारून विचारला.



"हो." मी पुन्हा उत्तर दिलं.



"लॉक किय़ा जाय?"



मी तिच्याकडे कौतुकाने पहात म्हटलं, "हॉं लॉक किया जाय."



"अगं मावशी, हत्तीला खूप भूक लागूनसुद्धा हत्ती तो केळ्यांचा घड खात नाही, कारण केळी प्लास्टीकची असतात."



माझ्या चारही बाजूंनी हास्याचे धबधबे कोसळल्यावर मला लक्षात आलं की सगळेजण त्यांचे हत्ती आणि मुंगीचे विनोद बाजूला ठेवून अबोली काय कोडं घालते इकडे लक्ष देत होते. मला चांगलंच मूर्ख बनवलं होतं त्या पोरीने. तिच्या खुदूखुदू हसण्यामुळे मलाही केव्हा हसू फुटलं मला कळलंच नाही. त्यानंतर हत्ती आणि मुंगीवरचे निरनिराळे विनोद शोधून काढायला नुसता ऊत आला होता.



हत्तीला पायात पाय घालण्यासाठी मुंगी झाडामागे काय लपते, हत्ती एकटा भेटल्यावर ती ’जाने दो, अकेला है’ म्हणत आपल्या मैत्रीणींबरोबर काय निघून जाते.. कहर, कहर केला आम्ही सगळ्यांनी. अगदी विनोद मिळाला नाही, तर आम्ही स्वत:च विनोद तयार करून करून स्वत:च त्यावर हसत होतो. अबोलीला या सगळ्याची अगदी मज्जाच वाटत होती. पण पुन्हा त्या पोरीने बॉम्ब फोडला आणि याही वेळी तिचं टार्गेट मीच होते.



"मावशी, मला सांग. मुंगी हत्तीच्या कानात असं काय सांगते की ज्यामुळे हत्ती चक्कर येऊन पडतो?"



आता आली का पंचाईत? ह्या प्रश्नाचं उत्तर माहित नाही सांगावं तर अबोली उत्तर देणार. माहित आहे असं सांगावं, तर उत्तरच असं की सगळ्यांसमोर आपली अवस्था अवघडल्यासारखी होणार. एव्हाना सगळ्यांपर्यंत अबोलीचा प्रश्न पोचला होता.



प्रत्येकजण आपापल्या जागेवरून माझ्याकडे गालातल्या गालात हसत पहात होता. रूपालीची अवस्था आणखीनच वाईट.



"ए, चिनू, राहू देत तुझे ते जोक्स आता."



"हा लास्ट... हा लास्ट..." असं म्हणत अबोलीने पुढे घोडं दामटलंच.



"सांग ना मावशी, मुंगी हत्तीच्या कानात असं काय सांगते की ज्यामुळे हत्ती चक्कर येऊन पडतो?"



अशी परिस्थिती माझ्यावर आली म्हणून मी वैतागलेही होते आणि अबोलीचा प्रश्न मला हसायलाही लावत होता. शेवटी मीच तिला म्हटलं.



"तूच सांग, मी हरले."



"अगं, मुंगी म्हणते की आज माझ्यासोबत डेटवर येशील का?"



मीच काय सगळेच अबोलीकडे चकीत होऊन पहात होते. हे उत्तर कुणालाच अपेक्षित नव्हतं. कुणीतरी अगदी व्यवस्थितपणे त्या विनोदामधे बदल करूनही विनोदात चैतन्य कायम ठेवलं होतं. मी मनोमन त्या अनाम व्यक्तीचे आभार मानले. आम्हाला सर्वांनाच तो बदललेला विनोद आवडला होता आणि ज्या व्यक्तीने तो विनोद बदलला होता, त्या अनाम व्यक्तीबद्दल कौतुकही वाटलं.



लेखिका: कांचन कराई

***********
काही वाचकांच्या खास मागणीवरून हाच लेख इथे ध्वनीमुद्रित स्वरूपात देत आहोत.
वाचन स्वत: कांचन कराई हिनेच केलंय.



     Get this widget |     Track details  |         eSnips Social DNA   

भंग का रंग जमा हो चकाचक...

वाटते तो सन १९८४-८५ चा काळ असावा...

ती होती जनकपुरी दिल्लीच्या होळीची मजा. त्यावेळी मी हवाईदलातील वेस्टर्न कमांडच्या पोस्टींगवर होतो. कॅम्पात घर मिळायला फार वेळ लागे म्हणून आम्ही एका भाड्याच्या बंगल्यात राहात होतो. जनकपुरीतील सी-२ ब्लॉक मधील 'दत्त-विनायक मंदिर,'  तेथील मराठी लोकांसाठी एक सांस्कृतिक व धार्मिक आकर्षणाचे केंद्र होते. मंदिराचे पुजारी उत्तर भारताच्या भागातून आलेले मराठी असल्याने महाशिवरात्री नंतर होळी पर्यंत भांगेचा गोळा तयार करायला ते लागत व मोजक्या लोकांसाठी भांग घोटून सेवनाचा कार्यक्रम साजरा होत असे.

अशाच एका होळीला.... सर्वांना गायनाचा मूड आला होता. ४-६ जणांनी मराठी फिल्मी गाण्यांनी सुरवात केली व होता होता भावगीते, गझला कव्वाल्यांनी पेटीवरल्या बोटांनी सुरांशी जमवून घ्यायला सुरवात केली ..

.. अस्मादिकांना गोळी तुफान चढली. त्यातच ईमरती व अन्य गोडधोड पदार्थांनी जरा जादाच चढली... बाहेर रंगांची रंगारंग धमाल चालली होती. मंदिराच्या आवारात आम्ही गाणी म्हणता म्हणता... इतरांना रंगांनी रंगवत, 'होली है' म्हणतानाची रंगत भांगेच्या प्रभावाने उत्साही होत होती...

घरात आलो ते, ’घेई छंद मकरंद म्हणतच.’  मग ...'सर्वात्मका सर्वेश्वरा'... नाट्यगीतातील खोल अर्थ कळल्याची अनुभूती झाली. मधुरगीते स्टीरिओवर फुल आवाज करून ऐकताना पोरे भांबावली...

कहर तर नंतर झाला.  म्हणजे मावळणकर हॉलमधील पुल व सुनीताबाईंचा - बोरकरांच्या कविता - गायनाचा आस्वाद लुटायला त्या तंद्रीतच मी २०-२२ किमी कधी पोचलो व परतलो कळले नाही. त्यावेळी प्रेक्षकातून फक्त माझी 'वा-वा', - 'बहोत खूब' - ची दाद फार दणक्यात गुंजत होती असे भासत होते. तो असर पुढे दोन दिवस होता. आनंदाचा माझा तो मूड पाहून सौ. अलकाने ठरवले की आपण एक भांगेची पार्टी करू या. झाले ठरले...



उत्साही साने कुटुंबिय त्यांच्या दोन मुलांसह, परांजपेद्वय, आमच्याकडील चिन्मय व नेहा व आम्ही दोघे. आमच्या घरात घाट घातला गेला. वाटण-घाटण करत करत दुपारचे १२ वाजले. मुलांना ठंडाईचे गिलास हाती दिले. खसखस घातलेली ठंडाई मुलांना चढली. ती घरभर २-३ तास लपाछपीच्या खेळात रंगली. दुपारचे रणरणते ऊन. त्यात 'चियर्स' करून भांगेचे ग्लास फस्त करून अलका व मृणाल एकदम तर्र झाल्या. लवकर घरी जातो म्हणून परांजपे लगबगीने सटकले.

’काय मज्जा येतेय' करता करता गरगरायला लागले. भिती वाटायला लागली. . दोघींनी बेडवरून आरोळ्या मारायला सुरवात केली.

'आता आम्ही चाललो ...वर... मुलांना साभाळा'

'आता काही परतत नाही'. त्या जणू आकाशात १०० फूट तरंगत होत्या असे त्यांना होत होते.

'अहो मुलांचा नीट साभाळ कराल ना'. अशा हाका येऊ लागल्या. साने, पतंग जसा मांजाने खेचतात तसे हातवारे करत, काही काळजी करू नका. आम्ही आमचे बघून घेऊ. तुमच्या पश्चात.'  असे चेष्टेनी खिजवत होते.

एकमेकींना गळ्याची शप्पत घालून पुन्हा भांगेच्या वाटेला न जाण्याच्या अनेक आणाभाका झाल्या. साने एका बेडवर जे आडवे झाले ते घोरत लंबेलाट.  मीच तो काय जसा सावरलेला होतो.  मला ब्रह्मांड आठवले. कारण दुसर्‍यादिवशी ऑफिसमधे माझे मोठे प्रेझेंटेशन होते. त्यात गफलत होणे म्हणजे प्रमोशनवर गदा असा पेच होता.



सारखी घड्याळाकडे नजर जाऊ लागली. बराच वेळ झाला असे वाटून पुन्हा पहावे तर सेकंदाचा काटा फक्त ५-६ सेकंद सरकला होता असे वाटू लागले. मनावरचा ताबा सुटण्याच्या आत काही हालचाल केली तर निभाव वागेल असे वाटून घाम फुटला. वेळीच सावधपणे कोणालातरी सांगून वैद्यकीय मदत मागवण्याची व्यवस्था करावी असे वाटून मी तडक पायात चप्पल अडकवली व आमच्या घरासमोर वरच्या मजल्यावर राहणार्‍या विंग कमांडर बाबूकडे गेलो.



'टींग-टाँग' 'टींग-टाँग' करत दारावर बेल वाजतच राहिली.

'क्या है?' करत लुंगीत बाबूसाहेबांनी मला पाहिले.  असा अचानक न सांगता कसा?.. असा त्याच्या चेहर्‍यावरील भाव ओळखत मी त्याला सारी कल्पना दिली. त्यालाही चढली आहे असा मला उगीचच भास झाला.  मलाही चढलेली आहे असे मी आवर्जून सांगितले.

'नो प्रॉबलेम, डोंट वरी,'  असा सिनियारिटीचा आव आणत त्याने मला घसघशीत धीर दिला.
’मी इथे असताना काही चिंता नको' असे त्याने तोंडभर आश्वासन दिले आणि पटकन दरवाजा बंद करून घेतला.

'ओके, ओके' करत मी घरात परतलो. घराचा दरवाजा धाडकन बंद होताना बाबूच्या तोंडावर आपटला. मी सटपटलो. 'माझ्या दारात तु इथे कसा' असे मी म्हटले.

तो तोंडावर बोट ठेऊन म्हणाला, 'रेकी करायला आलो. कितपत सीरियस मामला आहे.'
महाशयाचा मूड काही और वाटला...


'ओके ओके' करत तो परतला. रस्ता ओलांडून वरच्या मजल्यावर पोचला. त्याने घराचा दरवाजा बंद करायला व मी त्याच्या पाठीला धक्का द्यायला एकच गाठ पडली.

'तू क्याकर कहा है?' आता त्याची चकीत व्हायची वेळ होती.

'मेरी चप्पल..' करत मी आत गेलो. तो त्याच वेळी एक जण सोफ्याच्या खालून बाहेर येत होता. मी डोळे विस्फारून म्हणालो, 'ये कौन? यहा क्या कर रहे है?

हातात रंगित पाण्याची बाटली धरलेल्याकडे पहात, कडवट तोंड करत बाबू म्हणाला, 'मीट माय हाऊस ओनर'.
पंत चांगलेच तरंगत होते.

'ओके, ओके' करत मी काढता पाय घेतला.



दोघीना अती होऊन झोप लागली. मुलांचे पाय सारखे सारखे तिसर्‍या मजल्यापर्यंत
धावून धावून थकले. मी विंग कमांडर बाबूच्या कडील प्रकार पाहून चक्रावून गेलो व अती श्रमाने पेंगुळलो.

असेच काही तास गेले. मुलांना अती तहान लागली म्हणून त्यांनी फ्रिज मधील बाटल्याच्या बाटल्या फस्त केल्या. संध्याकाळी दूरदर्शनवर 'जंगली' सिनेमा चालू झाला.

'चाहे कोई मुझे जंगली कहे' म्हणून 'याऽऽऽऽहू....' अशी मोठ्याने आरोळी ठोकावीशी वाटली. तो दिवस धुंदीचा मस्तीचा होता.

विंग कमांडर बाबू त्याच्या घरमालकाबरोबर पकडला गेला म्हणून त्यानेही माझ्या भांग प्रकरणाची बकबक कुठे केली नाही.  आज होळी विशेषांकासाठी हे लिहिताना एका मजेशीर भांग-प्रकरणाची लज्जत पुन्हा अनुभवता आली.


लेखक: शशिकांत ओक

कुर्यात सदा दंगलम्‌ !

"शुभे... माझा रुमाल कुठे आहे? डबा भरलास का?"

मोजे घालता घालता राजनने स्वयंपाकघराकडे बघत नेहमीची हाक मारली.

"कॉटवरच आहे बघ. तुझं पाकीटही तिथेच आहे आणि लोकलचा पास, घराची चावी सगळे घेतले आहेस ना. मला यायला आज उशीर होइल. आज देशपांडेकाकांकडे जायचे आहे ना. सुबोध वाट बघत बसेल माझी. कॉटवरच ती फुलाफुलांची पिशवी पण काढून ठेवलीय. आज येताना दादरला उतरून भाजी घेऊन ये. आणि हो रानडे रोडवरच्या त्या मोतीवाले बंधूंकडे माझा मोत्याचा सर पॉलिश करायला दिलाय, तेवढा घेऊन येशील आज? आणि हो, गार्निअर घेऊन येशील का रे आज? तुझे केस फारच पांढरे झालेत. कसं दिसतं ते? "

शुभाने स्वयंपाक करता करताच उत्तर दिले.



मोजे घातले, रुमाल आणि पैशाचं पाकीट खिशात टाकलं आणि तो आरशासमोर उभा राहिला.

" दोनच वर्षात काळ्याचे पांढरे झाले." राजनने स्वतःवरच विनोद केला.



शुभाचं शेवटचं वाक्य ऐकलं आणि डोक्यावरच्या सफेद होत चाललेल्या केसांकडे लक्ष गेलं आणि त्याला एकेकाळचं ते रेशमी वैभव आठवलं. या केसांवर भाळून तर शुभा त्याच्या प्रेमात पडली होती. ते दिवस आठवले आणि राजन क्षणभर तसाच आरशासमोर रेंगाळला. त्याच्याही नकळत त्याचा हात हळूवारपणे केसातून फिरायला लागला..... डोळे कुठेतरी अज्ञातात हरवून गेले......



"अहो... राजे...., पुन्हा एकदा भूतकाळात शिरलात की काय? जागे व्हा? आणि पळा नाहीतर ७.२० चुकेल. भागो-भागो, जल्दी भागो."

शुभाने हलकेच त्याच्या खांद्यावर थोपटत त्याला जागे केले. तसा तो पुन्हा वर्तमानात आला.



"खरेच गं, ते दिवस आठवले की अजूनही नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. तुला आठवतं? बरोब्बर एक वाजता, दुसर्‍या मजल्यावर जिन्यापाशी येऊन उभा राहायचो मी आणि राघव. मग थोड्यावेळाने तू तुझ्या मैत्रिणींच्या घोळक्याबरोबर तिथे यायचीस आणि हळूच गार वार्‍याची झुळूक येऊन जावी तशी निघून जायचीस. तुला माहीतेय.... जवळजवळ दीड वर्षे.... म्हणजे एफ्.वाय. ला प्रवेश घेतल्यापासून ते एस.वाय. अर्धे होईपर्यंत रोजचा उपक्रम होता माझा हा. रोज ठरवायचो की आज बोलू... आज बोलू... पण धाडसच नाही झालं कधी. राघ्या शिव्या घालून थकला."

मनाने राजन अजून तिथेच होता.



"हो रे... पहिले दोन महिने आम्हालाही काही कळालं नव्हतं. पण नंतर मेघनाच्या लक्षात आलं आणि मग तुझ्या नावावरून मला चिडवणं सुरू झालं. मला फारसा रस नव्हता तेव्हा तुझ्यात, पण तुझे रेशमी केस खूप आवडायचे मला....!"

बोलता बोलता शुभाने पुन्हा एकदा राजनच्या केसातून हात फिरवला. आता थोडेसे विरळ व्हायला आले होते, पांढरेही झाले होते. प्रत्येक दिवशी आयुष्याशी चाललेल्या लढाईत एकेक वीर धारातीर्थी पडत चालला होता. पण होते ते अजूनही तसेच मऊसूत होते. तिने केसातून हात फिरवला आणि राजन पुर्णपणे भानावर आला.

"ए चल... उशीर होतोय. ७.२० चुकेल माझी. मी पळतो. संध्याकाळी दादर स्टेशनवर वाट बघतो तुझी. नेहमीच्याच ठिकाणी ४ नं. प्लॅटफॉर्मवर ."



"राजा... अरे मला उशीर होइल आज. साडे आठ तरी वाजतील. आज सुबोधकडून 'आसावरी' घोकून घ्यायचाय. गेले दोन शनिवार-रविवार त्याच्यावरच खपतोय पठ्ठ्या !"



"होवू दे ना मग. मी थांबेन ना! तुझ्यासाठी एवढे तरी नक्कीच करू शकतो मी. किंबहुना सद्ध्या तरी एवढेच करू शकतो गं मी."

बोलता बोलता राजनच्या डोळ्यात पाणी आले... तशी शुभाने त्याच्या पाठीत धपाटा घातला..



"राजे पळा आता, उशीर होतोय. मी कधी तक्रार केलीय का? मग...?"

राजनने एकदा भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिले आणि भरकन डबा उचलून घराच्या बाहेर पडला.



******************************************************************************



राजन अरविंद मोहिते. सातार्‍यापासुन तासाभराच्या अंतरावर असलेल्या एका गावातील एका सधन शेतकर्‍याचा मुलगा आणि आज एका छोट्याशा खाजगी कंपनीत खर्डेघाशी करणारा एक सामान्य कारकून. शुभांगी राजन मोहिते... त्याची पत्नी..... अगदी ऐश्वर्या राय नसली तरी नाकी डोळी नीटस.... सुबक ठेंगणी म्हणता येईल अशी. पुर्वाश्रमीची शुभांगी गोडबोले. सातार्‍यातील ख्यातनाम फौजदारी वकील नानासाहेब गोडबोल्यांचं लाडकं शेंडेफळ. चिरंजीव दिवटे निघाल्यानं त्यांच्या सार्‍या आशा लेकीवर एकवटलेल्या.......



........ सद्ध्या ती देखील एका खाजगी कंपनीत स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होती. त्याबरोबरच दोन विद्यार्थ्यांना गाणेही शिकवायची. सोमवार-मंगळवार ठाण्याच्या निनाद साठ्येंची मुलगी स्नेहा आणि शनिवार रविवार दादरच्या अनिरुद्ध देशपांडेंचा मुलगा सुबोध. राजन आणि शुभा सातार्‍याला कॉलेजला शिकत असताना एकमेकाच्या प्रेमात पडले आणि एका विवक्षित क्षणी लग्नाचा निर्णय घेतला गेला. टिपीकल फिल्मी कहाणीप्रमाणे आंतरजातीय विवाहाला दोघांच्याही घरातून विरोध. त्यामुळे घरातून पळून जाऊन लग्न केलेले. स्थिर झाल्याशिवाय अपत्याचा विचार करायचा नाही असे ठरवून टाकलेले. तेव्हापासून गेले दोन वर्षे सतत आयुष्याबरोबर झगडा सुरूच होता. पण आहे त्या परिस्थितीत दोघे सुखात होते.



लोकल पूर्णं वेगात सी. एस. टी. कडे धावत होती. ट्रॅकच्या बाजूला असणार्‍या इमारती, झाडे त्याच वेगाने मागे पडत होती आणि राजनचे मन भूतकाळात घिरट्या घालायला लागले होते.



"राजा, आठवड्याभरात कॉलेज संपेल आणि मग आपल्याला कुठलाही निर्णय घेणे कठीण जाईल."

शुभे , पण अजून मला नोकरी नाही. एकदा लग्न केले की आंतरजातीय असल्याने आमचा आग्यावेताळ आपल्याला दारातही उभे करणार नाही. तू अशी सधन घरात वाढलेली......!"

नाही म्हटले तरी त्याच्या शब्दाने शुभा थोडीशी दुखावलीच.



"दीड वर्षात हेच ओळखलेस का मला?"

तसा राजन वरमला...

"ओके...बाबा कान पकडतो, सॉरी डिअर, यापुढे अजून काही बोलू नकोस? डन....आपण लग्न करतोय.....! फक्त मला एक महिन्याचा कालावधी दे. बर्‍याच गोष्टी कराव्या लागतील. अगदी राहत्या घरापासून ते नोकरीपर्यंत. प्लीज एवढा वेळ देच मला."

राजन अगदी अजिजीने बोलला तशी शुभाची कळी खुलली.



"आत्ता कसा योग्य मार्गावर आलास. तू ना राजा, अगदी अस्सा आहेस. सगळीकडे मीच पुढाकार घ्यायचा का? अगदी प्रपोज करण्यापासून ते लग्नाची मागणी घालण्यापर्यंत.......!"

राजनने आपले दोन्ही कान पकडले. तसा मागून कुणीतरी त्याच्या पाठीत एक जोराचा धपाटा घातला.....

राजनने मागे वळून बघितले तर राघव, सतीश, सुंदर, मेघना, शशी सगळाच ग्रुप उभा होता.



"एकदाचा निर्णय झाला तर. चलो लेट्स पार्टी !" राघवने आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये घोषणा केली.



"अबे पार्टी तर करूच पण पुढचं काय? फक्त एक महिना आहे माझ्या हातात आणि सगळ्या तयार्‍या करायच्यात. आमचा आग्यावेताळ तर घराबाहेरच काढणार बहुतेक मला. मग लग्नाला त्याची काही मदत होण्याचं तर सोडाच."

राजन थोडा चिंताग्रस्त झाला होता खरा. खरेतर त्याचे आई-वडील स्वभावाने खूप चांगले होते. पण शाण्णव कुळीचा जन्मजात ताठा होता. त्यातूनही एकदम "बामणाच्या पोरीबरुबर लगीन" म्हणजे वडील कंबरेत लाथ घालून घराबाहेर काढणार याची खात्री होती.



"तू नको बे टेन्शन घेऊ. आम्ही आहोत ना. हे बघ, कल्याणला खडकपाडयात आमची एक खोली आहे. वनरुम किचन म्हण हवे तर. ती काय आम्ही वापरत नाही. बाबा, भाड्याने द्यायची म्हणत होते. ती तुम्हाला देऊ..... भाड्याचे बघू तुला नोकरी लागले की काही तरी टेकवू पिताश्रींच्या हातांवर....., हाय काय आन नाय काय !"

सतीशने महत्त्वाचा प्रॉब्लेम चुटकीसरशी सॉल्व्ह करून टाकला तशी राजाने त्याला कडकडून मिठीच मारली.



"आता राहता राहिला नोकरीचा प्रश्न तर तुला एखादी चांगली नोकरी लागेपर्यंत माझ्या बाबांच्या फर्ममध्ये पार्टटाईम क्लार्क म्हणून तुला चिटकवून घेण्याची जबाबदारी माझी. फक्त मग रोज तुला कल्याण ते चर्चगेट असा प्रवास करावा लागेल."

मेघनाने एक जबाबदारी उचलली आणि राजनच्या डोळ्यात पाणीच आले. भरल्या डोळ्याने त्याने शुभाकडे पाहिले तर तिच्या डोळ्यात नेहमीप्रमाणेच....



"ऑल इज वेल" आणि वर, "बघ किती सोप्पंय सगळं, तू उगीचच काळजी करतो आहेस" असे भाव !

तिने फक्त मेघना आणि सतीशचे हात हातात घेऊन घट्ट धरून ठेवले. तसे सतीशने हलक्या हाताने तिच्या डोक्यावर एक टपली मारली...

"बावळट, आफ्टरऑल वुई आर फ्रेंड्स! "

बरं चला, आता आधी शिवसागरवर धाड टाकूया आणि तिथे बसूनच काय ते ठरवू पुढचे."

राघवला खादाडीशिवाय दुसरे काही सुचत नव्हते आणि स्पॉन्सर नेहमी तोच असायचा त्यामुळे कुणाचीच ना असण्याचेही कारण नव्हते.

मग शिवसागरला पोटोबाची आळवणी करतच पुढचे प्लॅनिंग झाले.





ठरल्याप्रमाणे शुभाने अगदी शांत राहायचे होते. मेघना, शशी आणि सुंदर शुभासाठीची खरेदी करणार होत्या. तर राघव, सत्या आणि राजन स्वतः बाकीच्या गोष्टी ठरवणार होते. म्हणजे लग्न कुठे करायचे, कसे करायचे, त्यासाठीची सर्व प्रकारची तयारी. आणि हे सर्व करत असताना कमालीची गुप्तता बाळगायची होती. कारण शुभाचे वडील सातार्‍यातील प्रसिद्ध फौजदारी वकील असल्याने त्यांचा चांगलाच वचक होता, त्यात भाऊ वाया गेलेला, गुंडात जमा होणारा. म्हणजे त्या पातळीवर एक वेगळेच युद्ध लढावे लागणार होते.



............

..................

............................................



दोन दिवसानंतर राघव, सतीश आणि राजन शाहूपुरीच्या चौकात आप्पा मिठाईवाल्याची जिलबी खात उभे होते.

"राजा, रजिस्टर मॅरेजची कल्पना कशी काय वाटते? कायदा आपल्या बाजूने आहे, तुम्ही दोघेही सज्ञान आहात, भीती नाहीच ती कसली?" इति राघव.

"राघ्या वेडा की काय तू...., शुभाचे वडील फौजदारी वकील आहेत आणि म्हातारा पक्का सनातनी बामण आहे. कुणी चुकून बोलला त्यांच्याजवळ तर सगळेच बोंबलेल, मग शुभाही नाही आणि लग्नही नाही, बसा बोंबलत. तो सणकी म्हातारा फौजदारी वकील आहे. कुठलेतरी चार पाच खोटेनाटे खटले लावून देईल माझ्या मागे. मग बसतो एक तर बिनभाड्याच्या खोलीत जाऊन नाहीतर कोर्टाच्या खेट्या मारीत. अहं... काही तरी वेगळा मार्ग शोधायला हवा."

"हे बघ हे इथे जिलबी खात बसलेत. तिकडे शुभीचे नाना तिचं लग्न पक्कं करून आलेत. राजा जिलब्या कशाला खातोहेस, महिनाभर थांब... आपण शुभीच्या लग्नाचे लाडूच खायला जाऊ. काय गं शशे?"

शशी आणि मेघनाने भयंकरच बातमी आणली होती. मेघनाने आपली स्कुटी साइडला पार्क केली आणि त्यांच्याजवळ येता येताच मोठा बाँबशेलच टाकला.



"काहीतरीच काय बोलतेस मेघे? शुभी मला बोलली असती ना?" राजन हबकलाच.

"आता माझ्या तोंडून शुभीच बोलते आहे असे समज. आणि तिला माहीत असेल तर ती बोलणार ना राजा तुला. जी गोष्ट तिलाच माहीत नव्हती, नपेक्षा कालच कळलीय ती तुला दोन दिवसांपूर्वी कशी काय सांगणार होती?"

"ए मेघे नीट सांग काय झालेय ते." राघव मध्ये पडला.

" अरे सकाळी हॉस्टेलवरची माझी रूममेट शुभीची ही चिठ्ठी घेऊन आली."

मेघीने हातातली चिठ्ठी पुढे केली. राजन ती चिठ्ठी वाचायला लागला तोवर मेघीने कहाणीचे सूतोवाच केले....



" माझी रूममेट दीप्ती, शुभीबरोबर गाण्याच्या क्लासला असते ना ती दात्यांकडे, तिच्याकडे शुभीने ही चिठ्ठी दिली. कसे कोण जाणे पण तुमचे पराक्रम शुभाच्या दिवट्या बंधुराजांना कळले. मला वाटते, कॉलेजमधल्या कुणीतरी चुगली केली असावी. आणि त्याने कधी नव्हे ते इमानदारीत ही बातमी बापापर्यंत पोचवली. तुला तर माहितीच आहे नानासाहेब किती पझेसिव्ह आहेत या बाबतीत ते. नानासाहेबांनी रातोरात कोल्हापुरला जाऊन आपल्याच एका मित्राच्या मुलाशी शुभीचं लग्न फिक्स करून टाकलं.

आणि राजन शेवटची बातमी खास तुझ्यासाठी.....

शुभी सद्ध्या नजरकैदेत आहे असे समजायला काही हरकत नाही. अर्थात माझ्यासारख्या जवळच्या मैत्रिणी तिला भेटू शकतात अजूनही. पण शुभीला घराच्या बाहेर पडायला बंदी आहे. कुणी ना कुणी सतत तिच्या बरोबर असतेच. मघाशी मी आणि शशी तिच्याकडे गेलो तर रव्या, तिचा भाऊ हॉलमध्येच ठिय्या मांडून बसला होता. त्याच्या बरोबर त्याचे ते टगे मित्रही होते. बहुतेक नानासाहेबांनी यावेळी लेकाशी सलोखा केलेला दिसतोय.

नालायक, कसा खोदून खोदून विचारत होता मला.



" तू ओळखत्येस का त्या मुल्लाल्ला? त्याचे नॅव काय? क्युठ्ये राहत्तो? लुबरा मेला!" बोलताना असा दिसत होता की आत्ता लाळ टपकायला लागेल्...शी SSSSS ! "

मेघनाने एका दमात सगळे सांगून टाकले. रव्याबद्दलचा तिचा सगळा संताप तिच्या शब्दातून ओसंडून वाहत होता.



"मग तू त्याला राजनची माहिती दिलीस का?"

राघ्याने मूर्खासारखे विचारले तशी मेघी मांजरीसारखी फिस्कारून त्याच्या अंगावर आली.

"एवढी मूर्ख वाटते का मी तुला?"

"आत्ता..., वाटत नाहीस..., पण कुणी सांगावं...? दिसतं तसं नसतं ना... म्हणून तर जग फसतं !".......

राघवने विनोद करून वातावरण थोडं हलकं करायचा प्रयत्न केला. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.



"राघ्या... विनोद नको. आता पाणी डोक्यावरून चाललंय. " राजन गंभीर झाला होता.... काहीतरी करायला हवं."

"पण आपण काय करणार राजन, तिचा भाऊ निव्वळ गुंड आहे. वडील फौजदारी वकील असल्याने पोलीसही त्यांच्या बाजूने असतील. आय थिंक... माफ कर पण मला वाटतं तू विसर आता शुभीला. चांगल्या मित्रांसारखे आपण तिच्या लग्नाला जाऊ.... शुभमंगल सावधान असे म्हणून अक्षता टाकून मोकळे होवू. तुला कोणी ना कोणी मिळेलच चांगली."

शशी राजनचं सांत्वन केल्या सारखं म्हणाली, पण ती पुर्णपणे गंभीर होती.



"सावधान......!"

इतक्या वेळ शांतपणे जिलबी खात असलेला सत्या पहिल्यांदाच मध्ये बोलला. तसे सगळे चमकून त्याच्याकडे बघायला लागले.

"सत्या, अजून वेळ आहे त्याला महिनाभर!"

राघ्या ओरडला तसा सत्या आधी हसला आणि मग गंभीर झाला.

"राजा... पृथ्वीराज बनायची तयारी आहे का? आणणार संयोगितेला पळवून?"

"तुला काय वाटलं? तिचा तो रानगट भाऊ आपलं हार तुरे घेऊन स्वागत करणार आहे. आणि समजा आणलं पळवून सातार्‍याच्या बाहेर पडता येईल का आपल्याला? "

"पुढचं माझ्याकडे लागलं. तू तिला पळवून आणणार का नाही ते सांग?"

"आपली तयारी आहे. त्यासाठी पृथ्वीराजच काय चंबलका डाकू भी बन सकता है हम."

राजन गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाला.



"मग झालं तर! मेघे तू काहीही कारण सांगून फक्त एक तासाकरता तिला घराबाहेर काढू शकशील?"

सत्याच्या पाताळयंत्री मेंदूची चक्रे हालायला लागली.

"घराबाहेर काढणं अवघड नाही रे. पण तो बोका असणारच ना तिच्या बरोबर सारखा!"

"त्याचं टेन्शन तू नको घेऊ. त्याला कसा येड्यात काढायचा ते मी बघतो. तू फक्त तिला काहीही करून एक तासाभरासाठी कॉलेजवर घेऊन ये. काहीही कारण सांग... सगळ्या मैत्रिणी मिळून तिला लग्नाबद्दल पार्टी देताहेत म्हणून सांग. फारतर त्या रव्याला पण आमंत्रण दे. ती फक्त कॉलेजपर्यंत यायला हवी. तिथे त्या रव्याला कसं गुंतवायचं ते मी बघतो. राजा तू माझी बाइक घेऊन लायब्ररीच्या मागच्या मैदानात तयार राहशील. शुभी गाडीवर बसली की गाडी सरळ फलटण चौकापर्यंत आणायची. तिथं हा राघ्या सुमो घेऊन तयार असेल, सुमो थेट सांगोल्याकडे पळवायची. सांगोल्यात माझा मामा असतो. त्या रात्री त्याच्याकडे मुक्काम करायचा, दुसर्‍या दिवशी सकाळी पंढरपुरात. तिथे कुठल्यातरी मठात देऊ लग्न लावून दोघांचं.

फक्त एक लक्षात ठेवायचं... यदाकदाचित आपला प्लॅन फुटला आणि त्याने पाठलाग केलाच तर सांगोला येईपर्यंत गाडी थांबवायची नाही. एकदा सांगोल्यात पोचलास की थेट मामाचं घर गाठायचं. मग तिथे रव्या येऊ दे नाही तर आणखी कोणी, आपण कोणाच्या बापाला भीत नाही! दुसर्‍या दिवशी सकाळी या दोघी बसने पंढरपुरात पोचतील.. काय?"

सत्याने झटक्यात सगळा प्लॅन ठरवून..., सांगूनही टाकला.



"आज सोमवार आहे. येत्या रवीवारी दुपारी तीन वाजता तू शुभीला घेऊन कॉलेजवर येशील मेघे.......! डन? "

सत्याने हात पुढे केला.

"डन...!" मेघी, राजन आणि राघ्याने त्याच्या हातावर हात मारून स्वीकृती दिली.

"अरे पण शुभीचं काय? ती तयार होइल का याला?" शशीने महत्त्वाचा प्रश्न विचारला.

"तिला निर्णय घ्यावाच लागेल. तुम्ही दोघी तिला भेटून, योग्य ती संधी साधून शुभीला कल्पना द्या. मला खात्री आहे, ती तयार होईलच."

सत्या कुठेतरी शून्यात बघत बोलला.



"ए मला भीती वाटते रे. तो रव्या आणि त्याचे मित्र फारच दांडगट आहेत." शशी थोडीशी घाबरली होतीच.

"हे बघ शशे, एकदा का लग्न लागलं की मग रव्याच काय तिचा तो वकील बापही काही करू शकणार नाही."

"सत्या.... तुझा सांगोल्याचा मामा काय करतो रे?"

राघवने कुतूहलाने विचारले. कारण त्या मामाच्या जोरावर सत्या रव्यासारख्या सातार्‍यातल्या टग्याशी टक्कर घ्यायला निघाला होता.

"भेटशील तेव्हा मामालाच विचार की?" सत्याने डोळे मिचकावले.

"ठीक आहे मी सुमो ठरवतो." राघू म्हणाला.

" आजच ठरव.... आणि शक्य असेल तर त्या गजानन ट्रॅव्हल्सची गाडी ठरव. नाही...नाही... गजाननचीच गाडी हवी आपल्याला."

"त्याला पक्के सांग आपल्याला राजा आणि त्याच्या होणार्‍या बायकोला, रव्याच्या बहिणीला घेऊन जायचेय म्हणून. तो गजानन दोस्त आहे आपला. मीही बोलतो त्याच्याशी. तो लागेल ती सगळी मदत करेलच. जाताना गजाला तीन-चार पोरंही घ्यायला सांगू बरोबर."

सत्या खुसखुसत बोलला...

"तुझी न त्या गजाची कशी काय दोस्ती रे? त्याच्यात आणि त्या रव्यात काय फरक आहे?"

राजन प्रथमच मध्ये बोलला. त्याचा सुर शंकेचा होता.... तसा सत्या कुजकटासारखा हसला.

"आपली दोस्ती नाय लेका गजाशी, पण रव्याची दुश्मनी आहे ना त्याच्याशी... या केसमध्ये रव्याची बहीण आहे हे समजले की गजा आपल्याला वाट्टेल ती मदत करायला तय्यार होईल. दुश्मन का दुश्मन अपना दोस्त ! काय....?

ए पोरींनो तुम्ही सुटा..कामाला लागा.आणि ही बातमी सुंदरला पण द्या. नाहीतर ऐनवेळी ती काहीतरी घोटाळा करायची. मेघे, शशीला सोडल्यावर मला जुन्या राजवाड्यापाशी भेट."

"ठीक आहे.....!" दोघी स्कुटीवर बसून निघून गेल्या.



"दोस्तांनो, एक छोटासा बदल आहे योजनेत....!"

सत्याच्या सुपीक डोक्यातून एकामागून एक किडे वळवळायला लागले होते.

त्याने पुढची योजना त्या दोघांना सांगायला सुरुवात केली तशी दोघांचे चेहरे खुलायला लागले.

"डन यार... सत्या !" भन्न्नाट आयडियेची कल्पना आहे. त्या दोघींनाही सांगायला हवे." राजन खुशीत आला.

"ते काम मी करेन, तू नको टेन्शन घेऊ. फक्त एक लक्षात ठेव राघ्या... एकदा का दोघांना घेऊन गाडी सुटली की सांगोल्यात मामाचं घर येईपर्यंत थांबायचं नाही. घरी पोचला की रव्याचा देवसुद्धा तुला टच करू नाय शकणार. त्याच्याआधी जर का त्याच्या हातात सापडलास तर रव्या तुझी भगर करेलच पण आपला सगळा प्लॅन पण फिसकटेल. या दोघांचं लग्न मग कधीच नाही होवू शकणार लक्षात ठेव."

सत्याने इशारा दिला.

"तू बघच बे सत्या... हा राघू काय करतो ते?" राघूने उत्साहाच्या भरात बाइक काढली आणि निघून गेला.

"चला नवरदेव तुम्हाला तुमच्या रूमवर सोडतो. आजची रात्र काय तो आराम करा, उद्यापासून बरीच कामं आहेत."

सत्यानं बाइकला किक मारली, मागे बसता बसता राजनने विचारलं...

"सत्या तुझं डोकं एवढं भन्नाट कसं काय चालतं रे?"

"हड रे... आपल्याला कुठे एवढं डोकं आहे. आपण माकडांचे वंशज आहोत... विसरला का? आपलं काम , आपला धर्म.... अनुकरण करणे!"

सत्या खदखदून हसला.

"अनुकरण?" राजनच्या चेहर्‍यावर भले मोठे प्रश्नचिह्न होते.

तशी सत्याने मागे वळून त्याच्या डोक्यात एक टपली मारली.

"सुशि झिंदाबाद !"

गाडी चालवता चालवता राजनच्या चेहर्‍यावर उमटलेलं संभाव्य प्रश्नचिह्न इमॅजिन करून सत्या जोरजोरात हसायला लागला.



************************************************************************



ठरल्याप्रमाणे मेघना आणि शशी शुभीच्या घरी पोहोचल्या.



"हे बघा काही पार्टी बिर्टी नाही करायची. महिनाभरावर तिचं लग्न आलंय. मला आता आणखी रिस्क घ्यायची नाहीय."

नानासाहेबांनी सरळ एक घाव दोन तुकडे करून टाकले.



"काका असं काय करता. प्लीज येऊ द्या ना तिला. आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून शेवटचेच भेटणार आहोत. एकदा कॉलेज संपलं की प्रत्येक जण आपल्या आपल्या आयुष्यात गुंतून जाणार. मग कुठे भेट होणार आहे. प्लीज शुभीला परवानगी द्या ना तुम्ही. हवेतर रवीदादाला पण येऊ द्या आमच्याबरोबर म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर तो सांभाळून घेईल रवीदादा !"

बोलताना मेघीने दादा या शब्दावर जरा जास्तच भर दिला, तसा रव्या उचकला.

"ए आपल्याला एक बहीण आहे तेवढी पुरेशी आहे. अजून नकोत सतराशे साठ."

"असं रे काय करतोस दादा. मला कुठे सख्खा भाऊ आहे. तुझ्या रूपात एक भाऊ मिळतोय म्हणून मी खूश होत होते तर तुझं हे असं..... ठीक आहे.... माझ्या नशिबातच नाही भावाचं सुख. आम्ही आपलं मनातल्या मनातच म्हणत राहायचं....

"भैय्या मेरे राखीके बंधनको निभाना....."

मेघीच्या डोळ्यातून पाणी यायचेच काय ते बाकी राहिले होते. शुभी, नानासाहेब तिच्याकडे बघतच राहिले.



"ठीक आहे गं पोरी, आणि तुला रे काय प्रॉब्लेम आहे रव्या. केवढी गोड पोरगी आहे, भाऊ मानतेय तुला. जरा सुधरा आता...! ठीक आहे गं पोरी, पण एक तासभरच आणि रव्या येईल तुमच्याबरोबर."

"थँक यू वेरी मच, काका !"

मेघनाने आनंदाने उडी मारायचीच काय ती बाकी ठेवली होती. शुभी तिच्याकडे वेड्यासारखी बघत होती, काय चाललेय ते तिला कळायला मार्गच नव्हता. मेघीने हळूच तिला डोळा मारला. तशी तिची ट्यूब पेटली. नक्कीच काहीतरी शिजत होतं. नंतर एकांतात मेघीने आणि शशीने तिला सगळे काही समजावून सांगितले.



"मेघे पण रव्याने विचारलं की पार्टी कुठे आहे तर? त्याला काय सांगणार? कारण प्रत्यक्षात तिथे कुठलीच पार्टी नसणार आहे."

शशीने शंका काढलीच.

"कोण म्हटले पार्टी नाही म्हणून... आपली लाडकी मैत्रीण लग्न करून सासरी चाललीय. तिला निरोप द्यायला नको. आपण पार्टी तर देणार आहोतच. पार्टीही असेल अन सगळ्या मैत्रिणीही असतील. आता तिचं सासर नानासाहेबांनी ठरवलेल्यापेक्षा वेगळं असेल हा भिन्न मुद्दा आहे. पण पार्टी तर होणारच."

मेघीनं डोळे मिचकावले.



*******************************



ठरल्या दिवशी रव्या शुभीला घेऊन पार्टीच्या ठिकाणी म्हणजे कॉलेजच्या हॉस्टेलवर पोहोचला.



"दादा, पार्टी पहिल्या मजल्यावर आहे. तू वर नको येऊस. सगळ्या मुलींना ऑकवर्ड वाटेल. तू इथे खालीच थांबना प्लीज."

रव्याच्या मनात वर पार्टीच्या ठिकाणी यायचे होते खरे तर. पण मेघीने 'प्लीज'वर दिलेला जोर पाहता त्याच्या हातात चरफडण्याशिवाय फारसे काही राहिले नाही.



"ए भावड्या, एक एकशेवीस तीनशे लाव रे." रव्या खालच्या पानपट्टीवर येऊन उभा राहिला.



"च्यामारी.... आजकाल बहिणीची रखवालदारी करायला लागला बघ हिरो!"

"पर्याय नाही बाबा, गेली कुणाचा तरी हात धरून पळून म्हणजे?"



"ए साल्या, कोण बे तू? दात आले का?" रव्या त्या दोघा पोरांवर भडकला.



"ए हिरो, रागपट्टी कुणाला देतो? गजाभाऊच्या माणसांना. हाडं न्हायीत र्‍हायची जाग्यावर.आपल्या बहिणीला संभाळ आधी."

त्यातल्या एका छाडमाड हिरोने रव्याला आवाजी दिली तसा रव्या अजूनच भडकला.



"तुज्या तर, रत्तलभर वजन नाय तुजं, तू रव्याला आवाजी देतो. थांब तुला दाखवतोच."

रव्या तावातावाने त्याच्यावर तुटून पडला. त्यांची चांगलीच जुंपली. या मारामारीच्या नादात शुभी कधी उतरून खाली आली आणि कॉलेजच्या मागच्या बाजूला निघून गेली हे त्याच्या लक्षातच आले नाही.



थोड्याच वेळात मेघी आणि शशीही गपचुप खाली उतरल्या. मेघीने स्कूटीला किक मारली.

"ए शशे, बस लवकर!"

"मेघे तू नीघ, मला एक छोटंसं काम आहे स्टँडपाशी. मी रिक्षाने जाते. उद्या ठरल्याप्रमाणे पंढरपुरातच भेटू."

मेघी तिच्याकडे बघतच राहिली.



इकडे लायब्ररीच्या मागे राजन सत्याची बाइक घेऊन शुभीची वाटच बघत होता. शुभी येताना दिसली आणि त्याने गाडीला किक मारली. फलटण चौकात राघ्या वाट बघत होता सुमो घेऊन. गाडीत गजाननची आणखी चार-पाच पोरं होती. जर वेळ आलीच आणि रव्याने पाठलाग केलाच तर त्याच्याशी सामना करायला कोणीतरी हवे ना. स्टिअरिंगवर स्वतः गजाच होता.

"गजाभाऊ... थेट सांगोल्याकडे निघायचं. पण आपण सांगोल्याकडे निघालोय हे त्यांना कळायला नकोय. दोन तीन तास तरी निदान फिरवत ठेवायचं बघा त्यांना."

राघूने सूचना केली.

"पण राघवभौ, त्यांना आपण सांगोल्याकडेच पळणार आहोत हे कसे कळणार. मुळात रव्याला आपली बहीण पळाली आहे हे कळायलाच अजून तासभर जाईल. तो येडा बसला असेल पार्टी संपायची आणि त्याची बहीण खाली येण्याची वाट बघत. आन त्याची बहीण हितं आपल्याबरोबर सांगोल्याला चाललीय. लै भारी प्लॅन हाये देवा!"

गजाला नुसत्या कल्पनेनेच गुदगुल्या होत होत्या. रव्याशी दुश्मनी काढायला तो नेहमीच तयार असायचा आणि ही तर नामी संधी होती. त्याने गाडी सुसाट काढली.

"नाही गजाभौ..., त्याला आत्तापर्यंत कळलेदेखील असेल. कदाचित तो आणि त्याची गँग सांगोल्याकडे जाणार्‍या रस्त्यावर आपली वाट बघत असतील. आजकाल भिंतीबरोबर हवेलाही कान असतात गजाभाऊ!"

राघव खुसखुसत बोलला तसा गजा त्याच्याकडे बघायला लागला.

"कायबी असो, आपल्याला काय त्याचं? पण रव्या भेटावाच वाटेत.... लै दिवस झाले हाताची खाज भागवून..!"

गजाचे हात शिवशिवायला लागले.

"हां... हां... गजाभौ... तुम्हाला जे काय करायचे ते करा पण आम्हाला सांगोल्याला पोचवल्यावर."

राघूने पुन्हा एकदा खबरदार केले गजाला.

"बरं बाबा, सांगोल्यात गेल्यावर तर आणखीन बरं व्हईल."

"राघू... सगळं होइल ना रे व्यवस्थित?"

राजनकडे बघत शुभीने विचारलं तसं राघू नुसताच हसला.

"काळजी करू नकोस शुभे... बोला पुंडलिक वरदा हारी विठठल.... उद्या पंढरपुरात यावेळेपर्यंत तुम्ही नवराबायको झालेले असाल."



राघूची शंका खरी ठरली, रव्या त्याच्या गँगसकट पोचला होता. पण गजासारखा कसबी ड्रायव्हर असताना भीती कशाची? गजाने सरळ अ‍ॅक्सेलरेटरवरचा जोर अजून वाढवला. त्याने गाडी सरळ सातार्‍यात पुन्हा घुसवली. तसा राघू चमकला....

"काळजी करू नको दादा, गजाने एकदा शब्द दिला म्हणजे दिला. थोडं खेळवू या ना रव्याला सातार्‍याच्या गल्ली बोळातून मग निवांत लागू सांगोल्याच्या रस्त्याला. माझ्यावर सोड मर्दा."

गजाने हमी भरली तसा राघू आश्वस्त झाला. गजाने गाडी गल्ली बोळातून फिरवायला सुरुवात केली. रव्या आणि त्याचे मित्रही त्यांचा पाठलाग करतच होते. शुभी कमालीची भेदरली होती. त्या भेदरण्याने ती राजनला अजूनच चिकटली. तिचा तो स्पर्श ......

जर दुसरी वेळ असती तर.......

पण सद्ध्या तिला धीर देत राहणे हेच राजनच्या हातात होते. आणि ते तो इमाने इतबारे करत होता.



तिकडे मेघी सत्याकडे पोचली.

तिला एकटीलाच येताना पाहून सत्या स्वतःशीच हसला.

"मला माहीत होतं तू एकटीच येणार ते."

"म्हणजे....?"

"सोड ते.....नंतर सांगेन सगळं. बस गाडीवर..."

मेघीने तिची स्कूटी पार्क केली आणि सत्याच्या बाइकवर बसली. सत्याने गाडीला किक मारली.......



**************************************************************************



"थांब साल्या. रव्याच्या बहिणीला पळवणं एवढं सोपं वाटलं होय रे."

"गजाभाऊ... रव्याच्या हातात गुप्ती आहे."

राजन घाबरलाच होता.

"काळजी करू नको राजनभौ, आपण पण काय अगदीच चिंधी नाय हाय. हे बघ....!"

राजनच्या शेजारी बसलेल्या गजाच्या एका माणसाने सिटखाली लपवलेली तलवार दाखवली. तशी शुभी रडायलाच लागली.

"काळजी करू नको ताई. वकिलाच्या पोरावर तलवार चालवायला आमी काय येडे नाय. पण अगदीच जीव वाचवायची वेळ आली तर असावी म्हणून जवळ ठेवलेली आहे."

गजा समजावणीच्या सुरात बोलला तसा शुभीच्या जिवात जीव आला.



आतापर्यंत शुभी आणि राजन पळाल्याला दीड तास होवून गेला होता. गजाने गाडी सांगोलारोडला काढली. रव्या आणि त्याची गँग पाठलागावर होतीच. पण सुदैवाने त्यांच्याकडे गजासारखा कसबी ड्रायव्हर नसावा. गजाने सुसाट वेगात गाडी काढली. दोन- अडीच तासात गाडी सांगोल्यात प्रवेश करत होती. रव्याची गाडी पाठीमागे होतीच.



"आता काय करायचं रे राघू ? तुझ्या त्या सत्याच्या मामाचं घर कुठे आहे ते सांग, म्हणजे गाडी तिकडे घेतो."

"अहं आंणखी थोडा वेळ गाडी अशीच फिरवीत राहा भाऊ."

राघूच्या मनात काही वेगळेच चालले होते.

"असं काय करतो राघू, गाडी घेऊ दे ना सरळ मामाच्या घराकडे. आठवतं ना सत्या काय म्हणाला होता ते.. एकदा मामाकडे पोचलं की मग रव्याचा देव पण हात नाही लावू शकणार आपल्याला."

"काय करू रे भाऊ?"

सांगोल्याच्या गल्ल्यातून गाडी फिरवताना गजाने विचारले.

"मला एक सांग गजाभाऊ. तुला काय बघायला आवडेल. रव्याचा पराभवाने एवढासा झालेला चेहरा की त्याचं मार खाऊन सुजलेलं शरीर?"

गजा विचारात पडला.



"माराचं काय? त्याला मी कधीही ठोकू शकेन... पण मला त्याचं हरलेलं, एवढंसं झालेलं थोबाड बघायला आवडेल."

गजाने विचार करून उत्तर दिलं. असंही त्याला रव्यावर मात करण्यात स्वारस्य होतं. रव्याला मान खाली घालायला लावण्यात जी मजा होती ती मारामारीत थोडीच येणार होती.



"राजन किती वाजले?"

राघवने विचारलं......!

"सात-साडे सात झाले असतील....; का रे?"

गजाभाऊ गाडी साइडला घ्या. आपण सरेंडर करणार आहोत. तसा गजा चमकला.

"काय? हल बे... आपण अशी हार नाय मानणार. हाणू साल्याला.....!"

"गजाभाऊ प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. हार रव्याचीच होणार आहे. नाहीतरी विनाकारण मारामारी करून नंतर तुरुंगात जाण्यापेक्षा गपचुप बसून मजा बघणं जास्ती चांगलं नाही का."

राघव बोलला तसा गजा अजून बुचकळ्यांत पडला.

"आपल्याला कायपण कळत नाय बग भौ.....!"

"माझ्यावर विश्वास ठेवा, गजाभौ..... रव्याचं एवढंसं झालेलं थोबाड बघायचं ना तुम्हाला."

राघूने हसून खात्री दिली तशी गजाने एका साइडला घेऊन गाडी थांबवली. लगेच त्याचे सगळे पंटर हत्यारं काढून तय्यार झाले. तशीच वेळ आलीच तर फुकट मार का म्हणून खा?



रव्याची गाडी मागे येऊन थांबली आणि रव्या त्याच्या गँगसोबत खाली उतरला. सगळे जण तावातावातच सुमोकडे आले तशी गजा आणि त्याचे पंटर हत्यारासकट खाली उतरले. तसा रव्या चमकला. गजा इथे असेल अशी त्याने अपेक्षाच केली नव्हती. त्याने पोरांना सबुरीचा इशारा दिला. इथे परक्या गावात राडा करण्यात धोकाच होता नाहीतरी.

"हे बघ गजा, आपली दुश्मनी आहे आणि ती तशीच चालत राहणार. पण इथे प्रश्न माझ्या बहिणीचा आहे. तेव्हा गुपचुप तिला आमच्या स्वाधीन कर. आपलं भांडण आपण नंतर बघू."

गजा काही बोलायच्या आतच राघू गाडीतून खाली उतरला.

"हे बघा दादा..., तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. इथे तुमची बहीण नाहीये. आम्ही सगळे पंढरपुरला चाललोय दर्शनाला. सांगोल्यात माझा मामा राहतो म्हणून जाता जाता थोडा वेळ त्याच्याकडे थांबणार होतो."

"मग हा गजा तलवारी घेऊन काय विठोबाच्या पायावर वाहायला निघाला होता का?"

"हत्यारं आपल्याकडं न्हेमीच असत्यात. तू पाठलाग करत होतास. देवाला निघालो होतो म्हणून आधी चुकवायचा प्रयत्न केला म्हणलं देवदर्शनात राडा नको. पण तू पिच्छा सोडायलाच तयार नाहीस म्हणून जाब विचारायला थांबलो. मारामारीच करायची असेल तर आमीबी काय बांगड्या न्हायीत भरलेल्या."

गजा गुरगुरला तसा राघू पुढे झाला.

"ओ दादा, हवी तर तुम्ही गाडीची तपासणी करा... बघा तुमची बहीण सापडते का?"

तसा गजाने आ वासला. राजन आणि ती रव्याची बहीण गाडीत अजूनही असताना हा येडा असा काय करतोय? राघूने त्याला हळूच डोळा मारला. गजाला काहीही समजत नव्हते... मेंदूच्या बाबतीत तो पक्का गुडघा होता. शेवटी जे होइल ते बघायचा निर्णय त्याने घेतला आणि पोरांना इशारा केला.



रव्या गाडीकडे गेला. आत बसलेल्या सगळ्यांना त्याने खाली उतरवलं.

गाडीतून उतरणार्‍यांकडे त्याने एकवार पाहिलं आणि राघूकडे वळला.

"ए राघ्या, नाटकं बास झाली. तुला काय वाटलं तुझ्या नाटकांना फसेन होय मी. मला सगळा प्लॅन माहीत आहे तुमचा. गपगुमान सांग्..शुभी आन तो राजा कुठाय?"

गजा टकामका एकदा त्याच्याकडे, एकदा राघूकडे तर एकदा नुकतेच गाडीतून उतरलेल्या राजन आणि शुभीकडे बघायला लागला. च्यायला हे काय झेंगाट?

ही पोरगी जर रव्याची बहीण... शुभी नाही, तर मग कोण आहे?



"कुणी रे... तिनं सांगितलं तुला. राघ्याने रव्याच्या गाडीत मागच्या बाजूला बसलेल्या त्या व्यक्तीकडे इशारा केला. तशी शशी गाडीतून खाली उतरली.

"अरे ही तर 'सुंदर' आहे आणि हा आमच्या कॉलेजचा शिपाई... संभाजी. मग राजन आणि शुभी कुठे आहेत?"

शशी बुचकळ्यांत पडली.



"वा शशे चांगली मैत्री निभावलीस. तुझ्यासारख्या मैत्रिणी असतील तर शुभीला शत्रूंची काय गरज आहे."

राघू शशीवर चांगलाच संतापला होता. शशीने काही न बोलता मान खाली घातली.

"म्हणजे सत्याचा संशय बरोबरच होता तर. तुझं आणि या रव्याचं काहीतरी आहे हे त्याला माहीत होतं. ठरलेली प्रत्येक गोष्ट तुझ्याकडून रव्याला कळणार याची त्याला खात्री होता. म्हणूनच त्या दिवशी तू आणि मेघी निघून गेल्यानंतर त्याने प्लॅन बदलला. अर्थात मेघीला आतापर्यंत कल्पना आली असेलच याची.



बाय द वे, रव्या ..... आत्तापर्यंत सातार्‍याच्या राम मंदिरात राजन आणि शुभीचं लग्न लागलं असेल. लग्नात तू काही गोंधळ घालू नयेस म्हणून तुला तीन चार तास सातार्‍याच्या बाहेर काढण्याची जबाबदारी माझी होती, ती मी पार पाडली. त्यात हा संभा आणि सुंदर या दोघांबरोबरच गजाभाऊंची पण चांगलीच मदत झाली. अर्थात मूळ प्लॅन काय आहे ते फक्त मी , राजन आणि सत्या आम्हालाच माहीत होतं.



माफ करा गजाभाऊ, तुम्हाला अंधारात ठेवलं आम्ही पण ते गरजेचं होतं. रव्या, आता तू मला मार, हाण नाहीतर काहीही कर, आपल्याला पर्वा नाही. दोस्तीखातर एवढं करणं शक्य होतं मला मी ते केलं. त्यांचं लग्न आतापर्यंत लागलं असेल, आता तू काहीही करू शकत नाहीस. माझं जे होइल ते होइल....आता पुढे इश्वरेच्छा."

राघव शांतपणे हाताची घडी घालून उभा राहिला.



रव्याला काहीच सुचेनासं झालं. सालं या टिनपाट पोरांनी त्याला पद्धतशीरपणे बनवलं होतं. त्याला सातार्‍याच्या बाहेर काढून त्याच्या बहिणीचं लग्न सातार्‍यातच लावून दिलं होतं. या सगळ्या प्रकरणात त्याचा मात्र पद्धतशीरपणे मामा करण्यात आला होता. त्याचं ते पडलेलं थोबाड बघून गजा खदखदून हसायला लागला.



"राघू भौ, मानलं राव तुमाला आणि तुमच्या त्या सत्याला. कसला भारी चु...... बनवलात या रव्याला. जबरा प्लॅनिंग होतं राव. लै भारी. सॉलिड मजा आली राव. ए रव्या.. जा...जा सातार्‍याला परत आता....! निदान बहिणीला सासरी जाण्यापूर्वी एखादी भेट तरी होइल."

गजा आणि कंपनी जोरजोरात हसायला लागली.



रव्याने रागारागाने गाडी स्टार्ट केली. तशी शशी आणि त्याची सगळी दोस्तकंपनी गाडीत बसून निघून गेली.

गजाने राघूला कडकडून मिठी मारली.

"जबरा राव... लै भारी . चार तास तुमाला घेऊन फिरतोय. शंका पण आली नाही की गाडीत बसलेली माणसं कुणी दुसरीच आहेत. चला आपण पण जाऊ सातार्‍याला. त्यो रव्या तिथं काही गोंधळ घालायला नको. चला.....!"

आणि गजाभौनी गाडी सातार्‍याकडे वळवली.



"राघुभाऊ निदान सतीशरावांच्या मामाकडं एकेक कप चहा तरी घेतला असता ना?"

संभाने न राहवून विचारलं तसा राघू खुसखुसून हसायला लागला.

"येड्या सत्याला कोणी मामाच नाही? त्यानं रव्यालाच मामा बनवला."



***************************************************************************



राजन दादरला चार नंबरवर वाट पाहत होता. साडे सात आठच्या दरम्यान क्लास आटपून शुभी आली.

"सॉरी राजा, तुला खुपा वाट बघायला लागली असेल ना?"

"काही होत नाही गं त्याने. माझी अर्धी कादंबरी वाचून झाली तोपर्यंत."

राजनने पुस्तक बंद करून खांद्यावरच्या बॅगेत टाकले.

"कुठलं वाचतोयस?"

"हृदयस्पर्ष.... सुशिचं!"

"ओहो लौकिक आणि मैत्राली.... बरोबर ना? पारायणं केलीत मी त्या पुस्तकाची. तुला कुठे मिळालं आज हे पुस्तक?"

"अगं सत्या भेटला होता सकाळी चर्चगेटला. त्याने दिलं... म्हणाला आजच्या दिवशी या सारखी दुसरी कुठली भेट नसेल तुझ्यासाठी."

"अय्या सत्या, त्याला घरी यायला सांगितलेस की नाही मग? किती दिवस झाले नाही भेटून?"

"हं आमचाही तोच विषय झाला आज. बहुतेक येत्या रवीवारी भेटायचे ठरतेय. कळवतो म्हणालाय. बघू... राघू आणि मेघीशी देखील बोलू. जमल्यास एक छोटंसं स्नेहसंमेलन करू."

"वाव किती मज्जा येईल ना?"



"शुभे, आज चौपाटीवर जाऊ या? बाहेरच कुठेतरी जेवण करूया आज. छान रात्री उशीरापर्यंत फिरू आणि शेवटची लोकल पकडून जाऊ घरी."

"काय राजे, आज भलत्याच मूडमध्ये दिसताय? ठीक आहे जशी आपली आज्ञा."



दोघेही फिरत फिरत चौपाटीवर पोहोचले. चौपाटीवर आज थोडी जास्तच गर्दी होती. दोघे हातात हात घालून मनसोक्त भटकले. चौपाटीवर भेळ, पाणीपुरी खाल्ली. शेवटी दमून एका ठिकाणी बसले.



"शुभे, एक विचारू?"

"विचार ना?"

"तू सुखी तर आहेस ना? माझ्याबरोबर पळून येऊन लग्न केल्याचा पश्चाताप तर होत नाहीये ना तुला?"

"असं का विचारतो आहेस, राजा? मी कधी कुठल्या गोष्टीबद्दल तक्रार केलीय? हा निर्णय आपण विचार करूनच घेतला होता ना? आणि हे दिवस कायम का राहणार आहेत? आयेंगे मेरी जान... हमारे भी दिन आयेंगे. एक दिवस आपण आपल्या कारने इथे येऊ."



शुभाने हळूच आपला एक हात राजनच्या गळ्यात टाकला आणि त्याच्या आणखी जवळ सरकली. राजनने तिच्या खांद्यावर टाकलेला आपला हात हळूच काढून घेतला. बॅगेतून एक छोटीशी पुडी काढली. ती उघडून तिच्यातला मोगरीचा गजरा बाहेर काढला आणि हळुवारपणे शुभीच्या केसात माळला.



"राजन........."

"शू... काही बोलू नकोस... जस्ट फिल इट....

अँड....

हॅप्पी वॅलेंटाईन्स डे माय स्वीट हार्ट.....!"

शुभी आवेगाने त्याला चिकटली. राजनने आपला हात तिच्या गळ्यात टाकला आणि बघता बघता दोघेही समोर दिसणार्‍या त्या अथांग समुद्राच्या सहवासात जगाला विसरून गेले.


Happy Valentines day























समाप्त.

****************************************************************************



तळटीप : यातील मुलीच्या भावाला वेड्यात काढून लग्न करायची कल्पना माझ्या एका मित्राने मला सांगितली होती. त्याच्या मते ती बहुदा सुशिची एखादी लघुकथा असावी. मी काही ती कथा वाचलेली नाही, पण ती कल्पना मात्र इथे वापरलीय. कथावस्तू, स्थळ, पात्रे, संवाद सर्वकाही माझे आहे. पण मूळ कल्पना जर खरोखर सुशिंची असेल तर त्याचे श्रेय सुशिंना मिळायलाच हवे. जर कथा जमली असेल तर ते श्रेय सुशिंचे आहे, जर बिघडली असेल तर तो माझा दोष आहे. माझी ही पहिली वहीली प्रेमकथा त्या माझ्या आवडत्या लेखकाला कै. सुहास शिरवळकर यांना सादर समर्पित.






लेखक: विशाल कुलकर्णी.

अजगर

मला प्राणी खूप आवडतात. पण सर्वच नाहीत. जमिनिवर, भिंतींवर किंवा कुठेही सरपटणारे प्राणी मला आजिबात आवडत नाहीत. किळस वाटते तसेच भितीही. विशेषतः सापांची.

तुम्ही म्हणाल ही तर `गद्रे` म्हणजे कोब्रा. तरीही सापांची भिती?
तर उत्तर आहे -- हो .

चायनिज कालगणतीप्रमाणे बारा प्राण्यांची नावे बारा वर्षांना दिली आहेत. ज्या वर्षी एखाद्याचा जन्म होतो त्या वर्षीच्या प्राण्याचे गुणधर्म त्या व्यक्तीत आढळतात असे चीनी लोक मानतात.
उदा: डॉग ईअरमधे जन्मलेली व्यक्ती प्रामाणिक असते किंवा ऑक्स ईअरमधे जन्मलेली व्यक्ती बैलासारखी कष्टाळू असते.
माझा जन्म झाला तेव्हा स्नेक इअर होते. चीनी मतांनुसार मी शांत स्वभावाची, आपापल्या वाटेने जाणारी. पण उगाचच डिवचल्यास मात्र फणा काढून दंश करणारी असायला हवी.
`तशी मी आहेच` असे माझे यजमान म्हणतात. आमच्या दोघांच्या भांडणात तर याचा उल्लेख हमखास होतो.
तर सांगायचा मुद्दा हा की मी कोब्रा असून आणि स्नेक इअरला जन्मलेले असूनही  मी सापांना भिते.

ही झाली पार्श्वभूमी.



आता खरी गोष्ट....
जेव्हा आम्ही अमेरिकेत आमचं स्वतःचं घर घेतलं तेव्हाची. सर्व कागदी व्यवहार पूर्ण झाल्यावर घर ताब्यात मिळालं. त्यानंतर सामान ने आण करायला किंवा इतर साफसफाई करून घेण्यासाठी
ब-याचदा तिथे जा ये चालली होती. एका संध्याकाळी काही कामासाठी या नवीन घरी गेलो होतो. आता पर्यंत इतकेदा तिथे गेलो-आलो.  कुणालाही याचं सोयर-सुतक नव्हतं.  तसं तर आमची आधीची मालकिण बरेच वर्षं राहून घर सोडून गेली तरी शेजा-या पाजा-यां ना काही वाटलं असेल असे आम्हाला जाणवलं तरी नाही.  तर आम्ही नविन आल्यावर कुणाला काय त्याचं?
असो. तर आम्ही एकदा तिथे गेलो असता आमच्या घराच्या उजवीकडच्या घरात राहणारा शेजारी बाहेर जाऊन घरी आला. त्याने गाडी त्याच्या गॅरेज मधे पार्क केली आणि काही तरी घेऊन घरात शिरलेलं मी त्याला पाहिलं, कारण गॅरेजचं दार त्याने अजून बंद केलं नव्हतं. नंतर लगेचच रिकाम्या हाताने बाहेर आला तो आमच्याच घराच्या दिशेने.
आम्हाला आमच्या गाडीतलं सामान घरात नेऊन ठेवायचं होतं. आम्ही घरापासून गाडीपर्यंत असं आत बाहेर करतच होतो. तो हात हलवत “हाय”, “हॅलो” करत आमच्या जवळ आला.
आम्ही बाहेरच थांबलो. आनंद झाला.
“चला! शेजार तरी बरा मिळाला” असं मनातल्या मनात म्हणून जरा सुखावलो.
“टिपिकल अमेरिकन गोरा असला तरी चांगला आहे हो” मी मनातच म्हटलं.
तो पुढे झाला. माझ्या यजमानांशी हस्तांदोलन करून आम्हाला `वेलकम` म्हणाला.
स्वतःची ओळख करून दिली. नाव, जॉब बद्दल थोडक्यात सांगितलं. आमची चौकशी मात्र बरीच केली.
आम्हाला काहीच गैर वाटलं नाही. खरं तर अगदी भारतात गेल्या सारखं वाटलं. तिथे नाही का शेजारच्या काकू, मामा, अण्णा आपणहून चौकशी करायला येतात. अगदी तस्सच.
कसं बरं वाटलं. गोरा असला तरी कसा आपलाच वाटला. देसी!
बाहेरच बराच वेळ गप्पा मारत उभा होता आमच्याशी.
आम्ही त्याला काही आमच्या घरात बोलावले नाही.
अहो, आमच्या घरात बोलावून काय करणार? बसायला खूर्ची तर हवी ना आमच्या त्या नविन घरात.
आमच्या घरात नव्हती, पण त्याच्या घरात तर असायलाच हवी होती.
इथे अमेरिकेत ना? कस्सच काय?
दोघांनीही एकमेकांना घरात बोलावले नाही.
बाहेरच गप्पा चालू राहिल्या.


बोलता बोलता त्याचा लहान मुलगा “डॅड, डॅड”करत काहीतरी सांगत आला.
“धिस इज माय सन.” पुढे काही तरी नावं ही सांगितलं.
आम्ही हसून त्याच्या कडे पहात त्याला “हाय” केलं. तो डॅड्च्या मागे गेला आणि हात डोळ्यासमोर घेऊन चेहरा लपवू लागला.
“ ही इज बिट शाय.” डॅड मुलाच्या पाठीवर थोपटत म्हणाला.
आम्हीही त्याच्या शाळेची चौकशी करायला लागलो. त्यावरूनच त्याच्या वयाचा विषय निघाला.
“टूडे हि बीकेम फाय. ईट्स हिज बर्थडे टूडे.”
आम्ही आनंदून ( निदान चेह-यावर तसे दर्शवून) “ओह, रिअली? हॅपी बर्थ डे” असं म्हणून त्या छोट्या गो-याला शुभेच्छा दिल्या.
छोट्याने चेह-यावर काहीही प्रतिक्रिया दर्शवली नाही. पण मागे फिरला आणि धावत घरात पळाला.
मोठा गोरा उत्तरला “ वुई हॅड गॉन टू गेट अ गिफ्ट फॉर हिम. वुई गॉट अ पेट. अ पायथन”


माझा हसरा चेहरा पार उतरला आणि मी विचारलं “व्हॉट? अ पायथन?”
या प्रश्नाचं उत्तर होतं “याह. सम थिंग अनयुजवल! ही वोंट पू, पी ऑन द कार्पेट. ईट्स अ‍ॅन इझी पेट.”
“बट वोंट इट बी डेंजरस फॉर युवर लिटिल किड्स?” माझ्या यजमानानांनी चकित होऊन काळजीच्या स्वरांत विचारलं.
“ ईट्स बेबी यट. जस्ट दॅट लाँग” दोन हाताच्या दोन्ही तर्जन्या एक फूट रूंदावत म्हणाला.
“सम टाईम्स आय मे ब्रिंग हीम आऊट, रॅप्ड अराउंड माय रिस्ट” गोरा म्हणाला.

माझी वाचाच बंद पडली हे ऐकून.
“ही इ़ज इन केज. डोंट वरी” गो-याला माझी भिती घाब-या घुब-या चेह-यावरून दिसली असावी.
फारसं पुढे न बोलता "बाय बाय" करून आम्ही संभाषण बंद केलं आणि आमच्या घरात शिरलो.

झालं! त्या अजगर नावाच्या पेटचं गिफ्ट आणलं शेजा-याने. पण हे ऐकून धाबं दणाणलं माझं.
अजब तर वाटलंच, कारण अजगर हा जंगली प्राणी. अजून पर्यंत प्राणीसंग्रहालयात पाळतात हे ऐकून आणि पाहून होते.
“इथे अमेरिकेत काय वाट्टेल ते चालतं हेच खरं!” यजमानांनी अमेरिकेवर कॉमेंट करायची संधी सोडली नाही.
“पण म्हणून जंगली विशालकाय प्राणी का कुणी पाळीव करतं? आणि आला म्हणजे सरपटत घराबाहेर?” माझे प्रश्न.
“ शेजारीच आपलं घर आहे. `या. बसा,`असं म्हण, आलाच तर.”  यजमानांनी एक कूल उत्तर फेकले.
माझी बोबडीच वळली. आतापर्यंत माझ्याच घरात एक अजगर शिरेल हा विचार मनात डोकावला ही नव्हता. मला काहीच सुचेना.

या नव्या घरी ये जा करताना त्या गो-याची गोरी बाहेर सिगरेट फूंकत मोबाईलवर बोलत असताना दिसायची. त्यांच्या घरच्या फ्रंट यार्ड मधे लहान सायकल, बास्केट बॉल, हेल्मेट लोळताना मी अनेकदा पाहिले होते. एकदा पावसातही भिजत पडलेले खेळ दिसले. रात्री-बेरात्री ते तसेच लोळत असतात हे ही माहित होते. ती गोरी फारशी कामसू आणि जबाबदार दिसली नाही.
कधी अजगराशी खेळता खेळता मुलांनी केजचं दार उघडं टाकलं तर ह्या बयेला कळणार ही नाही? तो सरपटत बाहेर पडेलच आणि थेट आमच्याच घरात येईल अशी आता माझी खात्री झाली.

“अजगर या त्याच्या नावात उकार, रफार किंवा साधी वेलांटी असलेलीही वळणं नाहीत. मग वाकड्या वळणाने तो इथेच कशावरून येईल? तो कदाचित सुतासारखा ही जाईल की सरळ तिथे पलिकडे.” माझ्या यजमानांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला.
पण माझ मन काही शांत राहिना. त्या रात्री स्वप्नात विविध रंगांचे, आकारमानाचे साप मला आजूबाजूला वळवळताना दिसले. अनेकदा मला जाग आली असं म्हणण्यापेक्षा क्वचित झोप लागली असं म्हणणं अधिक वास्तव ठरेल.
मला त्या अजगराच्या विषयाशिवाय दुसरं काही सुचेना.
मी ठाम ठरवलं की त्या शेजा-यांना पेट अजगराच्या पिंज-यासाठी एक कुलूप भेट द्यायचं आणि त्याची एकुलती एक किल्ली आपल्याकडेच ठेऊन घ्यायची.

दुस-या दिवशी घरात मी पुन्हा तो विषय काढला. माझ्या मुलाला आणि यजमानांना मी ही कुलूपाची आयडिया सांगितली तर त्यांनी मला फुल वेड्यात काढलं.
“मग काय कारायचं आता? पोलीस कंप्लेंट करूया का ?” माझं डोकं सुपर चाललं.
“त्यांनी लायसन्स घेतलं असेलच. कंप्लेंट करून काय होणार?  उगाचच शेजा-याशी वैर.”  ईति यजमान.

मी मात्र आता रडकुंडीस यायची बाकी होते. ते पाहून माझ्या घरातल्या दोन्ही मर्दांना चेव चढला.
“तू एका मोठ्या काठीला जाड चाकू बांधून ठेव. तो पायथन घरी आलाच तर खचाखच कापून पिसेस कर त्याचे.” मुलाची भन्नाट आयडिया.
“नको नको. सापाचं पालीसारखंच असतं. जितके तुकडे करशील ते सर्व वळवळत राहतात. पण तू कशाला घाबरतेस? अजगराला खायला दिलं की तो आळश्यासारखा दिवस दिवस झोपून राहतो.” यजमानांनी प्राणीशास्त्रातील अगाध माहिती मला पुरवली.
“ आपल्याकडे अजगराला खाऊ घालायला काय मिळणार? घास पत्ती? अजगर तर मांसाहारी प्राणी. आपल्या फ्रिजमधे कोंबडी तर सोडाच पण तिचं साधं एक अंड मिळण ही मुश्किल.”  माझी असहायता मी व्यक्त केली.
घरात मोठ्ठा हशा पिकला.
“ए मम्मा, पायथन काही फास्टेट रनिंग अ‍ॅनिमल नाही. तो सरपटत येईपर्यंत तू पळून जाऊ शकतेस की नाही?”  मुलाने जरा उपाय सुचवायचा प्रयत्न केला.
तो मला पटला नाही हे सांगायला हवं का?
तो अजगर सरपटत सरपटत समोर उभा ठाकला, नाही म्हणजे आडवा ठाकला तर मी थिजल्यासारखी होईन,  माझ्याच्याने एक पायही पुढे टाकवणार नाही आणि आम्ही दोघे ही एकमेकांकडे आ वासून पाहत राहू हे माझं मलाच ठाऊक होतं.
“घाबरून गाळण उडालेली मी, राहेन तिथल्या तिथे आणि तो मात्र झडप घालेल माझ्यावर.” माझी भिती मी व्यक्त केली.
“भारतात गेले की नक्की, गारूड्याकडे असते तसली एक टोपली आणि पुंगी विकत घेऊया.” असं म्हणून मी भारतातून आणायच्या वस्तूंच्या यादीत अजून एक भर टाकली.
“तू पुंगी वाजवलीस तर दूर जायच्या ऐवजी तो पायथन आणि शिवाय आजूबाजूचे अजून साप जमा होतील तूझ्या पुंगीच्या नादावर डोलायला.”  यजमानानांनी हाताचा फणा केला आणि तोंडाने फुत्कार काढून काढून मला फणा मारू लागले.
मी पुंगी आणायचा माझा विचार हद्दपार करून टाकला.
पण टोपली आणून ठेवावी असं मनातल्या मनात घोटून ठेवलं.

“अगं किती ते चर्वितचरण? तो एवढासा एक फूट भर. तू किती? साडे पाच फूटी. तो तूला करून करून काय करू शकेल?” आता मात्र यजमानांचा पारा चढलेला दिसला.
मी मनातल्या मनातच पुटपुटले, “तो आता आहे फूट भर. पण काही दिवसातच खाऊन पिऊन होईल की अंगापिंडाने मजबूत. चांगला दहा बारा फूटी माझ्या दुप्पट.”
लगेचच टोपलीचा विचार ही काढून टाकावा लागला. त्याला तर भलं मोठ्ठं पिंपं लागेल ठेवायला. तेच बघायला हवं कुठेतरी. असा विचार पक्का केला.

माझ्या मुलाने मला समजवण्याचा प्रयत्न सोडला नाही. “पप्पा तूला टिझ करतोय. पायथनला फणा नाही काढता येत. किंवा तो फुस्स फुस्स असं ही करत नाही नागासारखा.”
यजमानांनी हळूच वरती अजून मसाला ओतला. “हो. हो. तो बारिकसा दंश नाही करत. तो डायरेक्ट झडप घालतो. चांगला विळख्यात घेतो आणि... बस्स, मग गट्ट्म!”

शाळेत अभ्यासलेल्या सर्पज्ञानाची आठवण मला पुन्हा करून देण्यात आली.
“अजगर काही विषारी नसतो. पण त्याचा घट्ट पाSSश.. म्हणजे मृत्यू अटऽऽळ.” अजगराच्या माहितीची उजळणी केली जात होती.
“नाहीतर तू असं का नाही करत? तू एक बारिक धारदार  चाकू सतत जवळ बाळग. अजगराने तूला गिळलं तर तू त्याचं पोट फाड आणि जिवंत बाहेर ये.  मग `माझी शौर्यकथा` नावाचा लेख लिही. अगं, हे नाव पाहून कुणी एक जण तरी वाचेल तूझा लेख.”  कुचकट चेष्टेला गंभीर उपदेशाचे वेष्टण होते. अजगर हा विषय जास्तीत जास्त चटपटा होत आहे हे माझ्या ध्यानात यायला जरा वेळच लागला.

घरातून काही सहकार्य मिळणार नाही याची आता मला खात्री पटली. आपल्या भितीची इथे कुणालाही ना पर्वा ना गांभीर्य, हेही मला चांगलं कळून चुकलं.
“उगाचच आपल्या फिरक्या घेण्यासाठी विषय कशाला द्या?” असं म्हणून अजगराविरोधी कारवाया करण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा विचार विनिमय करण्यासाठी माझ्या घरातल्या सभासदांबरोबर मीच भरवलेल्या त्या सभेचा मी त्याग केला.

इंटरनेटवर जाउन अजगराविषयी अधिक माहिती गोळा केली.
जवळपासच्या दोन तीन स्नेक कॅचर्सचे फोन नंबर शोधून काढून तोंड पाठ करून ठेवले.
अजगरांना तोंड देऊन यशस्वी ठरलेल्या वीरांच्या अनेक साहस कथा वाचून काढल्या. त्यांनी अवलंबलेल्या सर्व ट्रिक्स पुरत्या समजून घेतल्या. तश्या प्रसंगाला तोंड द्यायचं बळ माझ्या मनात एकवटून ठेवलं.
चुकून पाय पडल्यावर जखमी होऊन वळवळणारे गांडूळ पूर्णपणे मारून टाकण्याच्या प्रयत्नात मी सध्या आहे. लवकरच ते मी शिकेन अशी आशा माझ्या घरच्या मंडळींना वाटते.

यदा कदचित अजगर आमच्या घरी बिन बुलाया आलाच तर त्याची चांगली मेहमान-नवाजी
करण्यासाठी मी हळूहळू तयार होते आहे.



लेखिका: मीनल गद्रे

त्या जाहिराती...

दूरदर्शनचे मी नेहमी दुरूनच दर्शन घेते. त्यापेक्षा माझा जास्त ओढा संगणक आणि पुस्तके यांच्याकडे आहे. शाळेतून आल्यावर मुलाची कार्टुन्स, ऑफिसातून आल्यावर नवर्‍याचे खेलकूद आणि समाचार आणि उरलेला दिवसभर सासूच्या कुटाळक्या करणार्‍या मालिका चालू असताना माझी काय बिशाद आहे दूरदर्शनचे दर्शन घ्यायची ! त्यामुळे होते काय, की साधारण संध्याकाळी ७.३० ते ९.३० या वेळात, अर्ध्या तासाला एक या हिशोबाने दाखवल्या जाणार्‍या मालिकांपैकी कोणती तरी जेवताना बघायला मिळायची. त्यात आपसूकच काही जाहिराती बघायला मिळायच्या. त्यातल्या मला २ जाहिराती लागल्या की मला जाम हसायला यायचं. एक म्हणजे " हार्पिक " ची आणि दुसरी म्हणजे " लक्स.....उटण्याचा " ही. आता यात हसण्यासारखं काय आहे ? हे तुम्ही विचारालंच. म्हणून पुढे वाचा तर खरं...




“ हार्पिक’ "च्या जाहिरातीत एक विक्रेता एका गृहिणीला आव्हान देतो; की त्यांचे हार्पिक हे उत्पादन वापरल्यामुळे त्या गृहिणीच्या  घरातील शौचालयातले पिवळे डाग सहज निघून जाऊ शकतील. गृहिणीचा अर्थात्‌च त्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. कसा बसावा ! अहो मला विचारा, हे काम सोपे नव्हेच. पण तरिही ती या प्रयोगाला मान्यता देते आणि अर्थात्‌च जाहिरातीकरता तयार केलेले डाग जाहिरातीतल्या हार्पिकने चक्क निघून जातात. इथपर्यंत ठिक आहे. पण खरी गंमत तर पुढेच आहे. हे घडल्यावर ती गृहिणी अचंबित होऊन " मजा आली " असं जे म्हणते ना त्याला मी आणि माझा मुलगा खूप हसतो.



हि जाहिरात मूळ हिंदीत आहे आणि मराठीतून दाखवताना ती डब केलेली आहे. त्यामुळे यातलं ’ " मजा आली " हे वाक्य एखादा अमराठी भाषिक जसा मराठीतून बोलेल त्याप्रमाणे वाटतं आणि त्या उच्चारामुळे माझ्या मुलाला हसू येतं. आता मला हसू का येत असेल याबद्दल कोण सांगू शकेल ?



अहो, रविवारच्या सकाळी आव्हान घेऊन का होईना पण आमचं शौचालय आयतं स्वच्छ करून मिळालं तर ही मजा कोणाला नकोय ! तो सद्‌गृहस्थ आपलं हार्पिक उत्पादन घेऊन आमच्या परिसरात यायची मी कधीपासून आतुरतेने वाट पहातेय, त्याला आव्हान द्यायला :-)




आता दुसरी जाहिरात. त्यतली षोडशा आपल्या मादक अदा दाखवत " आंघोळीला चाललेय.....उटण्याच्या " असं जाहिर करायचा अवकाश, तिच्या आजूबाजूला लगेच मंगलवाद्य वाजायला लागतात; एक वृद्धा अगदी तिला औक्षण करण्याकरता म्हणून ताम्हण, निरांजन वगैरे घेतलेली दाखवली आहे. दोघं-तिघं तिच्या भोवती नाचताहेत.



आता मला सांगा " आंघोळ " ही काय जाहिरपणे करायची गोष्ट आहे का ? इथे मुंबईत तर ती एकदा सकाळची धुणी-भांडी आपटून ( आटपून ) नळाची अंगठ्याएवढी धार करंगळीएवढी व्हायच्या आत उरकून टाकायची गोष्ट आहे. पण मग हे असं काय ?



बहुदा तिथे आपल्यापेक्षाही पाण्याचे हाल असणार, त्यामुळे जुम्मे के जुम्मे आंघोळ करणार्‍या त्या षोडशेला एकदाचा आंघोळीचा मुहूर्त मिळाला म्हणून हे पंचोपचार. नाहितर उटणं काय आम्ही सुद्धा लावतो चार दिवस दिवाळीचे; पण आमची नाही कोणी अशी बडदास्त ठेवंत. उलट कधीमधी दिवसातून दोन वेळा आंघोळ केलीच तर....जास्त वापरल्याने साबण, गॅस गिझर वापरल्याने गॅसचा जास्त वापर आणि वॉशिंग मशीन वापरल्याने वाभाडेच निघतात आमचे.



तेव्हा मी सुद्धा अशीच जुम्मे के जुम्मे आंघोळ करून घरातल्यांना चांगलाच इंगा दाखवायचा विचारात आहे.



सध्या तरी मला हसवून माझा दिवसभराचा शीण घालवणार्‍या या दोनच जाहिराती. बाकी सगळ्या " पहलेसे और बेहेतर " असं म्हणून मूर्ख बनवण्याच्या लायकीच्या. म्हणजे " आधीचा आमचा कम बेहेतर माल वापरून संपवल्याबद्दल धन्यवाद, आता हाही नवीन बेहेतर माल वापरून संपवा म्हणजे आम्ही याच्यापेक्षाही बेहेतर माल तयार करून तुमचा खिसाही खाली करायला मोकळे " या धाटणीच्या.



लेखिका: माझी दुनिया

होळीचा हुडदंग!

होळी आली .. तसा अद्याप वेळ आहे, पण होळी आपल्या दारावर टिचक्या मारीत आहे. होळीबरोबर इतर अनेक गोष्टी आपल्या दारावर फक्त टिचक्याच नव्हें, तर हातोडा मारीत आहेत असं म्हणायला हरकत नाहीं.. उदाहरणार्थ, लवकरच सुरू होणारं शाळेचं नवीन वर्ष; मुलांची झोप उडवणार्‍या वार्षिक परीक्षेचा आईबापांवर होणारा (नको तेवढा) विपरीत परिणाम; या निमित्ताने आईबापांचा आपल्या मुलांमुलींवर वाढत जाणारा दबाव; (ओघाओघाने येणार्‍या आत्महत्येच्या सत्रांचा उल्लेख मी मुद्दामच करीत नाहींय !); के. जी. च्या वर्गात ऍडमिशन मिळवण्यासाठी शिकवण्यांचे वर्ग;  त्यापाठोपाठ शाळाशाळांतून के. जी. प्रवेशाच्या मुलाखती ... एक ना दोन ! तर चला, या गंभीर वातावरणाला थोडं हलकं करायचा एक हुडदंगी नाट्यमय प्रयत्न करूंया. पहिल्या प्रवेशाचं नांव आहे "के. जी. मुलाखती".



के. जी. मुलाखती



सूत्रधार : नमस्कार मित्रहो, शिक्षण क्षेत्रात एक क्रांति घडून येत आहे. विद्वान लोकांनी आपलं मत व्यक्त केलं आहे की आईबापांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिणाम मुलांच्या वाढीवर होत असतो. म्हणूनच मुलांना के. जी.च्या वर्गात प्रवेश देण्यासाठी, मुलांबरोबर, त्यांच्या आईबापांच्या मुलाखती घेण्याची प्रथा शाळाशाळांत सुरू केलेली आहे. एक नमूना पेश आहे.



( एका नेहमीच्याच शाळेतील एक नेहमीचंच ऑफीस. मुलाखत घेणारी बाई हातात एक पिशवी घेऊन प्रवेश करते. येतांच समोरच्या टेबलावर पिशवीतील काही लहानमोठे लाकडी ठोकळे पसरते; आपल्या जीनच्या खिशातून एक पिस्तूल काढून हवेत चालवते, व घोषणा करते. )



बाई : के. जी. ऍडमिशनच्या मुलाखती सुरू होऊं देत. पहिला बळी आत पाठवा. (एक घाबरलेला गृहस्थ आपली नखं चावीत प्रवेश करतो.) मिस्टर, घाबरण्याचं काहीहि कारण नाहीं. (तिच्या लक्षात येतं की तो आपल्या हातातील पिस्तुलाला घाबरला आहे, व ती आपलं पिस्तूल खिशात लपवते.) तुमचं नांव?



माणूस १ : पटेल.



बाई : (जरबीने) संपूर्ण नांव सांगा.



माणूस १ : श्रीयुत रामजीभाई देवजीभाई पटेल.



बाई : शिक्षण?



माणूस १ : गुजरात युनिव्हर्सिटीतून एम. कॉम.



बाई : (रुक्षपणे) आता हे ठोकळे त्यांच्या रंगांप्रमाणे या टेबलावर मांडा. (काहीवेळ तो ठोकळे लावायचा निष्फळ प्रयत्न करतो.) नापास. पुढल्या महिन्यात परत या. (तो घाबरून बाहेर पळतो.) पुढील पालक कोण आहे? (बाहेरून सूट घातलेला एक माणूस येतो.) हं, नांव?



माणूस २ : (आत्मविश्वासाने) डॉक्टर अनंतस्वामी रंगस्वामी मुदलियार हे माझं संपूर्ण नाव. मूळ वास्तव्य चेन्नई. गेली बरीच वर्षं मुंबईत स्थाईक.



बाई : सेनेची सैनिक नाहींय मी. इतिहास-भूगोल विचारला नाहीं. शिक्षण कुठपर्यंत झालंय?



माणूस २ : बॉस्टन युनिव्हर्सिटीतून M.B.B.S, F.R.C.S.



बाई : कळलं. सबंध बाराखडी नकोय. मला सांगा, इंग्रज़ी एस. आणि यू.च्या मधे कुठलं अक्षर येतं?



माणूस २ : सोपं आहे. (हातावरच्या घड्याळाकडे पहात) टी.



बाई : उत्तम. बाहेर वाट पहा. तुमच्या मुलाचा इण्टरव्यू झाला की तुम्हाला उत्तर मिळेल. बाहेर उभे रहा.



माणूस २ : माझ्या ’टी’ची म्हणजे चहाची वेळ झाली. थॅंक यू. (बाहेर जातो.)



बाई : पुढल्या पालकाला आत पाठवा. (माणूस ३ आत येतो.) नांव?



माणूस ३ : श्रीयुत मनसुख रणधीर तनखारामानी. उल्हासनगर युनिव्हर्सिटीतून प्रथम श्रेणीतून एम. कॉम. पास. बॅंकेत ...महिन्याची कमाई सांगू?



बाई : (रुक्षपणे) जास्त बोलायचं काम नाहीं. हा कागद-पेन्सील घ्या व एक कोंबड्याचं चित्र काढून दाखवा. (माणूस कागदावर कसलंतरी चित्र काढतो व कागद बाईला देतो.) तुमचा कोंबडा कोंबड्यासारखा नाहीं, अंड्यासारखा दिसतो.



माणूस ३ : कारण मी अंडाहारी आहे, कोंबडी खात नाहीं. काही दिवसांनी त्यातून कोंबडा बाहेर येईल, तेव्हां बघा. (तिच्या उत्तराची वाट न पहाता निघून जातो.)



बाई : बापरे, कसले कसले लोक येतात के. जी.च्या मुलाखतींसाठी ! (मोठ्याने) हं, पुढचा कोण आहे, आत या.



( बाहेरून एक मुलगा प्रवेश करतो. )



मुलगा १ : मॅडम, लवकर इंटरव्यू सुरू करा. मला घाई आहे. माझा क्रिकेटचा गेम अर्धा सोडून आलोय.



बाई : (तोंडावरचा घाम पुसून) नाव सांग.



मुलगा १ : "प्लीज़" म्हणा. चांगल्या संस्कारांचं लक्षण असतं. असूं दे. माझं नांव मनोज अनंतस्वामी रंगास्वामी मुदलियार. माझे बाबा डॉक्टर आहेत. आणि प्लीज़, हा डॉक्टरकीचा विषय सोडून दुसरे कुठलेही प्रश्न विचारा. मला डॉक्टर व्हायचं नाहीं.



बाई : औद्योगिक क्रांतीविषयी तुला काय माहिती आहे? .... प्लीज़ ... सांग.



( मुलगा १ न थांबता धडाधड उत्तर देतो. )



मुलगा १ : अजून काही माहिती हवीय? ( बाई घाबरून घाम पुसायला लागते. ) प्लीज़, टेंशन घेऊ नका. रिलॅक्स.



( मुलगा मागे न बघता बाहेर निघून जातो. बाईला भलताच घाम सुटला आहे. )



बाई : (नर्व्हस) नेक्स्ट....



( बाहेरून मुलगा २ आत येतो. )



मुलगा २ : बाई, तुम्हीं बसा ना. माझा मित्र मनोज म्हणाला, तुम्हीं भयंकर नर्व्हस आहात म्हणून. घाबरू नका, जास्त वेळ घेणार नाहीं तुमचा.  माझं नाव अमिताभ रामजीभाई पटेल. माझे बाबा जास्त शिकलेले नाहीत म्हणून माझ्या के. जी.च्या ऍडमिशनसाठी उगीचच टेंशन घेतात.



बाई : भारतातील सुवर्णयुगाबद्दल तुला काय माहिती आहे?



मुलगा २ : माझे बाबा, आजोबा, पणजोबा आणि आमच्या घराण्यातले सगळे जोबा सोन्याचांदीचे मोठे व्यापारी होते. त्यांच्या मनांत आहे की मीसुद्धा त्यांच्यासारखाच सोन्याचांदीचा व्यापार करावा. पण मला शिकून मोठा डॉक्टर व्हायचं आहे. तेव्हां त्याविषयी तुम्हांला कांही विचारायचं असेल तर ठीक, नाहींतर तुमचा, आणि महत्वाचं म्हणजे माझा अमूल्य वेळ दवडूं नका. आणि मी बाहेर गेल्यावर आधी आपला घाम पुसा. नाहीतर माझ्यामागून येणार्‍या मुलावर वाईट इंप्रेशन पडेल.



( तिच्या उत्तराची वाट न पहाता तडातडा निघून जातो. बाई घाम पुसत असते तेवढ्यात मुलगा ३ प्रवेश करतो. )



मुलगा ३ : हाय. माझं नाव ह्रितीक शाहमीर पचपन.



बाई : हे नांव थोडं फिल्मी नाहीं वाटत?



मुलगा ३ : असेल. पण मला आवडतं. मी तसा थोडा... नाहीं, जरा जास्तच फ़िल्मी आहे. माझ्या बाबांना सुद्धां आवडतं हे नांव. माझ्या बाबांचं नांव तनखारामानी आहे, पण त्यांना तनखा, म्हणजे पगार, वगैरे काहीं मिळत नाहीं. त्याची गरजच पडत नाहीं त्यांना. कारण मी सिनेमांतून व टीव्हीवर ऍड्स मधून कामं करतो. महिन्याला सत्तर-ऐंशी हज़ार सहज मिळतात, म्हणून डॅडने आपली बॅंकेतली जॉब सोडली. सध्या सगळं घर माझ्या कमाईवर चालतं. तेव्हां खरं तर मला शाळा-कॉलेजात ऍडमिशन घ्यायची सुद्धां गरज नाही. पण मग मलाच कधी तरी या सगळ्याचा कंटाळा येतो, म्हणून शाळेत येऊन मस्ती करावसं वाटतं. अजून काही जाणून घ्यायचंय? प्लीज़, मी जाऊं शकतो? सॉरी, आपला खूप वेळ खाल्ला. थॅंक्स. (नाच करीत बाहेर निघून जातो.)



( बाई काय बोलावं हे न सुचून पटकन समोरच्या खुर्चीवर बसते. )



सूत्रधार : (प्रवेश करून) तर मंडळी, तुमच्यापुढे पेश केलेले हे नमूने तुम्हांला कसे आवडले हे ज़रूर कळवा. धन्यवाद. (बाहेर निघून जातो.)





* * * * *



लेखक: लक्ष्मीनारायण हटंगडी

एकावर एक ....

एका मोठ्या कंपनीच्या डायरेक्टरच्या सेक्रेटरीची जागा अचानक रिकामी झाली. त्या महत्वाच्या जागेवर आपली वर्णी लागावी यासाठी कंपनीमधल्या व्यक्तींमध्ये चुरस, चढाओढ, खटपटी लटपटी, दबावतंत्र वगैरे सुरू व्हायच्या आधीच बाहेरून एक हुषार, चुणचुणीत आणि कार्यक्षम नवी सेक्रेटरी निवडून तिला आणायचे त्या डायरेक्टरने ठरवले आणि प्लेसमेंट सर्व्हिस चालवणा-या आपल्या मित्राला फोन करून चोवीस तासात ही निवड करून द्यायला सांगितले.
हे आव्हान स्वीकारून ती एजन्सी लगेच कामाला लागली. अनेक उमेदवारांची सविस्तर माहिती त्यांच्याकडे होतीच. त्यांची छाननी करून टेलीफोन, एसएमएस, ईमेल वगैरे माध्यमांतून चाळीस पन्नास जणींना दुसरे दिवशी परीक्षा आणि मुलाखतीसाठी बोलावून घेतले. विविध विषयांमधील प्रश्नांचे संच तयार होतेच, त्यातून निवडक प्रश्न घेऊन त्याचा वेगळा संच तयार केला. परीक्षण करण्यासाठी आणि मुलाखत घेण्यासाठी तज्ज्ञ मंडळींना बोलावून घेतले. पन्नास मल्टीमीडिया कॉंप्यूटर तपासून घेऊन सर्व्हरला जोडून दिले. अशी सगळी जय्यत तयारी त्या दिवशीच करून ठेवली.



दुसरे दिवशी ठरलेल्या वेळी तीस पस्तीस मुली हजर झाल्या. त्यांना परीक्षेला बसवून त्या मित्राने डायरेक्टरला फोन लावला, "खूप उमेदवार आलेले आहेत. त्यांची परीक्षा तासभर चालेल. त्यानंतर विश्रांती आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे. त्यात तासभर जाईल. तोंपर्यंत आमची तज्ज्ञ मंडळी परीक्षण करून योग्य मुली निवडतील. त्यानंतर या मुलींच्या मुलाखती घेण्यासाठी तुम्ही येऊ शकाल कां?   म्हणजे त्या एकदा तुमच्या नजरेखालून जातील."

"छे! माझ्याकडे एवढा वेळ नाही. हे कामही तुम्हीच करायला पाहिजे."

"ठीक आहे. आम्ही त्या सर्वांचे तांत्रिक कौशल्य तपासून पाहू. आमचे मानसशास्त्र तज्ज्ञ त्यांच्या स्वभावाचा अंदाज घेतील. त्यात चांगले वाईट असे नसते, तुम्हाला काय उपयोगाचे आहे ते तुम्हाला ठरवावे लागेल. त्यामुळे तुम्ही येऊन एकदा त्यावर फायनल निर्णय दिलात तर ते बरे होईल."

"ठीक आहे, पण माझ्याकडे फक्त पाच दहा मिनिटे एवढाच वेळ आहे."

"हरकत नाही. आमचे तज्ज्ञ प्रत्येकीला फक्त एकच प्रश्न विचारून शितावरून भाताची परीक्षा करतील."

"ओ के"



चांचणी परीक्षा देत असलेल्या प्रत्येक मुलीला एक वेगळा संगणक दिलेला होताच, कानाला  हेडफोन अधिक माइक लावला होता.  प्रश्नपत्रिकेचे स्वरूप अजब होते. प्रश्न वाचून त्याखाली उत्तरे देणे होतेच, शिवाय एकादा प्रश्न मॉनिटरवर दिसायचा, त्याचे उत्तर माईकवर सांगायचे, तर एखादा आदेश हेडफोनवर दिला जायचा, त्याप्रमाणे सांगितलेला प्रोग्रॅम सुरू करून त्यावर दिलेली कृती करायची. एखादा प्रश्न वाचल्यानंतर अदृष्य होऊन जायचा तर एखादे उत्तर लिहिण्याची खिडकी फक्त कांही सेकंदांसाठी उघडी रहात असे. कांही प्रश्नाचे उत्तर एका शब्दात द्यायचे होते तर दिलेल्या एकेका शब्दावर तीन चार वाक्ये लिहायची होती. सामान्य ज्ञान, ऑफीस प्रोसीजर्स, हिशोब, भाषा, व्याकरण, यांसारख्या विषयांची चाचपणी त्यात होतीच, शिवाय संगणक ज्ञान, शॉर्टहँड, टाइपिंग, वाचन, कथन, विवेचन, आकलनशक्ती, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, विचारशक्ती, विनोदबुध्दी, हजरजबाबीपणा वगैरेचासुध्दा कस लागत होता. त्यातला एक प्रश्न मानसशास्त्रातला होता.



एक तास संपल्यावर सर्वांनी हुश्श केले. या मॅरॅथॉननंतर त्यांना विश्रांतीची नितांत गरज होतीच. थोडे फ्रेश होऊन सा-या रिफ्रेशमेंटसाठी गोळा झाल्या. गप्पांसाठी त्यांना एक छान विषय आयता मिळाला होता. कोणी त्या परीक्षेत विचारलेल्या नमूनेदार प्रश्नांचे कौतुक करत होती तर कोणी त्यांची टिंगल करत होती. कोणी हेडफोनवर ऐकलेल्या आवाजाची नक्कल करून दाखवत होती तर कोणी आपण माईकवर कशी गंमतीदार उत्तरे दिली याचे प्रात्यक्षिक दाखवत होती. कोणी बिनधास्तपणे बोलत होत्या तर हे बोलणेसुध्दा टेप होत असेल या धास्तीने कोणी आपण खाण्यात मग्न असल्याचे दाखवून बोलणेच टाळत होत्या.



परीक्षकांनी प्राथमिक फेरीमधून पंधरा सोळा जणींना निवडून मुलाखतीसाठी थांबवून ठेवले आणि इतरांना निरोपाचा नारळ दिला. मुलाखत घेणा-यांनी चार पांच प्रश्न विचारून सेक्रेटरीचे काम करण्यातले त्यांचे प्राविण्य तपासून पाहिले. त्यात अपॉइंटमेंट्स देणे किंवा घेणे, डायरी ठेवून कामाचे नियोजन करणे, पुढच्या कामाची सूचना आणि वेळेवर आठवण करून देणे वगैरेंचा समावेश होता आणि एकंदर व्यक्तीमत्व, चालणे बोलणे, त्यातील अदब, मार्दव, हांवभाव वगैरे पाहून घेतले. त्यातून पाचसहा जणींची अखेरच्या फेरीसाठी निवड झाली.



ठरल्याप्रमाणे डायरेक्टरसाहेब आले आणि एकेकजणीला बोलावून फक्त एकच प्रश्न विचारला गेला. तो होता, " १ आणि १ मिळून किती होतील?"

"०, १, २, ३, ११" अशी या प्रश्नाची वेगवेगळी उत्तरे आली आणि त्यावर तज्ज्ञांची चर्चा सुरू झाली.



" ० उत्तर देणारी मुलगी नकारात्मक विचार करणारी आहे."

"म्हणजे भांडखोर, एकमेकाशी क्रॉस करून दोघांनाही रद्द करणारी."

"किंवा विध्वंसक प्रवृत्तीची."

"कदाचित अखेरच्या फेरीत असला (?) प्रश्न विचारला यावर तिचा हा मार्मिक शेरा असेल."



"बरं, १ उत्तर देणारी मुलगी स्वतःला विरघळून टाकणारी आहे."

"म्हणजे ती स्वतःचे अस्तित्वच नाकारणार!"

"उलट कदाचित ती दुस-यालाच खाऊन टाकणारी निघाली तर?"

"दोघांनी मिळून एकदिलाने काम करायचे असे ती सुचवते आहे."

"किंवा दोघांच्या वाटा एकाच दिशेने जात आहेत असे..."



" २ असे उत्तर देणारी मुलगी सरळमार्गी दिसते."

"सरधोपट विचार करणारी, अगदी सामान्य कुवतीची.."

"किंवा दोघे मिळून दुप्पट काम होईल असे तिला म्हणायचंय्"

"किंवा दोन वाटांचे पर्याय सापडतील असे.."



" ३ उत्तर देणारी रोमँटिक दिसते आहे"

"किंवा सृजनशील"

"तिला सिनर्जी माहीत आहे"

"नाही तर, तुला ही नको, मलाही नको, घाल तिस-याला असा विचार करत असेल."



"११ सांगणारी खूप महत्वाकांक्षी दिसते."

"किंवा कल्पनेच्या भरारीत रमणारी.. "

"किंवा एकावर एक अकरा चे निर्बुध्दपणे पाठांतर करणारी."



तोंडी उत्तरांचा अर्थ लावून झाल्यानंतर चांचणी परीक्षेत दिलेल्या मानसशास्त्रीय प्रश्नाच्या उत्तरांवर चर्चा सुरू झाली. एक या अंकाचा एक ठळक व मोठा आणि एक लहान व पुसट आंकडा देऊन त्यांना पाहिजे तशा प्रकाराने स्क्रीनवर मांडायला त्या प्रश्नात सांगितले होते.




"या चित्रातला लहान १ दूर उभा आहे. ही मुलगी फार संकोची स्वभावाची वाटते."

"किंवा सावधगिरी बाळगून राहणारी"

"किंवा पुढच्यावर दुरून लक्ष ठेवणारी"


"हा १ पुढच्या १ ला चिकटला आहे. ही मुलगी पावलावर पाऊल टाकून अनुकरण करणारी आहे."

"किंवा पाठीराखीण .. "

"किंवा पाठीमागे लागणारी.."

"म्हणजेच पाठपुरावा करणारी .."



"यातल्या लहान १ चे डोके मोठ्या १ च्या डोक्याच्या पातळीवर ठेवले आहे. ही समतावादी दिसते."

"म्हणजेच न्यूनगंड न बाळगणारी .."

"कदाचित स्वतःची उन्नती साधू पाहणारी असेल."



"यातला लहान १ मोठ्या १ च्या डोक्यावर उभा आहे. ही डोक्यावर चढून बसणारी असणार"

"म्हणजे अक्षरशः एकावर एक! वन अप(वू)मन !"

"दोघे मिळून जास्त उंची कशी गाठू शकतात हे ती दाखवते आहे."

"खांद्यावर उभे राहणा-याला अधिक दूरवरचे दिसते हे न्यूटनचे वाक्य तिला ठाऊक आहे."


"यातला लहान १ मोठ्या १ च्या पुढे दाखवला आहे. ही मुलगी कोणत्याही बाबतीत पुढाकार घेणारी आहे."

"समोरून येणारा हल्ला स्वतःच्या अंगावर घेण्याची तिची धडाडीची तयारी आहे."

"अनावर उत्सुकतेपोटी ती पुढे जाणारी दिसते"

"आपल्या पाठीशी कोणी आहे याचा तिला विश्वास वाटतो आहे."

"किंवा तिच्याकडे जबर आत्मविश्वास आहे."




             "या चित्रातल्या लहान १ ने मोठ्या १ ला चाट मारून आडवे पाडले आहे. ही खट्याळ दिसते."

"किंवा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तिला दाखवायचे आहे."

"ती तर खाली पडलेल्या मोठ्या १ ला मदत करायला जवळ आली आहे, सुस्वभावी दिसते."





"या चित्रातला लहान १ मोठ्या १ च्या पाठीवर उभा आहे."

" दुर्गामाता दिसते आहे."



"ती कांहीच नाही, या चित्रातली पहा. यातल्या लहान १ ने मोठ्या १ ला साफ उताणे पाडले आहे."

" आणि त्याच्या छाताडावर उभा आहे."



"आता ही दोन्ही प्रकारची उत्तरे एकत्र पहायला पाहिजेत."



ही चर्चा थांबवून डायरेक्टरने विचारले, "या सगळ्या मुलींना टाइपिंग, शॉर्टहँड येते ना ?"

"हो. सर्वांची त्यात चांगली गती आहे."

"आणि सगळ्याजणी ते बिनचूक करतात."

"अवघड जोडाक्षरे व्यवस्थित लिहितात."

"व्याकरणातले नियम नीट पाळतात."

"त्यांच्याकडे पुरेशी शब्दसंपत्ती (व्होकॅब्युलरी) आहे."



"डायरी कशी ठेवायची हे त्यांना माहीत आहे ना?"

"हो. अपॉइंटमेंट्स कशा द्यायच्या हे त्या जाणतात."

"कुणाला ती लगेच द्यायची आणि कुणाला टिंगवायचे हे सुध्दा .. "

"कोणती अपॉइंटमेंट घेणे जास्त महत्वाचे आहे याची जाण त्यांना आहे."

"आणि ती कशी मिळवायची असते याची पण.. "



"या सर्वांना नेहमीचे काँप्यूटर प्रोग्रॅम्स येतात ना?"

"हो. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट वगैरे एमएस ऑफीस ची माहिती यातल्या सगळ्या मुलींना आहे."

"ई-मेल उघडणे, त्याचे उत्तर पाठवणे, त्याची अटॅचमेंट्स पाहणे आणि जोडणे वगैरे कामे या सर्वजणींना येतात."

"इंटरनेटवर ब्राउजिंग करून आवश्यक ती माहिती शोधायला पण येते."



"झालं तर मग. ही लाल स्कर्ट आणि सोनेरी टॉप घालून आलेली पोरगी बरी वाटते. तिला जरा चांगले गुण जोडायचे आणि ते माझ्या ऑफीसला कसे उपयोगी ठरतील हे पहायचे काम तुमचे. तेवढे करून तिच्या नांवाने शिफारस देऊन टाका आणि तिला लगेच कामावर हजर व्हायला सांगा.





"?" "?" "?" "?" "?" "?" "?" "?" (कमिटी मेंबर्सच्या चेहे-यावरील भाव)


लेखक: आनंद घारे